पुस्तक परिचय : 'द फर्म'


रविवार, दि.१० एप्रिल २०११ रोजी लोकसत्ता-लोकरंग पुरवणीत प्रकाशित झालेला पुस्तक-परिचयपर लेख.
मूळ लेख इथे (स्क्रोल डाऊन करून) वाचता येईल.
-------------------------------
‘The Firm’ ही जॉन ग्रिशॅमची पहिली अशी कादंबरी की ज्यामुळे त्याला अमाप प्रसिध्दी मिळाली. वकिली पेश्याच्या पार्श्वभूमीवरील वेगवान कथानक, थरारक घटनांची तितक्याच कुशलतेने केलेली मांडणी ही ग्रिशॅमच्या लेखनातील वैशिष्ट्ये या कादंबरीतदेखील आढळतात. या कादंबरीची अनिल काळे यांनी अनुवादित केलेली आवृत्ती ‘द फर्म’ याच शीर्षकाने मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केली आहे.
ही कादंबरी मुखपृष्ठापासूनच वाचकांची पकड घेते. मु्खपृष्ठावर वरच्या भागात एखाद्या कॉर्पोरेट कार्यालयाचे वाटावे असे चित्र आणि त्याखाली अंधाऱ्या रात्री कशापासून किंवा कुणापासूनतरी लांब पळू पाहणारा एक उंची पेहरावातील तरुण... हार्वर्ड लॉ स्कूलमधून शिक्षण घेऊन नुकताच बाहेर पडलेला हा तरुण वकील आहे मिचेल मॅकडिअर ऊर्फ मिच. अतिशय हुशार असलेल्या मिचने प्रतिकूल कौटुंबिक आणि आर्थिक परिस्थितीत आपले कायद्याचे शिक्षण पूर्ण केलेले असते. साहजिकच तो आणि त्याची सुस्वरूप पत्नी अ‍ॅबी यांच्यासमोर उज्ज्वल आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न भविष्याची स्वप्ने असतात.
‘बेन्डिनी, लँबर्ट अ‍ॅंड लॉक’ ही लॉ फर्म या तल्लख बुध्दीच्या होतकरू तरूणाला हेरते. त्याच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त पगार आणि इतर सुविधा त्याला देऊ करते. तो हुरळून जातो. न्यूयॉर्क, शिकागोसारख्या मोठ्या शहरांतील नोकरीच्या इतर तीन ऑफर्स धुडकावून मेंफिससारख्या तुलनेने लहान शहरातील ही नोकरी तात्काळ स्वीकारतो. झपाटून कामाला लागतो. आता त्याला बक्कळ पैसा कमवायचा असतो; फक्त बक्कळ पैसा. त्यासाठी तितकेच प्रामाणिक कष्टही करायची त्याची तयारी असते.
मात्र त्याला जेवढे वाटते तितके हे सगळे सरळसोपे नसते. बेन्डिनी, लँबर्ट अ‍ॅंड लॉक या फर्मची एक छुपी बाजूही असते आणि तिचे धागेदोरे जातात ते थेट एका कुख्यात माफिया फॅमिलीपर्यंत. आपली उद्दीष्टे पूर्ण करण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची त्या फॅमिलीची तयारी असते.
मिच नोकरीला लागल्याच्या काही महिन्यांनंतर फर्मच्या कामासाठीच गेलेल्या दोन अ‍ॅसोशिएट्‌स्‌चा मृत्यू होतो. वरवर पाहता तो एक अपघात असतो. फर्मतर्फे मृतांच्या कुटुंबियांना सर्वतोपरे मदत करण्याची आश्वासने दिली जातात. मात्र फर्ममधल्या अजून तीन वकीलांच्या त्यापूर्वीच घडलेल्या मृत्यूंबद्दल त्याचवेळेस मिचला समजते आणि काहीतरी काळेबेरे असल्याचा त्याला प्रथमच संशय यायला लागतो. त्यात भर पडते ती वेन टेरेन्स नामक एक एफ.बी.आय. एजंट त्याला सतत भेटण्याचा, त्याला सावध करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा.
वकिली पेश्यावर मनापासून प्रेम करणारा मिच एकएक गोष्टी समजताच आधी हादरून जातो. पण पूर्ण विचारांती या सर्व गैरव्यवहारांच्या मुळाशी जाण्याचं ठरवतो. एकीकडे ती माफिया फॅमिली तर दुसरीकडे एफ.बी.आय. अशा विचित्र कात्रीत तो सापडतो. पण त्याची पत्नी, भाऊ, भावाचा मित्र आणि त्या मित्राची सेक्रेटरी यांची साथ त्याला लाभते आणि सुरू होतो एक थरारक, जीवघेणा खेळ. एक असा खेळ की ज्यात मिचचे करिअर, वैवाहिक आयुष्य सगळे पणाला लागते...
‘द फर्म’च्या कथानकात अनेक पात्रे आहेत. असे असूनही कादंबरी कुठेही कंटाळवाणी होत नाही. सर्वच व्यक्तिचित्रणे उत्तम झाली आहेत. मिचला भुलवण्यासाठी चोखंदळपणाचे, कार्यक्षमतेचे आणि संपन्नतेचे दिखाऊ चित्र ज्याप्रकारे ती फर्म त्याच्यासमोर उभे करते तो कादंबरीचा सुरूवातीचा भाग उत्कंठावर्धक झाला आहे. ते सर्व वर्णन वाचत असताना वाचकांना त्यामागच्या फर्मच्या काळ्या हेतूंबद्दल शंकाही येत नाही.
एफ.बी.आय.चा ससेमिरा चुकवत असतानाच मिच फर्मच्या गैरव्यवहारांचे कागदोपत्री पुरा्वे गोळा करण्यासाठी एक चलाख पण अतिशय धाडसी योजना आखतो. त्याची पत्नी आणि भावाच्या मित्राची सेक्रेटरी दोघी जीवावर उदार होऊन ती अमलात आणतात. ते सर्व रोमांचकारी घटनाक्रम नेमकेपणाने येतात. वाचकांना अगदी खिळवून ठेवतात.
‘The Firm’सारख्या बांधीव कथानकाचा अनुवाद करताना दोन्ही भाषांची शैली आणि बाज सांभाळणे अतिशय महत्त्वाचे असते. नाहीतर मूळ कलाकृती कितीही उत्कृष्ट असली तरी अनुवाद नीरस, कंटाळवाणा होऊ शकतो. काही मोजके अपवाद वगळल्यास हा तोल या पुस्तकात योग्य रीतीने सांभाळला गेला आहे.
एकूणात हे पुस्तक ग्रिशॅमच्या अगणित चाहत्यांना पुनःप्रत्ययाचा आनंद देते आणि ज्यांनी ग्रिशॅम आधी वाचलेला नाही अश्यांना त्याच्या चाहतेवर्गात तात्काळ सामिल करून घेते.
**************
द फर्म, जॉन ग्रिशॅम.
अनुवाद - अनिल काळे.
मेहता पब्लिशिंग हाऊस. पृष्ठे ४८०. मूल्य ४४० रुपये.

Comments

Popular posts from this blog

इट्स टाइम फॉर आफ्रिका - १

इट्स टाइम फॉर आफ्रिका - २

इट्स टाइम फॉर आफ्रिका - ३