पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)

रशियाने युक्रेनवर आक्रमण का केलं? अमेरिका हाच देश राजकीय, आर्थिक महासत्ता का बनला? आखाती देशांमध्ये सतत काही ना काही खदखदत का असतं? आफ्रिकेतले देश इतके गरीब का? चीनला दक्षिण अमेरिकेच्या आणि आफ्रिकेच्या भूभागात रस का आहे? असे एकगठ्ठा प्रश्न आपल्याला कधी पडत नाहीत. जागतिक राजकारण हा काही सर्वसामान्यांच्या आवाक्यातला विषय मानला जात नाही. त्यावर राजकारणी बोलतील, अभ्यासक बोलतील, तो आपला प्रांत नव्हे, असं म्हणून तो सोडून दिला जातो. Prisoners of Geography हे पुस्तक ही सोडून देण्याची मुभा आपल्यापासून हिरावून घेतं. आणि त्यात मजा आहे. एका वाक्यात या पुस्तकाचा गोषवारा सांगायचा, तर जगाच्या राजकारणात जे काही घडत आलेलं आहे, त्यामागे त्या-त्या देशांचं भौगोलिक स्थान, त्यांच्या आसपासची भौगोलिक परिस्थिती याच गोष्टी कारणीभूत आहेत, असं या पुस्तकात म्हटलेलं आहे. आणि हे इतक्या साध्या-सोप्या भाषेत सांगितलं आहे, की वाचताना आपण त्यात नकळत रमत जातो. पुस्तकात १० विभाग/प्रकरणं आहेत- रशिया, चीन, अमेरिका, पश्चिम युरोप, आफ्रिका, मध्य-पूर्व आशिया, भारत-पाकिस्तान, कोरिया-जपान, लॅटिन अमेरिका, आर्क्टिक प्र...