पुस्तक परिचय : Before the Coffee Gets Cold (Toshikazu Kawaguchi)
टोक्योच्या एका गल्लीतल्या बेसमेंटमधल्या लहानशा जुनाट कॅफेत घडणारी गोष्ट आहे. कॅफेत येणार्यांना टाइम ट्रॅव्हलची सोय असते. मात्र त्यासाठी चार अटी असतात : - टाइम ट्रॅव्हल करून कॅफेच्या बाहेर जाता येणार नाही. - त्यामुळे अर्थातच भूतकाळात किंवा भविष्यकाळात त्या कॅफेत आलेल्या/येणार्या व्यक्तींनाच भेटता येईल. - भूतकाळात जाऊन वर्तमानकाळ बदलता येणार नाही. - हे सगळं करण्यासाठी कॅफेतल्या एका विशिष्ट जागी बसावं लागेल, समोर कपात वाफाळती कॉफी ओतली जाईल, ती कॉफी थंड होण्याच्या आत पिऊन संपवायची आणि वर्तमानकाळात परत यायचं. कॅफेत येणारी नेहमीची मोजकी गिर्हाइकं आणि कॅफेतले चार कर्मचारी एवढी पात्रं. त्या सर्वांना टाइम ट्रॅव्हलच्या सोयीबद्दल माहिती आहे. हा सेट-अप पाहून ज्या अपेक्षा निर्माण होऊ शकतात त्याहून पुस्तक खूप वेगळं आणि सुंदर आहे. कथानकात चार टाइम ट्रॅव्हल्स आहेत. त्यातले तीन भूतकाळात आणि एक भविष्यकाळात आहे. एक गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड, एक मध्यमवयीन जोडपं, दोन सख्ख्या बहिणी, आई-मुलगीची जोडी अशा चार कथा त्यात येतात. यातल्या प्रत्येक जोडीत आपांपसांत काही समज-गैरसमज झालेले असतात. ते फार का...