पुस्तक परिचय : Snowblind (Ragnar Jónasson)

आइसलँडच्या पार उत्तरेकडचं एक दुर्गम गाव. कादंबरीचा नायक पोलीस ऑफिसर आहे. त्याला पहिलंच पोस्टिंग या गावात मिळतं. गावातलं पोलीस स्टेशन अगदी लहानसं, स्टाफ अगदी मर्यादित. एकूण फक्त ३ जण. कारण तिथल्या हेडच्या म्हणण्यानुसार nothing happens here. गावात एक हौशी नाटक कंपनी असते. ती मंडळी दरवर्षी एक नाटक लिहून बसवून गावात सादर करत असतात. नाटकातले कलाकार, लेखक, दिग्दर्शक हीच कथानकातली मुख्य पात्रं आहेत. गावात २ मृत्यू होतात. एक अपघाती, एका परीने आसपास माणसं असताना. दुसरी आत्महत्या, संशयास्पद वातावरणात. पोलीस प्रमुख दोन्ही मृत्यू त्या-त्या रकान्यात टाकतो. पण नायकाला काही बारीकसारीक गोष्टी खटकत असतात. तो आडूनआडून तपास सुरू करतो. वर्षातला बराच काळ त्या भागात बर्फ आणि प्रचंड थंडी असते. अगदी कुंद वातावरण असतं. देशातल्या दक्षिण भागात वाढलेला नायक, त्याला हे वातावरण घुसमटून टाकत असतं. ही नोकरी स्वीकारली ती चूक झाली का हा विचार त्याला छळत असतो. त्याची मनाची अस्वस्थता कथानकात चांगली गुंफली आहे. प्रचंड बर्फवृष्टी झाल्यामुळे गावात येणारा एकमेव रस्ता बंद झालेला असतो. विमानसेवाही बंद असते. या...