पुस्तक परिचय : '२६/११ मुंबईवरील हल्ला'


दि. २७ नोव्हेंबर २०११ रोजी लोकसत्ता-लोकरंग पुरवणीत प्रकाशित झालेला पुस्तक-परिचयपर लेख.
मूळ लेख इथे वाचता येईल.
----------
२६/११बद्द्ल सर्वकाही
२६ नोव्हेंबर २००८. आधुनिक भारताच्या इतिहासातील एक काळा दिवस. यादिवशी दहा धर्मवेड्यांनी मुंबईवर भीषण दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्याची व्याप्‍ती आणि अघोरी स्वरूप समजावून घेण्याचा प्रयत्न ‘२६/११ मुंबईवरील हल्ला’ या पुस्तकात केला गेला आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्‍त ज्यूलिओ फ्रान्सिस रिबेरो यांनी आणि रेडियो, टी.व्ही., छपाई आणि वेब या माध्यमांतील इतर काही नामवंत पत्रकार, लेखकांनी लिहिलेले लेख हरिंदर बावेजा यांनी संकलित केले आहेत.
२६/११चा हल्ला सहजासहजी आपल्या विस्मृतीत जाणे अशक्यच. तरीही मग हे पुस्तक का वाचायचे? आपल्याला त्यातून नव्याने काही समजते का? तर, याचे उत्तर आहे ‘हो.’
दहशतवाद्यांनी हल्ल्यादरम्यान त्यांच्या सूत्रधारांशी फोनवरून केलेली संभाषणे पुस्तकात सविस्तर दिली आहेत. ती लक्षपूर्वक वाचा. या हल्ल्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी झालेल्यांचे भले ‘ब्रेन-वॉशिंग’ केले गेले असेल, पण एकदा धर्माच्या, जिहादच्या वेडाने झपाटल्यावर योजनेची आखणी, नियोजन आणि अंमलबजावणी त्यांनी किती सफाईदारपणे आणि काटेकोरपणे केली ते तुमच्या लक्षात येईल.
त्यानंतर मग पुस्तकातील आपल्या विविध सरकारी खात्यांचे तपशीलही वाचा...
मिळालेल्या बारीकसारीक गुप्‍त माहितीचे महत्त्व वेळीच न ओळखता ती माहिती नुसती या खात्याकडून त्या खात्याकडे सरकवली जाते. मग एक दिवस हल्ला होतो. कुणी एक तुकाराम ओंबाळे, मेजर संदीप उन्नीकृष्णन मरण पत्‍करतात. त्यानंतर सुरू होतो उलट तपास. त्याचे धागेदोरे पुन्हा त्या महिन्या-दोन महिन्यापूर्वी मिळालेल्या गुप्‍तचर संस्थांच्या इशार्‍याकडे पोहोचतात.
...वाचून आपले मन निराशेने भरून जाते. मनात नकळत विचार येतो - कार्यक्षमतेत ही एवढी तफावत का? ‘आपल्या’त आणि ‘त्यांच्या’त असा कुठला फरक आहे? केवळ कुठल्यातरी वेडाने झपाटले जाणे अथवा न जाणे हा?
देशप्रेमाची भावना, कर्तव्यदक्षतेची ठायीठायी जाणीव या बाबी झपाटण्यासाठी पुरेश्या नाहीत? नक्कीच आहेत. पण हे कुणा एकट्यादुकट्याचे काम नाही.
२६/११च्या घटना जेव्हा प्रत्यक्ष घडत होत्या, तेव्हा तीन कार्यक्षम पोलीस अधिकार्‍यांच्या तडकाफडकी मृत्यूमुळे आपल्याला जबरदस्त धक्का बसला. सी.एस.टी. स्टेशनवरील थैमान बघून आपण हळहळलो. जे घडले, घडू दिले गेले त्याबद्दल आजही आपल्या मनात चीड आहे, विषादही आहे. ती भावना कधीच निमता कामा नये. पण त्याचबरोबर पुस्तक वाचून एक अभ्यासपूर्ण चिंतनही घडावे अशी संकलक हरिंदर बावेजांची नक्कीच इच्छा असणार. कारण त्यांच्यासारख्या गेली वीस वर्षे दहशतवाद आणि सुरक्षा या विषयावर लेखन करणार्‍या ज्येष्ठ पत्रकाराचा, साठ तासांच्या त्या झुंजीचे केवळ एक रोमांचकारी दस्तऐवजीकरण करणे, इतकाच मर्यादित उद्‍देश खचितच नसणार.
