सांगड : झेंडावंदनाची, दहीहंडीची आणि विज्ञानाची!
किर्ती समाजशास्त्राचं प्रोजेक्ट संपलं तशी शाळेत पंधरा ऑगस्टच्या विज्ञान-प्रदर्शनाची गडबड सुरू झाली. पण आमच्या पाचजणींपैकी कुणीच त्यात भाग घेतलेला नसल्यामुळे जरा बरं होतं. प्रदर्शनात भाग घेतलेला नसला तरी प्रदर्शन बघायला आम्हाला आवडतं. ते आम्ही करणारच आहोत. पण दरम्यान आम्ही आपापसांत एक वेगळाच प्लॅन केला होता. प्रज्ञाच्या आत्याच्या घराजवळ एका मुलींच्या गोविंदा-पथकाची रोज रात्री प्रॅक्टिस असते. प्रत्यक्ष गोकुळाष्टमीदिवशी गर्दीत जाऊन ‘लाईव्ह दहीहंडी’ कधीच बघता येत नाही. म्हणून आम्ही काल ती प्रॅक्टिस बघायलाच गेलो होतो. प्रज्ञाची आई आमच्या बरोबर आली होती. एखाद्या हिंदी सिनेमाच्या जाहिरातीसाठी नाही का ते ‘द मेकिंग ऑफ अमूक’, ‘बिहाईंड द सीन्स् ऑफ तमूक’ दाखवत असतात सारखं... कधी कधी प्रत्यक्ष सिनेमापेक्षा ते कार्यक्रमच जसे छान वाटतात, तसंच टी. व्ही. वर दरवर्षी ज्या दहीहंड्या दाखवतात त्यापेक्षा हा सराव बघायलाच जाम मजा आली. त्या मुली सहा-सात थर तर लावतच होत्या पण आठव्या थरासाठीही त्यांचा प्रयत्न चालू होता. सहाव्या आणि सातव्या थरावर चढणाऱ्या मुली तश्या लहानच होत्या - तिसरीचौथीतल्या. पण त्यांच्या इत...