एका शर्टाची गोष्ट
नुकतीच एका लग्नाला जाऊन आले. लग्नासारखे समारंभ म्हणजे एकत्र भेटण्याचे, गप्पाटप्पा करण्याचे अगदी हुकुमी प्रसंग. अशा कुठल्याही समारंभाला हजेरी लावण्यामागे निदान माझं तरी हेच प्रमुख उद्दीष्ट असतं. एकाच ठिकाणी, एकाच वेळी अनेक नातेवाईक, सुहृद, मित्रमैत्रिणी भेटतात. सर्वजण बोलावल्यासरशी आले म्हणून यजमानही खूष असतात (निदान तसं दाखवतात) आणि याहीपेक्षा महत्त्वाचं कारण म्हणजे एक साग्रसंगीत जेवणाचं ताट आयतं पुढ्यात येतं! मला माहितीय, मनातल्या मनात सर्वांना हे कारण अगदी पुरेपूर पटलेलं आहे. विशेषतः दररोज सकाळ संध्याकाळ स्वयंपाकघरातल्या ओट्याशी झुंजणार्या तमाम महिलावर्गाला... आणि काही अपवादात्मक पुरूषांनाही. (हो! आजकाल या रटरटत्या क्षेत्रात ही जमातही हळूहळू पाय रोवते आहे.) तर असंच ते ही एक लग्न होतं. ‘लग्न’ नामक मोतीचुराचा हा लाडू खाऊन पस्तावलेले, पस्तावूनही काही उपयोग नसतो हे उमगलेले अनेकजण आपापसांत गप्पा मारण्यात, सुखदुःखाच्या गोष्टी करण्यात मग्न होते. पस्तावलेली इतकी माणसं आसपास असूनही डोळ्यांवर कातडं ओढून घेऊन त्या मोतीचुराच्या लाडूची चव घेण्यास आसुसलेलं त्यादिवशीचं ‘उत्सवमूर्ती’ जोडपं एकीकडे...