एक अविस्मरणीय दिवस : आय.एम.एस.विक्रांतच्या सहवासात

नौदल सप्ताहाची जाहीरात वर्तमानपत्रात पाहिली आणि अंगात एकदम उत्साह संचारला. विक्रांत या आपल्या युध्दनौकेला भेट देण्याची माझी फारा वर्षांपासूनची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता बळावली होती.
२८ नोव्हेंबर २००९ ते ६ डिसेंबर २००९ अशी (फक्त) आठ दिवस विक्रांत सर्वसामान्यांसाठी खुली राहणार होती. लग्गेच कॅलेंडर काढून सोयीचा २९ नोव्हेंबरचा रविवार मुक्रर करून टाकला. भेट द्यायची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ अशी छापली होती. ‘सकाळी लवकरच तिथे पोचू, म्हणजे काही भानगडच नको’ असं म्हणून मी घरादाराला नवाच्या ठोक्यालाच बाहेर काढलं.
दरम्यान, विक्रांतला भेट देऊन आलेल्या काही जणांचं ब्लॉगरूपी लेखन नेटवर सापडलं. ते वाचून काढलं. त्यातून मिळालेल्या माहितीनुसार सी.एस.टी.च्या टॅक्सीवाल्यांना ‘टायगर गेट’(विक्रांत जिथे नांगरून ठेवली आहे तिथे जाण्याचा नौदलाच्या ताब्यातला दरवाजा) सांगितलेलं पुरतं असं कळलं. पण तेवढा जाणकार टॅक्सीवाला नेमका आमच्या नशिबी नव्हता. त्यानं टॅक्सी बरोब्बर उलट दिशेला नेली. मग यू टर्न मारून काही ठिकाणी विचारत विचारत शेवटी ठीक ११ वाजता आमची वरात त्या टायगर गेट परिसरात पोचली.
टॅक्सीतून उतरल्यावर समोर पहिलं जे दृष्य दिसलं ते हे :

फूटपाथवर सुमारे अर्ध्या ते पाऊण कि.मी. लांबीची रांग होती !!!
आमचे चेहरे बघण्यासारखे झाले. सकाळी ‘लवकरच’ तिथे पोचल्यावरही भानगड समोर ठाकली होती. आणि ती सुध्दा साधीसुधी नाही, चांगली लांबलचक !!
रांगेत उभं राहण्याशिवाय गत्यंतर नव्हतं.
नौदलाचे कर्मचारी न थकता, न कंटाळता गर्दीवर नियंत्रण ठेवत होते. ठिकठिकाणी ‘आय.एम.एस. विक्रांत’चे फलक लागलेले होते. त्यातल्या आय.एम.एस. या शब्दांपाशी माझं गाडं पुनःपुन्हा अडत होतं. वर्तमानपत्रातसुध्दा आय.एन.एस. या अपेक्षित शब्दांऐवजी आय.एम.एस.च छापलं होतं. तेव्हा ते ‘छपाईतली प्रिंटींग मिष्टीक’ म्हणून सोडून दिलं होतं. पण तिथेही तेच वाचल्यावर मात्र कुतूहल जागृत झालं. शेवटी न राहवून तिथल्या एका नौदल कर्मचार्‍याला विचारल्यावर कळलं की कोणे एके काळी इंडियन नेव्हल सर्विस (आय.एन.एस.)मधे असलेली विक्रांत आता इंडियन म्युझियम शिप (आय.एम.एस.) म्हणून ओळखली जाते. स्वतःचं या बाबतीतलं अज्ञान झाकण्यासाठी ताबडतोब विषय बदलणं मला क्रमप्राप्त होतंच.
दुपारी १२ वाजताही रांग वाढतच होती.


