स्वप्न नावाचं आश्चर्य
लग्नाचा एक मोठा हॉल, पाहुण्यांनी खचाखच भरलेला... एक मध्यमवयीन महिला प्रफुल्लित चेहर्यानं हॉलमधे प्रवेश करते. तिची एक अतिशय लाडकी गर्भरेशमी साडी तिने नेसलेली आहे; साडीला साजेसे दागिने घातलेले आहेत... तिकडे लांबवर, हॉलच्या अंतर्भागात वधू-वर लग्नविधींत मग्न आहेत. त्यामुळे तिला त्यांचे चेहरे दिसत नाहीत... मात्र पाहुण्यांच्या गर्दीत बहुतेक सगळे चेहरे तिच्या परिचयाचे आहेत. त्यामुळे बरेचजण तिच्याकडे पाहून हसत आहेत, हात हलवत आहेत, ओळख देत आहेत, काही आपणहून येऊन तिच्याशी जुजबी गप्पा मारत आहेत, काही जणांशी ती जाऊन बोलत आहे... असं करत करत ती हळूहळू लग्नविधींच्या जागेकडे सरकते... आता गर्दीत तिला तिच्या स्वतःच्याच घरची, सासरची वरिष्ठ मंडळी दिसायला लागली आहेत. पण त्यांना तिथे पाहून तिला मुळीच आश्चर्य वाटलेलं नाही किंवा हे सगळे असताना त्यांच्याबरोबर न येता आपण अशा एकट्याच का आलो इथे हा प्रश्नही पडलेला नाही... ती वधू-वरांजवळ पोहोचेपर्यंत तिथलं दृष्य मात्र आता अचानक बदललं आहे. आता तिथे ग्रुप-फोटो-सेशन सुरू झालं आहे. वधू-वरांचे चेहरे अजूनही तिला दिसलेले नाहीत. ते पाहण्याच्या आटोकाट प्रयत्नात असतानाच फ...