पुस्तक परिचय : घाचर घोचर (विवेक शानभाग)
घाचर घोचर (विवेक शानभाग), अनुवाद : श्रीनाथ पेरूर एक सर्वसामान्य कुटुंब, जेमतेम खाऊनपिऊन व्यवस्थित राहत असलेलं, फॅमिली बिझिनेसमुळे आर्थिक स्थिती सुधारत जाते. त्याचबरोबर कुटुंबाची नैतिकता नकळत ढासळत जाते... असं कथानक आहे. प्रथमपुरुषी निवेदन, फ्लॅशबॅकमध्ये येणारी कथा. निवेदक, त्याची बायको, आधीची प्रेयसी वाटावी अशी एक व्यक्तिरेखा, निवेदकाचे आई-वडील, घटस्फोटित बहीण आणि काका. काकामुळे बिझिनेस वाढीस लागतो, निवेदकाला काही काम नसतं, बिझिनेसमधून पगार मिळत असतो. त्यामुळे त्याची बायको मात्र नाराज असते. त्यावरून त्यांचे संबंध जरा ताणले गेलेले असतात. बहिणीचं लग्न आणि मुख्यत्वे घटस्फोट हे जरा बटबटीतपणे येतं. पण तसंच अभिप्रेत असावं. शेवट अधांतरी ठेवलाय. त्याने पुस्तक एकदम उंचीवर जातं. वाचकांच्या मनात 'नेमकं काय झालं असावं?' हा विचार घोळत राहतो. तसंच, वर्तमानकाळ आणि फ्लॅशबॅकमध्ये मारलेल्या उड्या खूप इंटरेस्टिंगली येतात. त्यामुळे गुंतून जाऊन पुस्तक वाचलं गेलं. कथानकाच्या अनुषंगाने आलेली काही वाक्यं, विधानं खूप छान आहेत. हे पुस्तक खूप गाजलं, अनेक भाषांमध्ये त्याची भाषांतरं झाली आहेत...