दहशतवादी मुंबईच्या किनार्‍याला लागले ती वेळ, तेव्हा भरती असणे या बाबी त्यांना अनुकूल होत्या, निसर्गाने त्यांना सगळे सोपे करून ठेवले असा उल्लेख ‘कराची ते मुंबई क्रौर्याचा प्रवास’ या लेखात वाचायला मिळतो. ही बाब फारशी पटत नाही. ज्या हल्ल्याची तयारी वर्षभर आधीपासून सुरू होती, त्याच्या सूत्रधारांनी सागरी मार्गाने जायचे म्हटल्यावर भरती-ओहोटीच्या वेळा लक्षात घेतल्याच असणार. ज्या दोन कोळ्यांनी दहशतवाद्यांना हटकले, ते सांगतात की ‘भारत-इंग्लंड क्रिकेटसामन्याच्या थेट प्रक्षेपणामुळे त्या भागात वर्दळ नव्हती, नाहीतर आम्ही नक्कीच त्यांच्याशी भांडण उकरून काढले असते.’ असे घडले असते तर कदाचित चित्र काही वेगळेच दिसले असते. अर्थात घटना घडून गेल्यावर ‘जर-तर’ला काही थारा नसतो आणि आपल्या दृष्टीने तर या हल्ल्याच्या संबंधातील अनेक गोष्टी चुकीच्याच घडत गेल्या होत्या.
ताज हॉटेलवरील दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेची खबर गुप्‍तचर संस्थांकडून मिळाल्याने पोलिसांनी सप्टेंबर, २००८मध्ये हॉटेल व्यवस्थापनाला सुरक्षाविषयक काही सूचना केल्या होत्या. त्यानुसार हॉटेलच्या प्रवेशद्वारांजवळ बसवलेले ‘मेटल डिटेक्टर्स’ हल्ल्याच्या दोन आठवडे आधी ‘ग्राहकांची गैरसोय होते’ म्हणून काढून टाकण्यात आले! धुळे जिल्ह्यात त्या सुमारास दंगल झाल्याने हॉटेलजवळ तैनात केले गेलेले चार सशस्त्र पोलिस मुंबईतील संवेदनशील भागातील अतिरिक्‍त बंदोबस्तासाठी १४ ऑक्टोबर २००८ या दिवशी काढून घेतले गेले. त्यामुळे दहशतवादी जेव्हा हॉटेलमध्ये घुसले तेव्हा त्यांना हटकण्यासाठी तिथे कुणीच नव्हते! आपले पोलिसदल इतके अपुरे आहे का की त्या चार पोलिसांविना इतरत्र बंदोबस्त अडावा? जर तसे असेल तर ही खरेच गंभीर बाब आहे.
ओबेरॉय-ट्रायडंटमध्ये दहशतवाद्यांच्या पाठोपाठ थोड्याच वेळात पोलिसही पोचले होते. दहशतवाद्यांनी दोन बाँबस्फोट केल्यावर अपुरे शस्त्रबळ असलेल्या पोलिसांना माघार घ्यावी लागली. काही पोलिस समोरच्या पदपथावर बधीरपणे उभे होते. त्यांच्यापैकी एकाच्याच हातात पिस्तूल होते. बाकीच्यांकडे केवळ लाठ्या होत्या.
गोळीबारानंतर लगेच सी.एस.टी.कडे पाठवलेली दोनशे पोलिसांची कुमक कामा हॉस्पिटलच्या गल्लीत वेळेवर पोहोचू शकली नाही. कसाब आणि इस्माईल तिथे दडून बसले असल्याची खबर शेजारच्या इमारतीतून कुणीतरी पोलिस नियंत्रण कक्षाला कळवली होती. पण करकरे-कामटे-साळसकर यांच्यापर्यंत ती माहिती कुणी पोहोचवलीच नाही.
हे सर्व वाचले की पोलिसांबद्दल मनात खरेतर काहीशी सहानुभूतीच दाटून येते.
कठीण परिस्थितीत अत्याधुनिक शस्त्रास्त्रांच्या मदतीने २६/११सारख्या कारवाया एन.एस.जी.कमांडोजनी यापूर्वीही यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यांना तसेच प्रशिक्षण दिलेले असते. त्यांच्या शौर्याला कुठल्याही प्रकारे कमी लेखण्याचा उद्देश नाही. पण अश्या मोठ्या व्याप्‍तीच्या घटनांमध्ये पहिला हल्ला स्थानिक पोलिसांना झेलावा लागतो. त्यासाठी ते तयार असतात का याबद्दल फारसा गांभीर्याने विचार केला जात नाही. आपले पोलिसदल याआधी पुरते बदनाम झालेलेच आहे. पण हे पुस्तक वाचताना या दुसर्‍या बाजूचाही विचार व्हावा असे वाटते.
