पुस्तक परिचय - ’आठवणींच्या जगात. जर्मनीतील तीन तपांचा अनुभव.'
सध्या चाळीशीत किंवा पन्नाशीत असलेल्या पिढीला निरुपमा प्रधान या भारताच्या एक प्रसिध्द बॅडमिंटन खेळाडू होत्या हे कदाचित आठवत असेल. काही अपवाद वगळता (खासकरून क्रिकेट) आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवलेले आपले खेळाडू नंतर काय करतात, कुठे जातात याबद्दल आपल्याला फारसे ठाऊक नसते. त्याबद्दल जाणून घेण्याचा आपण विशेष प्रयत्नही करत नाही. या अनुषंगाने ‘आठवणींच्या जगात. जर्मनीतील तीन तपांचा अनुभव.’ हे पुस्तक म्हणजे निरुपमा प्रधान यांनी बॅडमिंटन कारकीर्दीला निरोप दिल्यानंतरच्या त्यांच्या आयुष्याचा दीर्घ असा लेखाजोखा म्हणता येईल, जो त्यांनी स्वतःच्या शब्दांमधे वाचकांसमोर मांडलेला आहे. शीर्षकावरून सूचित होते, त्यानुसार जर्मनीतील तीस-पस्तीस वर्षांच्या वास्तव्याचे हे अनुभवकथन आहे. अतुल सोनाळकर यांच्याशी लग्न करून १९६८ साली निरुपमा प्रधान यांनी जर्मनीत (तेव्हाचा पश्चिम जर्मनी) पाऊल ठेवले. जास्तीत जास्त दीड ते दोन वर्षे तिथे रहायचे आहे या तयारीने त्या तिथे गेल्या होत्या. पण त्यांचे तिथले वास्तव्य वाढत गेले आणि पुढील पस्तीस वर्षे त्या तिथल्या मातीत जणू रुजूनच गेल्या. त्यांचा संसार, दोन्ही मुलांचे जन्म, त्य...