अश्वेत राष्ट्राध्यक्ष आणि अश्वेत टी. व्ही. स्क्रीन!
मी कीर्ती सुपुत्रे. इ. ९ वी. सध्या आमच्या वर्गात वार्षिक परीक्षेसाठी निबंधलेखनाचा सराव चालू आहे. आमच्या बाई म्हणतात की "नेहमीच्या ’दूरदर्शन : शाप की वरदान’, ’फलाटाचे आत्मवृत्त’, ’जिचे हाती पाळण्याची दोरी... ’ यांसारख्या हमखास येणाऱ्या विषयांव्यतिरिक्त - (त्याला आम्ही मैत्रिणी ’हमखास भेडसावणारे विषय’ म्हणतो! ) - तर त्यांव्यतिरिक्त चालू घडामोडींपैकी एखाद्या विषयावर पण निबंध लिहिता आला पाहिजे. " आला पाहिजे तर आला पाहिजे! पण आजच्या ’चालू घडामोडी’ या परीक्षेच्या वेळेपर्यंत ’घडून गेलेल्या घडामोडी’ नाही का होणार? मग आता केलेल्या सरावाचा काय उपयोग तेव्हा? आणि परीक्षेच्या वेळी ज्या घडामोडी चालू असतील त्यावर तेव्हा बिनसरावाचा निबंध कसा काय लिहायचा? मुंबईवर अतिरेकी हल्ला झाल्यानंतर बाईंनी आम्हाला "त्यासंदर्भात एकतरी निबंध येणारच" असं ठामपणे सांगितलंय. "पुढचे काही दिवस रोजचा पेपर वाचा, अग्रलेख वाचा, त्या विषयाची तयारी करून ठेवा" असंही त्या सांगत असतात. पण रोजच्या पेपरमध्ये त्याविषयी जास्त काही माहिती मिळतच नाही. ’कसाब आमचा नाही’ आणि ’तुमच्या देशातले अतिरेकी तळ उद्ध्...