चार पायऱ्यांचा पर्वत
पेपरमध्ये एका ट्रेकची जाहिरात बघून तिचे डोळे एकदम चमकले. हातातला कॉफीचा कप तिनं ताबडतोब बाजूला ठेवला. डोक्यात भराभर विचारचक्रं फिरायला लागली... जायचं का? करू का फोन?... रविवारीच आहे, पहाटे उठून नवऱ्याचा आणि मुलाचा स्वयंपाक करून जाऊ... नवरा घरी असल्यामुळे मुलाचीही काळजी नाही... सगळी आखणी मनातल्यामनात झरझर तयार झाली आणि तिनं जाहिरातीत दिलेला नंबर फिरवला... "हॅलो, यूथ हॉस्टेल... " फोनमधून आवाज आला. 'अरे वा! लगेच लागला! ’ ती खूष झाली. तिनं चौकशी केली... प्रबळगड, कलावंतीण दुर्ग... माथेरानजवळ आहे म्हणे! तिचं भटकं मन लगेच माथेरानच्या आकाशात घिरट्या घालायला लागलं. "सकाळी सात वाजता पनवेल एस. टी. स्टँड वर जमायचं आहे" - पलिकडून पुढली माहिती आली. म्हणजे घरातून साडे-पाचला तरी निघायला हवं... त्यापूर्वी दोघांचा स्वयंपाक... बाप रे! म्हणजे चारला उठायला हवं... जमणार का?... स्वतःलाच विचारलेल्या या प्रश्नासरशी माथेरानच्या आकाशातून ती धाडकन जमिनीवर आली. "रात्री आठ-नऊ वाजेपर्यंत परत येता येईल."... म्हणजे फार उशीर नाही होणारे... नावनोंदणीसाठी अजून चार दिवस हाताशी होते...