२७ नोव्हेंबरला पहाटे तीन वाजता एका शक्‍तिशाली बाँबस्फोटामुळे ताज हॉटेलच्या पाचव्या मजल्यावर आग लागली आणि तिथले दहशतवादी आणि ओलीस दोघेही गुदमरू लागले. ‘हॉटेल ताजमधील अंधारयात्रा’ या प्रकरणात ख्रिस खेतान त्याबद्दल लिहितात, ‘प्रथमच पकडणारे आणि पकडले गेलेले यांच्याकडे मृत्यू समभावाने पाहू लागला.’ कोणीही ओलीस जिवंत ठेवायचा नाही या सूत्रधाराच्या सूचनेचे दहशतवाद्यांना विस्मरण झाले आणि ते आपले मोबाईल फेकून देऊन जीव वाचवण्यासाठी अंधारात नाहीसे झाले.
२९ नोव्हेंबरला पहाटे दहशतवादी दयेची भीक मागत ओरडत असल्याचे कमांडोंनी ऐकले.
हा जिहादचा पराभव म्हणायचा की मानवाची नैसर्गिक प्रवृत्ती जिच्यावर कुठल्याही ‘ब्रेन वॉशिंग’ने मात करणे अशक्य आहे? असा प्रश्न आपल्याला पडतो.
‘भयानक वास्तव!’ या लेखातील जे.एफ.रिबेरो यांचे, गुप्‍तचर संस्थांनी पुरवलेल्या माहितीचे योग्य प्रकारे विश्लेषण करण्याबद्दलचे भाष्य अतिशय महत्त्वाचे आहे. हल्ल्यानंतर काही राजकारण्यांना राजीनामे द्यावे लागले; पण पोलीस अधिकार्‍यांचे काय? - असा परखड सवाल त्यांनी केला आहे. ‘२६ नोव्हेंबरच्या हल्ल्यामुळे ज्यांना राग आला आहे अशांनी संघटितपणे विरोध करून पोलिस सुधारणांचा आग्रह धरला पाहिजे. पोलिसदल सत्तेवरील पक्षाला जबाबदार असण्याऐवजी फक्‍त कायद्याला जबाबदार असले पाहिजे’.’ असे ठाम प्रतिपादनही ते करतात. पंजाबमधील खलिस्तानी दहशतवाद्यांशी यशस्वी सामना दिलेल्या त्यांच्यासारख्या अनुभवी पोलिस-उच्चपदस्थाचे हे विचार अंतर्मुख करून जातात.
वाचकांना अंतर्मुख करणे हेच या पुस्तकाचे प्रमुख उद्दीष्ट आहे जे ‘दिरंगाईची किंमत आणि भविष्यातील उपाययोजना’ या शेवटल्या प्रकरणात पूर्णत्त्वास जाते.
‘दहशतवादाचे उगमस्थान’ हा लेख हरिंदर बावेजा यांनी पाकिस्तानमधील मुरिदके येथील लष्कर-ए-तय्यबाच्या प्रशिक्षण तळाला भेट दिल्यानंतर लिहिलेला आहे. पण या प्रकरणात ‘मी तिथे एका कुटुंबाला भेटलो’, ‘त्या परिसरात मी दोन तास होतो’ अशी प्रथमपुरुषी पुल्लिंगी क्रियापदे वापरली गेली आहेत. (वाचकांच्या माहितीसाठी - हरिंदर बावेजा या नामवंत स्त्री-पत्रकार आहेत.) ही एक बाब वगळली तर मूळ लेखकांना जे सांगायचे आहे ते प्रा. मुकुंद नातू यांच्या अनुवादातून वाचकांपर्यंत व्यवस्थित पोहोचते.
पुस्तक वाचून संपते. बंदुकीच्या गोळीने तडकलेल्या काचेतून गेट-वे-ऑफ-इंडियाच्या इमारतीचे दृष्य दाखवणार्‍या मुखपृष्ठाकडे आपली परत एकदा नजर वळते. नवीन ताज हॉटेलच्या गच्चीतून काढले गेले असावे असे वाटणारे ते छायाचित्र. सर्वसामान्य माणसासाठी गेट-वेकडे बघण्याचा हा जरा निराळा आणि अपरिचितच कोन आहे. २६/११च्या घटनांकडेही अश्याच जरा निराळया कोनातून वाचकांनी पाहिले तरच ही पुस्तकनिर्मिती कारणी लागेल.
२६/११. मुंबईवरील हल्ला. साठ तासांच्या झुंजीनंतर मानवतेचा विजय.
संकलन - हरिंदर बावेजा. अनुवाद - प्रा. मुकुंद नातू.
मेहता पब्लिशिंग हाऊस. पृष्ठे २२२. मूल्य २५० रुपये.

Comments

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)