दंतमनोरंजन
माणूस दंतवैद्याकडे का आणि केव्हा जातो? या प्रश्नाला खरं म्हणजे काही अर्थ नाही. का जातो? - नाइलाज म्हणून; आणि केव्हा जातो? - नाइलाज झाल्यावर! कुणालाही विचारलं तर या प्रश्नाला एवढी दोनच उत्तरं मिळतील. तसंही, कुठल्याही वैद्य अथवा डॉक्टरकडे कुणीही नाइलाज झाल्याशिवाय जातच नाही म्हणा. दंतवैद्याकडे तर नाहीच नाही. मी मात्र गेले काही महिने दंतवैद्याकडे मनोरंजन करून घ्यायला जाते आहे! म्हणजे तिथे जाण्यामागचं माझं उद्दिष्ट मनोरंजन अथवा करमणूक करून घेण्याचं नसतं पण माझी करमणूक होते, आपोआपच! या सगळ्याची सुरुवात झाली ती माझ्या मुलाच्या दातांवरच्या उपचारांपासून. आपल्या दातांना 'ब्रेसेस' लावून घेण्याची अतिशय, नितांत, प्रकर्षानं, भयंकर गरज असल्याचा त्याला साक्षात्कार झाला आणि आमचा दंतवैद्याचा शोध सुरू झाला. 'शोधा म्हणजे सापडेल' या म्हणीच्या आड, शोधल्या म्हणजे ज्या-ज्या सापडतील अशा जगभरातल्या अक्षरशः असंख्य गोष्टींची यादी लपलेली आहे... दातांचा दवाखाना ही त्यातलीच एक. माणसं दंतरुग्ण जरी नाईलाजानं बनत असली तरी दंतवैद्य मात्र अगदी आवडीनं, आनंदानं बनत असावीत. नाहीतर रोजच्या भाजी, वाणसामान आ...