पुस्तक परीचय - ’सोन्याच्या धुराचे ठसके’
पूर्णपणे भिन्न भाषेशी, संस्कृतीशी, जीवनमानाशी काही कारणाने संबंध आला, तर त्याची तुलना आपल्या स्वतःच्या राहणीमानाशी, संस्कृतीशी करणे, दोन्हींतली साम्यस्थळे शोधणे, विरोधाभासांवर बोट ठेवणे ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. अगदी आठ-पंधरा दिवसांची परदेशी सहल केली, तरी प्रत्येकाच्या मनात अशा तौलनिक निरीक्षणांचा भरपूर साठा जमा होतो. मग काहीजण त्याला प्रकट रूप देतात, गप्पांचे फड रंगवून आपले अनुभवरूपी किस्से इतरांना सांगतात. त्या सहल-संचिताचा जीव तेवढाच असतो. पण जेव्हा पोटापाण्यासाठी प्रदीर्घ काळ परदेशात वास्तव्य करण्याची वेळ येते, तेव्हा परक्या संस्कृतीशी जुळवून घेतानाच्या अपरिहार्यतेतून झालेली सुरूवातीची ओढाताण, स्वतःला त्या मुशीत जाणीवपूर्वक घडवत जाण्याचा हळूहळू झालेला सराव आणि त्या ओघात व्यक्तीमत्त्व आणि वयोमान या दोहोंपरत्त्वे स्वतःशीच नोंदली गेलेली विविध निरीक्षणे ही नुसती निरीक्षणे न राहता सखोल आणि अभ्यासू चिंतनाची डूब घेत मनाचा तळ गाठतात. ‘सोन्याच्या धुराचे ठसके’ हे डॉ. उज्ज्वला दळवी यांनी केलेले असेच एक प्रकारचे सखोल आणि अभ्यासू चिंतन आहे. हे चिंतन जगासमोर आणताना त्याचे स्वरूप तितक...