सर्वोकृष्ट `रिअॅलिटी शो’
महिलांच्या पळण्याच्या कुठल्यातरी शर्यतीची (बहुतेक ४०० मीटर्स) एक प्राथमिक फेरी चालू होती. शर्यत सुरू होताच प्रेक्षकांचा सुरू झालेला गोंगाट हळूहळू वाढत गेला. स्पर्धक महिलांनी एक एक करून अंतिम रेषा ओलांडली. एकमेकींचं अभिनंदन केलं. ज्यांनी पात्रता निकष पूर्ण केले होते त्यांना कॅमेरावाल्यांनी घेराव घातला. शर्यत पूर्ण होताच प्रेक्षकांचा टिपेला पोहोचलेला टाळ्यांचा गजर थोडासा कमी झाला आणि पुन्हा एकदा नव्या जोमानं सुरू झाला. आधी वाटलं, प्राथमिक फेरीतच एखादं रेकॉर्ड वगैरे मोडलं गेलं की काय; ते प्रेक्षकांच्या उशीराने लक्षात आलं की काय. पण नाही. कारण निराळंच होतं. शर्यत पूर्ण केलेल्या, थकल्या-भागल्या, कॅमेर्याला किंवा प्रेक्षकांना अभिवादन करणार्या धावपटूंवरून कॅमेरा एकदम पॅन झाला आणि पुन्हा एकदा ट्रॅकवर स्थिरावला. प्रथम तिथे कुणीच नजरेस पडलं नाही. नक्की काय प्रकार चाललाय--असं मनात येईपर्यंत ट्रॅकवरून धावणारी एक आकृती दिसली. कॅमेरा हळूहळू झूम-इन होत गेला आणि लक्षात आलं, की अजून एका धावपटूची शर्यत पूर्ण व्हायची होती. जरा आश्चर्यच वाटलं आधी. Faster, Higher, Stronger या शब्दांना लाजवेल अशा ऑलिंप...