... आणि कल्पनेचं वारू (कायमचं) खाली बसलं!
'स्त्री' मासिकाच्या ऑगस्ट-२०११च्या अंकात हा लेख प्रकाशित झाला. ----------------------------------------------------- खाद्यपदार्थांच्या काही जोड्या या ऐकताक्षणी विजोड वाटतात. जसं पिठलं-पोळी. म्हणजे, वेळप्रसंगी भुकेला ही जोडी काही वाईट नाही पण पिठलं-भाकरी ची मजा त्यात नाही हे ही खरं. आमटीभात किंवा आमटीभाकरी खाणाऱ्याला पोट भरल्याचं समाधान नक्कीच वाटेल. पण आमटी-ब्रेड? झालं ना तोंड वाकडं? चिवड्यावर दही किंवा ताक अनेकजण घेतात पण चिवड्यावर दूध कसं लागेल? किंवा चकली दुधात बुडवून खाल्ली तर? तर काही नाही; फक्त दिवाळी, फराळ आणि एकंदरच मराठी खाद्यसंस्कृतीचा बट्ट्याबोळ ठरलेला!... कल्पनेचं वारू चौखूर उधळवून सुद्धा या पलिकडे मला उदाहरणं सुचेनात. पण कधी कधी प्रत्यक्ष आयुष्यातच असे अनुभव येतात की ते वारू देखील उधळणं विसरून, आपले चारही खूर आवरून मटकन खाली बसतं. आता हेच पाहा ना... सात-आठ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आमच्या शेजारी एक उच्चशिक्षित उत्तर भारतीय कुटुंब राहत असे. (पुढे येणाऱ्या वर्णनाचा त्यांच्या उत्तर भारतीय असण्याशी काहीही संबंध नाही. तेव्हा कृपया... सूज्ञांस अधिक सांगणे न लगे. ) म...