घरोघरी मातीच्या चुली
"अहो, तुमची पाहुण्यांची यादी झाली का तयार?" "वेगळी तयार काय करायचीय? तू घे लिहून, मी सांगतो..." "आता तेवढं एकच काम आहे का मलाऽऽ? सतरा व्यवधानं आहेत. लिहून घे काय? तुम्हीच लिहून द्या मला आज संध्याकाळपर्यंत." "(आठ्या घालून) आजच्या आज??" "ओरडताय कायऽऽ? तुम्हाला जराही गांभीर्य कसं नाही हो? वधूपक्ष आहे आपला. सगळी व्यवस्था चोख नको? घरच्या कामात लक्ष कमीच तुमचं पहिल्यापासून. मी आहे म्हणून चाललंय सगळं सुरळीत इतकी वर्षं...!" ---------- "अगं, तुझी पाहुण्यांची यादी दे माझ्याकडे. दोन्ही याद्या एकत्र करतो आणि आजच पत्रिका करायला टाकतो. तेवढंच तुझं एक मोठं काम होऊन जाईल." "पत्रिका काय करायला टाकतो? तुमचीच यादी द्या इकडे. मला एकदा ती नजरेखालून घालायला नको??" "(हताशपणे) अगं, ती ‘माझ्या’ पाहुण्यांची यादी आहे ना? मला करायला सांगितलीस ना? तशी केलीय मी. आता तू पुन्हा त्यात काटछाट कुठे करतेस?" "(संशयास्पद नजरेने) म्हणजे, काटछाट करण्याजोगी नावं आहेत तर त्यात...! आणा तो कागद इकडे." "अगं, पण..." ...