तंत्रज्ञान? नव्हे, ही तर बदलत्या काळाची सुरेखशी पाऊले!
नुकतीच इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या एका मोठ्या आणि प्रसिध्द दुकानात गेले होते. निमित्त होते तिथूनच काही महिन्यांपूर्वी विकत घेतलेल्या पेन-ड्राईव्हने अचानक संप पुकारण्याचे. तो पेन-ड्राईव्ह घेतला तेव्हा एकतर मला दुकानात शिरल्या शिरल्या कॅश-काऊण्टरजवळच मिळाला होता. शिवाय त्यादिवशी मी जरा घाईतही होते; अवघ्या पाच-दहा मिनिटांत ती खरेदी उरकून बाहेर पडले होते. थोडक्यात, तेव्हा त्या दुकानात मला नीटसा फेरफटका मारता आलेला नव्हता. पण मग माझ्या दुसर्या फेरीच्या वेळी मात्र मी ती कसर भरून काढली. तसेही, दुकानातल्या तथाकथित ‘सेल्स-एक्झिक्युटीव’नामक मनुष्यविशेषाने मला त्या पेन-ड्राईव्हची निर्मिती करणार्या कंपनीच्या कार्यालयात जाण्याचा मौलिक सल्ला देऊन दोन मिनिटांत वाटेला लावलेच होते. माझ्या फेरफटक्याची सुरूवात अर्थातच स्वयंपाकघरात वापरात येणार्या वस्तूंच्या विभागापासून झाली. वॉटर-प्युरिफायर्स्, मायक्रोवेव्ह ओव्हन्स्, मिक्सर-ग्राइण्डर्स्, सॅण्डविच-टोस्टर्स्, रेफ्रिजरेटर्स् ही सर्व मंडळी आपल्याला ऐकून-पाहून-वापरून बर्याच वर्षांपासूनची तशी चांगली परिचित असलेली. पण त्यातही असलेली विविधता, तंत्रज्ञान...