एव्हरेस्ट आणि अस्मिता
(१८ जून २००९ च्या लोकसत्ता-व्हिवा पुरवणीत आलेला हा लेख.) ॥१॥ किर्ती आमच्या वर्गात अस्मिता नावाच्या दोन मुली आहेत... एक अस्मिता देशपांडे आणि दुसरी अस्मिता शर्मा. एकीला हाक मारली की दोघीही वळून बघतात. म्हणून आम्ही त्यांची ‘मराठी अस्मिता’ आणि ‘हिंदी अस्मिता’ अशी नावं ठेवलीयेत. तशी अस्मिता शर्माही चांगलं मराठी बोलते. सातवीपासून आहे आमच्या वर्गात. पण घरी तिला हिंदी बोलायची सवय आहे. त्यामुळे शाळेत आमच्याशी बोलताना ती मधूनच कधीतरी हिंदीत सुरू करते. त्यामुळेही ती नावं त्यांना अगदी ‘फिट्ट’ बसतात. शिवाय, ‘काल अस्मिता भेटली होती... कोण अस्मिता? शर्मा की देशपांडे?... देशपांडे’ इतकी लांबड लावण्यापेक्षा ‘काल मराठी अस्मिता भेटली होती’ असा सोप्पा शॉर्टकटही मारता येतो आम्हाला! या त्यांच्या नावांवरून एकदा फुल्ल कॉमेडीच झाली - रोज सकाळी शाळेत ग्राऊंडवर प्रार्थनेनंतर ताज्या बातम्या माईकवरून सगळ्यांना वाचून दाखवल्या जातात. ते काम गेली अनेक वर्षं आमच्या समाजशास्त्राच्या आचरेकर बाईच करतात. त्यादिवशी कृष्णा पाटीलनं एव्हरेस्ट सर केल्याची प्रमुख बातमी होती. ती वाचून दाखवताना बाईंनी ‘मराठी अस्मिता उंचावेल