पुस्तक परिचय - आवा
लोकसत्ता-लोकरंग पुरवणीत प्रकाशित झालेला (रविवार, दि. २० फेब्रुवारी २०११) माझा पुस्तक-परिचयपर लेख. (मूळ लेख इथे वाचता येईल.) ------------------------------------------ चित्रा मुद्गल या हिंदीतील नावाजलेल्या लेखिका. विद्यार्थीदशेपासूनच त्यांचा कामगार चळवळींशी अगदी जवळून संबंध आला. कामगारांच्या आणि विशेषतः त्या समाजातील स्त्रियांच्या समस्या त्यांनी जवळून पाहिल्या; अनुभवल्या. त्या सर्व अनुभवांचा परिपाक म्हणजे त्यांची ‘आवा’ ही कादंबरी. आवा - म्हणजे कुंभाराची भट्टी. कादंबरीत ही भट्टी प्रतिक बनून निरनिराळ्या रूपांत वाचकांसमोर येते. कामगारांच्या दैनंदिन जीवनात परिस्थितीचे चटके देणारी भट्टी, चंगळवादी समाजाची जणू खाजगी मालमत्ता भासणारी पैश्यांची ऊब देणारी भट्टी, आपल्याला निव्वळ उपभोग्य वस्तू मानणार्या समाजाला खडसावू पाहणारी स्त्री-क्षमतेची भट्टी आणि भविष्याची स्वप्ने पाहणार्या तरुणवर्गाच्या मानसिकतेची भट्टी. नायिका नमिता पांडेय ही विशीतील तरूणी. कामगार चळवळीतील आघाडीचे नेते असलेले तिचे वडील पक्षाघातामुळे अंथरुणाला खिळले आहेत. घरची अर्थिक परिस्थिती बेताचीच. त्यामुळे पाच जणांच्या कुट...