Posts

Showing posts from August, 2022

पुस्तक परिचय : मध्यरात्रीनंतरचे तास (तमिळ लेखिका – सलमा, अनुवाद – सोनाली नवांगुळ)

Image
पुस्तकाबद्दल लिहिण्यापूर्वी सलमा यांच्याबद्दल थोडंसं. (कारण त्यामुळेच मुळात मी हे पुस्तक वाचायचं ठरवलं.) सलमा हे त्यांचं टोपणनाव आहे. तामिळनाडूतल्या ग्रामीण भागात एका कर्मठ मुसलमान कुटुंबात त्या वाढल्या. त्यांच्या घरात मुलगी वयात आली की घरातल्या पुरुषांशिवाय इतर कुणाचीही तिच्यावर नजर पडू नये म्हणून तिचं घराबाहेर पडणं बंद केलं जात असे. अगदी तिचं शाळाशिक्षणही अर्धवट बंद होत असे. तिचं लग्न झालं की मगच तिची त्यातून सुटका होत असे. सलमा यांच्यावरही ती वेळ आलीच. त्यांनी विरोध करून पाहिला. पण उपयोग झाला नाही. पुढे ८-९ वर्षं त्यांनी अशी घराच्या चार भिंतींत काढली. त्यांना लहानपणापासून वाचन, कविता यांची आवड होती. त्यांनी मिळेल त्या कागदावर, जमेल तशा कविता करायला सुरुवात केली. ते कागद घरच्या मोठ्यांच्या दृष्टीस पडू नयेत म्हणून त्या कागदांच्या बारीक घड्या घालून लपवून ठेवत असत. काही काळाने त्यांच्या आईला हे समजलं. आईनं या बाबतीत मुलीच्या मागे उभं राहण्याचं ठरवलं आणि लपूनछपून ते कागद कुणा ओळखीच्यांकडे सोपवले. त्यांनी आणखी कुणा जाणकाराला ते दाखवले. त्या कविता पठडीबाहेरच्या, वेगळ्या असल्याचं त्यांच