वस्ती जेव्हा रंगमंच बनते
सात ते सतरा वयोगटातली अंदाजे २३० मुलं. त्यांचे वीस गट. प्रत्येक गटाने एकेक नाटिका बसवली. नाटिकांच्या विषयांत, मांडणींत, संवाद-प्रसंगांत अनेकदा बदल झाले. जवळपास चार महिने तयारी चालू होती, तालमी होत होत्या. सगळी लगबग, गडबड सुरू होती... ऐकून कुणालाही वाटेल की हे कुठल्या तरी ‘हाय प्रोफाइल’ नाट्यस्पर्धेचं वर्णन असणार. हो, एका अर्थाने ही नाट्यस्पर्धाच होती, पण त्यात स्पर्धेचं एलिमेण्ट शून्य होतं. उलट, तिथे होता ‘आमचे नाटक.....हमारा नाटक’ हा जल्लोष! नाटकाबद्दल असा द्विभाषिक आपलेपणा दाखवणारी कोण बरं ही पोरं? ज्यांना रंगमंच म्हणजे काय, अभिनय कशाला म्हणतात हेच ठाऊक नाही, अशी ही पोरं. पण तरीही हे नवखे कलाकार नाटकाच्या चौकटीत, रंगमंचाच्या तीन भिंतींच्या अवकाशात उभे राहिले. तिथे चौथ्या भिंतीचं नसणं हेच त्यांना त्यांच्या उपेक्षित विश्वातून बाहेर काढणार होतं, अभिव्यक्ती नामक एका गोष्टीशी त्यांची ओळख करून देणार होतं. हा होता ‘अ स्लम थिएटर फेस्टिव्हल’, रंगभूमीवर मनस्वी जीव असणार्या एका बुजुर्ग कलावंताच्या अंत:प्रेरणेतून साकारलेला ‘वंचितांचा रंगमंच’. जगातला अशा प्रकारचा बहुधा पहिलाच प्रयोग. -----