केवळ रस्त्यावर दुतर्फा भरपूर झाडं असल्यामुळे रांगेत तिष्ठत राहणं थोडंसं सोपं गेलं.
ठीक १ वाजता आम्ही टायगर गेटमधून आत प्रवेश केला. समोर थोड्या अंतरावर एक अजस्त्र नौका दिसली. तिच्या शेजारीच उभ्या असलेल्या अजून २ नौका, ज्या मुळात भल्याथोरल्या होत्या अशा, त्या अजस्त्र नौकेच्या शेजारी अगदीच पिल्लू पिल्लू वाटत होत्या. ती अजस्त्र नौका म्हणजेच विक्रांत आहे हे कळल्याक्षणी कॅमेरा सरसावला. पण तिथून फोटो काढायला परवानगी नव्हती. इतकं चुकचुकायला झालं की काय सांगू. विक्रांतचं पहिलं दर्शन कुठून झालं, कसं झालं, कसं दिसलं ते आम्हाला कुणासोबत शेअर करता येणार नव्हतं. बरं, गुपचुप १-२ स्नॅप्स मारावेत म्हटलं तर ’फोटो काढताना आढळल्यास रु. १,००० इतका दंड भरावा लागेल’ ची घोषणा कानावर पडली होती. त्यामुळे कॅमेरा पाठीवरच्या सॅकमधे ठेवून दिला आणि आपला नंबर येण्याची वाट बघत उभे राहीलो.
टायगर गेटमधून आत शिरल्यावर सहनशक्ती टाटा करायच्या मार्गावर होती. पण तिला ठाऊक नव्हतं की प्रत्यक्ष बोटीत पाऊल ठेवायला आम्हाला अजूनही एक तासभर वाट पहावी लागणार होती.
शेवटी ठीक २ वाजून २० मिनिटांनी, रांगेत उभं राहील्यानंतर बरोब्बर ३ तासांनी, घरातून निघाल्यानंतर साडेपाच-सहा तासांनी आम्ही प्रत्यक्ष विक्रांतवर पाऊल ठेवलं! खरं सांगते, त्याक्षणी अंगावर रोमांच उभे राहीले!!
विक्रांत... १९७१ च्या बांगलादेश युध्दात पराक्रम गाजवलेली!
विक्रांत... आपल्या देशाची शान!!
एका विमानवाहू युध्दनौकेला कधी आपले पाय लागतील आणि ती सुध्दा अशीतशी नाही तर विक्रांतसारखी युध्दनौका, असं मला जन्मात वाटलं नव्हतं!
पुढचे दोन तास अक्षरशः मंतरल्यासारखे गेले.
संपूर्ण युध्दनौकेचं एका उत्कृष्ट नौदल-संग्रहालयात रुपांतर करण्यात आलं आहे. विक्रांतवर एकूण १३ डेक्स्‌ आहेत. त्यांपैकी काही पाण्याखाली तर काही पाण्याच्या पातळीच्या वर आहेत. पाण्याखालच्या डेक्स्‌ना खरंतर डेक्स्‌ म्हणत नाहीत तर नॉट्स म्हणतात हे त्यादिवशी कळलं.
त्यादिवशी खरं म्हणजे इतकं कायकाय नवीननवीन कळलं, माहितीत इतकी काही भर पडली की ते एक-दोन पानांत लिहून काढणं कठीण आहे.
संग्रहालयाचं एक दालन फक्त विक्रांतने गाजवलेल्या मर्दुमकीची माहिती देणारं आहे. त्या दालनात आम्ही हे असे शिरलो.

सैनिकांना देण्यात येणारी विविध शौर्य पदकं अशी एका कपाटात लावून ठेवलेली होती.

त्यापुढच्या दालनात नौदलाची विविध हेलिकॉप्टर्स, विमानं, निरनिराळी आयुधं, उपकरणं मांडून ठेवलेली होती.




आणीबाणीच्या काळात सैनिकांनी वापरावयाचा हा एस्केप सूट आणि ब्रीदिंग ऍपरेटस...

संकटसमयी याचा वापर करणारा आणि याच्या ओझ्यानं गुदमरून न जाता जिवंत राहू पाहणारा नौसैनिक खरंच महान म्हणायला हवा.
ब्रीदिंग ऍपरेटससोबत सैनिकाला ‘पर्सोनेल सर्व्हायवल किट’ जवळ बाळगावं लागतं.

