पुस्तक परिचय : मास्तरांची सावली (कृष्णाबाई सुर्वे)

प्रांजळ, प्रामाणिक आत्मकथन. साधीसुधी, गप्पा मारल्यासारखी भाषा. सुर्वे दांपत्याचं बालपण, तरुणपणीचा काळ केवढा ओढगस्तीचा होता! मधला काही काळ तर अक्षरशः अन्नान्न दशा होती. ते वाचताना अंगावर काटा येतो. नारायण सुर्वे शाळाशिक्षक होते, तर कृष्णाबाई एका शाळेत शिपाई होत्या. त्यांना चार मुलं झाली. प्रत्येकाची काही ना काही शोकांतिका झाली. अशातही आनंदी, खेळकर स्वभाव टिकवून ठेवणे, काव्यलेखन, आलागेला-पै पाहुणा, सगळं करणे, याची कमाल वाटते. त्याकाळची मुंबई पुस्तकात ठिकठिकाणी येते. ती चित्रं मनात उभी करायला मजा आली. कृष्णाबाईंनी पूर्णपणे स्वत:च्या नजरेतून, स्वत:च्या आयुष्याबद्दल लिहिलंय. नारायण सुर्वेंच्या कवि म्हणून कारकीर्दीतल्या महत्वाच्या गोष्टींबद्दल पुस्तकात केवळ उल्लेख येतात, ते मला आवडलं. लहानपणापासून कृष्णाबाईंचा स्वभाव विचारी, खमका होता. त्यांच्याजवळ भक्कम आत्मविश्वास होता. मात्र लग्नानंतर त्या नोकरी करत असल्या तरी इतर घराबाहेरची कामं, पैशांचे व्यवहार त्यांनी कधीच केले नाहीत; सुर्व्यांच्या कोणत्याही सत्काराला, सार्वजनिक कार्यक्रमाला त्या गेल्या नाहीत; हे वाचून आश्चर्य वाटलं. ...