पुस्तक परिचय : बाळूच्या अवस्थांतराची डायरी (किरण गुरव)

हे तीन मोठ्या कथांचं छोटंसं पुस्तक आहे. कथा, लघुकथा, दीर्घकथा – यांची नक्की व्याख्या कशी करायची याबाबत माझ्या मनात कायम गोंधळ असतो. माझ्या मते या पुस्तकातल्या तीनही कथा दीर्घकथा म्हणायला हव्यात. असो. पुस्तकातली पहिलीच (शीर्षक)कथा एक-नंबर आहे, भारी आहे, भन्नाट आहे, झकास आहे! बाळू हा कथानायक, निवेदक. कोल्हापूरजवळच्या खेड्यात दहावी झालेला. आणि आता त्याला कोल्हापूरच्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला आहे. तिथेच तो हॉस्टेलवर राहणार आहे. त्याला हॉस्टेलला सोडायला समस्त घर त्याच्यासोबत कोल्हापूरला आलं आहे- आई, वडील आणि धाकटे दोन भाऊ. एस.टी.तून ते कोल्हापूरच्या स्टँडवर उतरतात. तिथून पायी चालत मार्केटमध्ये, तिथून बस पकडून जरा गावाबाहेर असणार्या इन्स्टिट्यूटपर्यंत, आणि इन्स्टिट्यूटच्या मेनगेटपासून बाळूच्या हॉस्टेलच्या खोलीपर्यंत त्या कुटुंबाचा प्रवास, म्हणजे ही ७६ पानी कथा. हा प्रवास लेखकाने असा काही रंगवला आहे, की बस्स! पहिल्या १-२ पानावरच्या पावसाच्या वर्णनापासूनच आपण बाळूच्या छत्रीतून चालायला लागतो. डांबरी रस्त्यावर पडणार्या पावसाच्या धारांना दिलेली उपमा, धाकट्या भावाच...