त्यात पुढील १० वस्तू असतात : १) हँड फ्लेअर (२) फ्लुरोसंट सी मार्कर (३) डिसॉल्टींग किट (समुद्राचं खारं पाणी गोडं करण्यासाठी) (४) इमर्जंसी फ्लाईंग रेशन (एक छोटीशी गोळी पाण्यात टाकली की फुगते आणि वाडगाभर खिरीसारखा पदार्थ तयार होतो.) (५) डे-नाईट डिस्ट्रेस सिग्नल (६) पिण्याचं पाणी (७) मासेमारीचं साहित्य (८) फ्लोटींग नाईफ (पाण्यात न बुडणारी एक धारदार सुरी) (९) मनगटावर बांधता येऊ शकेल असं होकायंत्र (१०) दुरुस्तीसाठीचं स्क्रू ड्रायव्हर, स्पॅनर वगैरे सामान.
हे सगळं पहात असताना दुसऱ्या दिशेला असणारं एक हेलिकॉप्टर सतत खुणावत होतं.

हा हेलिकॉप्टर किंवा विमानाचा हँगर आहे. मोठमोठ्या साखळदंडांच्या साहाय्यानं तो हिरव्या रंगाचा प्लॅटफॉर्म वर उचलला जातो आणि हेलिकॉप्टरला फ्लाईट-डेकवर नेऊन ठेवतो.
हँगर आणि फ्लाईट डेक यांची तुलनात्मक जागा :

हेलिकॉप्टर जागेवरून उड्डाण करू शकतं. पण विमान असेल तर त्याच्या उड्डाणासाठी गलोलीतून दगड मारण्यासारखी क्रिया घडवून आणली जाते आणि अवघ्या शंभर-सव्वाशे मीटर अंतरातच विमान हवेत झेपावतं. हे सगळं घडतं ते फ्लाईट डेकवर :

लांबवर मध्यभागी जो काळा चौकोन दिसतो आहे तिथे हँगरवरून विमान आणून ठेवलं जातं; उजवीकडे वळून मागे नेलं जातं, एका मजबूत केबलमधे अडकवलं जातं आणि किंचित उचललेल्या तिरप्या फ्लाईट डेकवरून गलोलीतून दगड भिरकवल्याप्रमाणे आकाशात झेपावतं.


फ्लाईट डेकवर उभं राहून समुद्राकडे बघताना जे वाटलं ते अवर्णनीय होतं. नेहमीच्या गेट-वेच्या समुद्रापेक्षा हा समुद्र काही वेगळाच भासला. गेटवेचा समुद्र आपल्याबरोबर हसतो, खिदळतो, पिकनिकची मजा घेतो... हा समुद्र धीरगंभीर होता, सागरी सीमांबद्दलच्या गहन विचारात बुडलेला होता. लांबवर आय.एन.एस.विराट नांगरून ठेवलेली होती. (फ्लाईट डेकवरून समुद्राच्या दिशेचे फोटो काढायलाही परवानगी नव्हती. एकदोघांनी तरीही ते काढल्यावर एक नौदलाचा कर्मचारी तातडीने तिथे आला आणि त्यांना ते फोटो डिलीट करायला लावले. मनात आलं - केवढा हा विरोधाभास... गूगल-अर्थ, विकीमॅपिया इ.च्या साहाय्यानं हा सगळा भाग अगदी व्यवस्थित न्याहाळता येतो. विक्रांत, विराट आणि इतरही नौका, पाणबुड्या यांचा ठावठिकाणा अगदी सहज लागतो. मग आमच्यासारख्या पर्यटकांनी काढलेल्या काही फोटोंमुळे असा काय फरक पडणार होता? का मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यानंतरचं हे उशीरानं सुचलेलं शहाणपण म्हणायचं? मग हेच शहाणपण १९९३ सालच्या मुंबई बॉम्बस्फोटांनंतरच का नाही सुचलं?... पण हे सगळं मनातल्या मनातच! तिथल्या त्या कर्मचार्‍याशी यावरून हुज्जत घालण्यात काहीच अर्थ नव्हता. तो तर हुकुमाचा ताबेदार होता. ज्यांच्याशी हुज्जत घालून कदाचित, कदाचित थोडा फरक पडण्याची शक्यता आहे त्यांच्यापर्यंत आपल्यासारखे सामान्य नागरिक पोहोचूच शकत नाहीत!)
फ्लाईट डेकवर फिरून होईपर्यंत साडेतीन वाजून गेले होते. तिथून उतरून खाली इंजिन रूम पहायला गेलो. तिथे वाफेवर चालणार्‍या इंजिनचा वापर केला जातो. समुद्राचं खारं पाणी गोडं केलं जातं आणि त्याच्या वाफेवर टर्बाईन्स चालवली जातात. इंजिनरूममधली एक‌एक उपकरणं, यंत्रं सगळंच अवाढव्य, अवाक्‌ करणारं होतं. समुद्राच्या पाण्याचा असाही वापर करता येतो हे कळल्यावर माझ्या मुलानं ‘मग मुंबईत पाणीकपात करण्यापेक्षा आपल्याला अशा प्रकारे जास्तीचं पाणी का अवेलेबल करून देत नाहीत हे महापलिकावाले?’ असा एक अनपेक्षित प्रश्न विचारला! त्यावरून, त्याला भूक लागली आहे हे माझ्या लक्षात आलं. पुढच्या पाच मिनिटांत विक्रांतचा कॅफेटेरीया शोधून काढला. जे खायला मिळालं त्यावर तुटून पडलो आणि दुपारी सव्वाचार वाजता बोटीतून बाहेर पडलो.
सकाळी नऊपासूनच्या पायपिटीमुळे पायांचे तुकडे पडायला आले होते आणि गेले दोन तास आपल्याला त्याचं भानही नव्हतं हे बाहेर पडल्यावर जाणवलं!!
बाहेर सकाळ‌इतकीच माणसांची गर्दी होती.


