पुस्तक परिचय : 'द फर्म'
रविवार, दि.१० एप्रिल २०११ रोजी लोकसत्ता-लोकरंग पुरवणीत प्रकाशित झालेला पुस्तक-परिचयपर लेख. मूळ लेख इथे (स्क्रोल डाऊन करून) वाचता येईल. ------------------------------- ‘The Firm’ ही जॉन ग्रिशॅमची पहिली अशी कादंबरी की ज्यामुळे त्याला अमाप प्रसिध्दी मिळाली. वकिली पेश्याच्या पार्श्वभूमीवरील वेगवान कथानक, थरारक घटनांची तितक्याच कुशलतेने केलेली मांडणी ही ग्रिशॅमच्या लेखनातील वैशिष्ट्ये या कादंबरीतदेखील आढळतात. या कादंबरीची अनिल काळे यांनी अनुवादित केलेली आवृत्ती ‘द फर्म’ याच शीर्षकाने मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केली आहे. ही कादंबरी मुखपृष्ठापासूनच वाचकांची पकड घेते. मु्खपृष्ठावर वरच्या भागात एखाद्या कॉर्पोरेट कार्यालयाचे वाटावे असे चित्र आणि त्याखाली अंधाऱ्या रात्री कशापासून किंवा कुणापासूनतरी लांब पळू पाहणारा एक उंची पेहरावातील तरुण... हार्वर्ड लॉ स्कूलमधून शिक्षण घेऊन नुकताच बाहेर पडलेला हा तरुण वकील आहे मिचेल मॅकडिअर ऊर्फ मिच. अतिशय हुशार असलेल्या मिचने प्रतिकूल कौटुंबिक आणि आर्थिक परिस्थितीत आपले कायद्याचे शिक्षण पूर्ण केलेले असते. साहजिकच तो आणि त्याची सुस्वरूप पत्नी अॅबी ...