दोन पुरातन पासवर्ड्स
एकदा पंधरा ऑगस्टच्या आसपास कधीतरी आमच्या केबलवाल्यानं एका दुपारी चक्क ‘२२ जून १८९७’ हा सिनेमा लावला होता. मी टी.व्ही. लावला तेव्हा सिनेमा अर्धाअधिक संपला होता पण तरीही मला तो पाहून एकदम नॉस्टॅल्जिक वगैरे व्हायला झालं. शाळेत असताना जुन्या कृष्ण-धवल दूरदर्शनवर जितक्या वेळा तो लागायचा तितक्या वेळा आईची बोलणी खात मी तो पाहीलेला होता. मी ताबडतोब माझ्या मुलाला मस्का, गूळ इ.इ. लावून शेजारी बसवून घेतलं आणि तो उर्वरित सिनेमा पहायला लावला. ‘मुंग्यान् मेरुपर्वत तर नाय ना गिळलनीत...’च्या आविर्भावात माझा मुलगा आश्चर्यानं माझ्याकडे बघायला लागला. आई आपणहून टी.व्ही.वरचा सिनेमा बघ म्हणतीए म्हणजे काय! पण पडत्या फळाची आज्ञा मानून तो लगेच माझ्या शेजारी येऊन बसला. (प.फ.ची आज्ञा मानली नाही तरी आई ब.भ. म्हणजे बर्यापैकी भडकते - हे त्याचंच वाक्य!) पडद्यावर रॅन्डच्या खुनाचं दृश्य सुरू झालं. "गोंद्या आला रे...", जोडीला घोड्याच्या टापांचा आवाज. "गोंद्या आला रे..." आता, सिनेमातले संवाद लक्षपूर्वक ऐकायच्या फारशा फंदात न पडल्यामुळे माझ्या शेजारच्या त्या विसाव्या शतकात जन्मलेल्या आणि एकविसा...