यापुढे हे लोक कधी आत जाणार आणि अंधार पडायच्या आत त्यांचं सगळीकडे फिरून होणार का असं वाटलं.
बर्‍याच दिवसांनी एक रविवार खर्‍या अर्थानं सार्थकी लागला.
दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नौदल सप्ताहाच्या निमित्तानं विक्रांत सामान्य जनतेसाठी खुली असते. जोपर्यंत चालणं झेपतंय, गुडघेदुखी किंवा कंबरदुखी त्रास द्यायला सुरूवात करत नाहीय तोपर्यंत प्रत्येकानं विक्रांतला भेट दिलीच पाहिजे, त्या युध्दनौकेचं, नौदलाचं असामान्यत्त्व समजून घ्यायलाच पाहिजे. त्यासाठी ५-७ तासांची तंगडतोड सहन केलीच पाहिजे.
एक सर्वसामान्य भारतीय नागरिक म्हणून आपण इतकं नक्कीच करू शकतो!



Comments

Unknown said…
khupa chan vatle read karun ha experience khupa chan asela na
i also like to see the vikrant i am definately go there next time
Naniwadekar said…
प्रीतिबाई : हा लेखही तुमच्या ब्लॉगची आमच्या मनात आधीच असलेली कीर्ती वाढवणारा आहे.

> मग आमच्यासारख्या पर्यटकांनी काढलेल्या काही फोटोंमुळे असा काय फरक पडणार होता?
>-----

सगळेच पर्यटक 'तुमच्यासारखे' नसतात. नौदलानी बेसावध राहण्यापेक्षा हे निर्बंध लादलेले कधीही चांगले. आणि शंभर वर्षांपूर्वी कधीच कशासाठीही कॅमेरा वापरत नसत. तर आताही एखाद्‌या दिवशी नाही वापरला तर काय बिघडेल?

> सी.एस.टी.च्या टॅक्सीवाल्यांना ‘टायगर गेट’ सांगितलेलं पुरतं असं कळलं. पण तेवढा जाणकार टॅक्सीवाला नेमका आमच्या नशिबी नव्हता.
>---

तुमचं लिखाण असंच रंजक राहो ही वाचकांतर्फे इच्छा आहेच; शिवाय त्याला टॅक्सीवाल्यांचाही पाठिंबा आहे, याचा आनन्द आहे.

- नानिवडेकर
नौदलानी बेसावध राहण्यापेक्षा हे निर्बंध लादलेले कधीही चांगले. >>>
निर्बंधांना माझा विरोध नाहीच. पण ते पुरेसे आहेत का हा प्रश्न आहे.
हेरंब said…
नेहमीप्रमाणेच मस्त लेख. माहिती आणि (थोडे) चिमटे यांची मस्त सरमिसळ.

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)