पहिला धडा
लोकप्रभा दिवाळी अंक कथास्पर्धा (२०१६), प्रथम क्रमांक ------------------------------------ चहा-आंघोळ उरकून , बाहेर पडून केशवनं आपल्या बाईकला किक मारली तेव्हा सकाळचे नऊ वाजत होते. दोन वर्षांपूर्वी साधारण याच सुमाराला आप्पांनी त्याला एका नोकरीत चिकटवला होता. त्याला सोयीचं व्हावं म्हणून ऑफिसमधल्या एकांकडून ही सेकण्ड-हॅण्ड बाईक घेतली होती. आप्पा एक मोठ्या सरकारी कंपनीतले तृतीय श्रेणी कर्मचारी ; रहायला कंपनीच्या कॉलनीतल्या ‘ एफ ’ लायनीतलं दोन खोल्यांचं बैठं घर होतं. घराबाहेर बाईक उभी करण्याइतपतही जागा नव्हती. तर घराच्या चतकोर व्हरांड्यात बाईक चढवून ठेवता यावी म्हणून त्यांनी तेव्हा पदरमोड करून एक छोटासा रँपही तयार करवून घेतला होता. कामावर जायचं म्हणून तेव्हा केशव घाईघाईत आवरून साडेसातला घराबाहेर पडायचा. पण आजच्या एक दशांश उत्साहही तेव्हा त्याच्या अंगात नसायचा. रँपवरून बाईक खाली उतरवताना तो रोज एकदा मनोमन चरफडायचा. आप्पांना आपली स्वप्नं कळत नाहीत याचा सगळा तळतळाट तो बाईकच्या किकवर काढायचा. जेमतेम सहा-एक महिनेच त्यानं ती नोकरी केली असेल. नोकरी सोडायची ठरवली ...