पहिला धडा
केशव गजाभाऊ कदम. वय वर्षे २२. नोकरीत फारसा रस नसलेला एक पदवीधर; आई वडील नोकरी शोध म्हणून मागे लागलेले असताना आजकाल काही नवे सवंगडी भेटलेला, आपणही त्यांच्यातलंच एक व्हायचं या वेडानं हळूहळू झपाटायला लागलेला एक पदवीधर; ना उच्च, ना कनिष्ठ, नुसत्याच मध्यमवर्गाचा तरूण प्रतिनिधी असा एक पदवीधर. गेले काही दिवस केशव खूप उत्साहात होता. निवडणुका जाहीर होणार होत्या. पार्टीचे कार्यकर्ते म्हणून मिरवणारे केशवचे नवे सवंगडी त्याला अधूनमधून ‘समाजविधायक’ कामांमध्ये मदत करायला बोलवत असत. केशवनं ओळखलं होतं की हीच संधी आहे. आपण मन लावून, तहानभूक विसरून, झपाटून पार्टीचं पडेल ते काम करू. कॉलेजातली पदवी तर मिळवून झाली पण आता या निवडणुका संपेस्तोवर आपल्या नावापुढे ‘पार्टीचा तरूण कार्यकर्ता’ ही पदवीही झळकायलाच हवी. त्यादृष्टीनं आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे हे देखील केशवनं तेव्हाच ओळखलं होतं जेव्हा सातआठ दिवसांपूर्वी दिनेशकरवी संभादादांनी त्याला अनपेक्षितपणे बोलावून घेतलं होतं. त्यादिवशी दादांनी त्याच्यावर सोपवलेली एक महत्त्वाची कामगिरी आज त्याला पार पाडायची होती. ‘आता आई-आप्पांना समजेलच थोड्या दिवसांत की ...