Posts

Showing posts from November, 2010

स्वप्न नावाचं आश्चर्य

लग्नाचा एक मोठा हॉल, पाहुण्यांनी खचाखच भरलेला... एक मध्यमवयीन महिला प्रफुल्लित चेहर्‍यानं हॉलमधे प्रवेश करते. तिची एक अतिशय लाडकी गर्भरेशमी साडी तिने नेसलेली आहे; साडीला साजेसे दागिने घातलेले आहेत... तिकडे लांबवर, हॉलच्या अंतर्भागात वधू-वर लग्नविधींत मग्न आहेत. त्यामुळे तिला त्यांचे चेहरे दिसत नाहीत... मात्र पाहुण्यांच्या गर्दीत बहुतेक सगळे चेहरे तिच्या परिचयाचे आहेत. त्यामुळे बरेचजण तिच्याकडे पाहून हसत आहेत, हात हलवत आहेत, ओळख देत आहेत, काही आपणहून येऊन तिच्याशी जुजबी गप्पा मारत आहेत, काही जणांशी ती जाऊन बोलत आहे... असं करत करत ती हळूहळू लग्नविधींच्या जागेकडे सरकते... आता गर्दीत तिला तिच्या स्वतःच्याच घरची, सासरची वरिष्ठ मंडळी दिसायला लागली आहेत. पण त्यांना तिथे पाहून तिला मुळीच आश्चर्य वाटलेलं नाही किंवा हे सगळे असताना त्यांच्याबरोबर न येता आपण अशा एकट्याच का आलो इथे हा प्रश्नही पडलेला नाही... ती वधू-वरांजवळ पोहोचेपर्यंत तिथलं दृष्य मात्र आता अचानक बदललं आहे. आता तिथे ग्रुप-फोटो-सेशन सुरू झालं आहे. वधू-वरांचे चेहरे अजूनही तिला दिसलेले नाहीत. ते पाहण्याच्या आटोकाट प्रयत्नात असतानाच फ...

सरणार कधी...

सताड उघडी रात्र, चार भिंतींच्या कोंदणात न मावणारी...! आसपास जाग असूनही भेडसावणारी, रस्त्यांवर दिवे चालू असूनही काळोखी भासणारी! सारिका शून्य नजरेनं पाहत होती. खुल्या आकाशाखाली अशा कित्येक रात्री तिनं पूर्वीही काढल्या होत्या - एखाद्या गडाच्या माचीवर, डोंगरातल्या, कडेकपार्‍यांतल्या गुहेत किंवा बालेकिल्ल्याच्या उरल्यासुरल्या अवशेषांच्या संगतीत. आत्ता अवतीभवती होते शेजारपाजारी, तर तेव्हा बरोबरचे सवंगडी, उत्साही सखे-सोबती आणि सुनयना! रात्रीच्या शांततेत सर्वांचं कुजबुजत, दबक्या आवाजात बोलणं दोन्हीकडे सारखंच. होता फक्त एकच फरक... मनाला झोके घ्यायला बोलावणारा तेव्हाचा स्वच्छंदीपणा आणि त्याच मनाला बधीर करून सोडणारी आत्ताची ही अनिश्चितता! खरंतर मेंदूनं भराभर विचार करायला हवा होता. भावनेच्या आहारी जाणार्‍या मनाला ताळ्यावर आणायला हवं होतं. पण यातलं काहीही होत नव्हतं. सारिका नुसती शून्य नजरेनं पहात होती. डोक्यावरती होतं तेच ते काळं आकाश. वर्षानुवर्षांच्या परिचयाचं. नेहमीसारखंच चांदण्यांचं प्रदर्शन मांडून बसलेलं. पण खाली काय चाललंय हे त्याच्या गावीही नव्हतं. आणि पायाखाली... त्याक्षणी जमीन होती. ...