दंगल
प्राजक्ता पुन्हा एकदा सायलीचा नंबर फिरवावा काय या विचारात होती. इतक्यात तिचाच फोन वाजला. कॉलर आयडी मुंबईचा नंबर दाखवत होता. सायोचाच फोन असणार असं मनाशी म्हणत सोफ्यावर बसकण मारत तिनं रिसीव्हर उचलला. "हॅलो..." "हॅलो... हं, प्राजू, बोल, सायली बोलतेय. फोन केला होतास? निरोप मिळाला मला दिपककडून..." "आहात कुठे नोमॅडिक नेमाडेबाई? सकाळपासून सारखा फोन लावायचा प्रयत्न करतेय. मगाशी तुझ्या रूमपार्टनरलाही करून बघितला. ती म्हणाली की तू अजून ऑफिसमधेच आहेस. शेवटी निरोप ठेवला तुझ्या त्या दिपकजवळ." "ए, ‘तुझ्या’ दिपकजवळ काय? आमचा ऑफिस बॉय आहे तो. कशासाठी फोन करत होतीस?" "घ्या! आज तुझा स्पेश्शल दिवस. म्हटलं तुला फोन करावा, गप्पा माराव्यात..." "अर्र तिच्या! सॉरी, सॉरी, लक्षातच नाही आलं माझ्या." "अगं सायो, काय हे! स्वतःचा वाढदिवसही विसरलीस? इतकी काय अगदी कामात गढलीयेस?" "ए बाई, जरा बाहेरच्या जगात काय चाल्लंय ते पण बघत जा! टी.व्ही. लावलायस का सकाळपासून?" "छे! मी तर सकाळपासून तुला फोन लावण्यातच बिझी आहे." ...