स्त्रिया आणि ब्लॉगिंग
तुम्ही कधी उंच डोंगराच्या कड्यावर उभे राहून दरीपल्याड आवाज दिला आहेत? त्वरित ऐकू येणार्या प्रतिध्वनीने तुम्हाला आनंदून जायला झाले आहे? असे कधी ना कधी नक्कीच घडलेले असणार. त्या आनंदामागचे कारण एकच असते - त्या ठिकाणी व्यक्त होण्यासाठी हाताशी असलेले एकमेव साधन आपण यशस्वीपणे वापरलेले आहे हे तुम्ही मनोमन ओळखलेले असते. प्रतिध्वनी हा खरेतर ‘बोनस’, मुळात खच्चून ओरडणे ही तुमच्या अभिव्यक्तीची त्या क्षणीची गरज पूर्ण झालेली असते. ब्लॉग-विश्व हे काहीसे असेच आहे. समोर अथांग अशी आंतरजालाची दुनिया पसरलेली असते. त्या पसार्यात आपलाही आवाज कुणीतरी ऐकावा अश्या आंतरिक इच्छेपोटी आधुनिक जगातील ब्लॉगरूपी खणखणीत साधन वापरून एक साद दिली जाते. ती कुणी ऐकेल, न ऐकेल, ही झाली नंतरची बाब, ‘बोनस’च्या स्वरूपातील. पण व्यक्त होणे ही प्राथमिक गरज मात्र तिथे भागलेली असते. ब्लॉग्ज्च्या माध्यमातून स्त्री-अभिव्यक्तीचे कुठले निरनिराळे आविष्कार पहायला मिळतात, त्यातून त्यांचे व्यक्तिमत्त्व कशा तर्हेने डोकावते, त्यांच्यात काही साम्यस्थळे आढळतात का, हे पाहणे मोठे मनोरंजक ठरते. लेखन, चित्रे, फोटो, व्हिडिओ अश्या अनेक तर्ह...