उत्तर युरोप : भटकंती जेव्हा सरप्राइजेस देते (भाग ४)
आमच्या महिन्याभराच्या भटकंतीचा शेवटचा दिवस. डेन्मार्कमधल्या हेलसिंगॉर (Helsingør) इथला ‘क्रॉनबोर्ग कॅसल’ पाहायला निघालो होतो. रेनेसाँ काळातला उत्तर युरोपमधला हा एक महत्त्वाचा किल्ला. कोपनहेगन ते हेलसिंगॉर हा पाऊण तासाचा ट्रेन प्रवास, किल्ल्याचं स्थापत्य, थोडाफार इतिहास आणि किल्ल्यालगतची खाडी- त्या दिवसाच्या भटकंतीची इतकी पूंजी देखील भरपूर ठरली असती; स्वच्छ हवा, अहाहा गारवा, शांत वातावरण ही नेहमीची यशस्वी मंडळी जोडीला होतीच; मात्र आमच्या पर्यटकी ललाटावर त्याहून अधिक काही लिहिलेलं होतं आणि किल्ल्यात आतवर जाईपर्यंत त्याची आम्हाला कल्पना नव्हती. ठरलेली ट्रेन पकडून हेलसिंगॉरला पोहोचलो. स्टेशनवरून चालत, रस्ता शोधत शोधत कॅसल गाठला. तिकीट काढून आत शिरलो. तिथे येणार्या सर्वांनाच किल्ल्यात सहज मार्ग शोधत फिरता यावं अशी व्यवस्था होतीच. शिवाय तिकिटासोबत एक माहितीपत्रक आणि नकाशाही मिळालेला होता. माहितीपत्रकात लिहिल्यानुसार, क्रॉनबोर्ग किल्ल्याचा अभिजात इंग्रजी साहित्याशीही घनिष्ट संबंध आहे; कारण शेक्सपिअरच्या ‘हॅम्लेट’ नाटकाचं कथानक याच किल्ल्यात घडताना दाखवलं आहे. (नाटकात हॅम्लेट ...