गोळीबाराच्या खुणा... अश्या आणि तश्या.
आत्ता चाळीशीत प्रवेश करणारे माझ्यासारखे अनेकजण ऐंशीच्या दशकातील पंजाबमधील हिंसाचाराच्या बातम्या ऐकत, वाचत मोठे झालेले आहेत. एकमेव दूरदर्शनचं चॅनल असण्याच्या त्या काळात संध्याकाळच्या प्रादेशिक किंवा रात्रीच्या राष्ट्रीय बातम्यांमध्ये खलिस्तान, भिंद्रनवाले, शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी, लोंगोवाल, अकाली दल, सुवर्ण मंदीर, ऑपरेशन ब्लू-स्टार या संज्ञाच सतत कानावर पडायच्या. इंदिरा गांधींची हत्या, नंतर (चक्क पुण्यात) जनरल अरुणकुमार वैद्य यांची हत्या, त्याबद्दलच्या बातम्या, त्यामुळे काहीसे सटपटलेले घरातल्या मोठ्यांचे चेहरे हे सर्व अजूनही माझ्या चांगलं लक्षात आहे. तेव्हा शाळेत येता-जाता रस्त्यात एखाददुसरा फेटेवाला शीख दिसला तर त्याला बावरल्या नजरेनं निरखलं जायचं. इंदिरा गांधींच्या हत्येच्या दुसर्या दिवशी सकाळी त्याबद्दलच्या मोठ्यांच्या सर्व चर्चा ऐकल्यावर, ताजं वर्तमानपत्र घरच्या सर्वांचं वाचून झाल्यावर, मी पुन्हा गुपचूप हातात घेतलं होतं आणि त्यातलं सतवंतसिंग आणि बियांतसिंगचं वर्णन दोन-तीनदा वाचलं होतं. एका सुरक्षारक्षकानेच हत्या करण्यातला विरोधाभास आणि त्या सुरक्षारक्षकाचं शीखधर्मीय असण...