हंड्रेड पर्सेंट डिव्हाईन !!
 ‘बालगंधर्व’ चित्रपटावर भरपूर चर्चा केली, वाचली, ऐकली. ती चर्चा कानावर पडली नसती तरी सिनेमा पहायचा तर ठरवलाच होता. तसा तो ही पाहीला. सिनेमा पहायला बरोबर चक्क आमचे चिरंजीव आले होते. (आमच्या अर्धांगाच्या मनोरंजनाच्या कल्पना निराळ्याच असल्यामुळे अश्या कामी बहुतेकवेळा मुलाचीच मला साथ-सोबत असते. तो एक स्वतंत्र चिंतनाचा विषय आहे. असो.) सिनेमा पाहून आल्यावर सुबोध भावे, त्याची वेषभूषा, सिनेमातले सेट्स आणि बालगंधर्वांच्या आयुष्यातल्या नव्याने कळलेल्या काही गोष्टी हेच सगळं मनात जास्त घोळत राहीलं.  काही दिवस गेले. अचानक पेपरमध्ये एक जाहीरात आली - ‘असा बालगंधर्व आता न होणे’ : बालगंधर्व चित्रपटावर आधारीत गाणी, गप्पा, किस्से यांचा कार्यक्रम. स्थळ - गडकरी रंगायतन, ठाणे. कार्यक्रमाचं आयोजन सिनेमाचा सहाय्यक संगीत दिग्दर्शक आदित्य ओक यानं केलं होतं.  ट्रान्सफॉर्मर-३ची रिलीज डेट पाहण्यासाठी पेपर उघडलेल्या माझ्या मुलाची नजर प्रथम त्या जाहीरातीवर गेली. तो ‘आई, आपण या कार्यक्रमाला जायचंच.’ असं म्हणत अक्षरशः उड्या मारत माझ्याजवळ आला. मी प.फ.ची आ. मानून दुसर्या दिवशी आधी कार्यक्रमाची तिकिटं काढून आणली. सहभाग...