मी, एक ‘गजर’वंत
अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. अखिल मानवजातीची ही जी काही धावपळ, धडपड चालली आहे ती या गरजा भागवण्यासाठीच. त्या धावपळीत माझाही रोजचा थोडाफार वाटा असतोच. या दैनिक धावपळीचं अविभाज्य अंग म्हणजे पहाटे लवकर उठणे आणि माझं घोडं, जागं होता होता, पहिलं तिथेच अडतं! त्यामुळे, रोजची ही धावपळ सत्कारणी लावायची असेल तर माझ्यासाठी अन्न, वस्त्र आणि निवारा या यादीत अजून एका गोष्टीचा समावेश होणं अतिशय गरजेचं आहे आणि ती गोष्ट म्हणजे गजराचं घड्याळ! रोज सकाळी कानाशी घड्याळाच्या गजरानं बोंबाबोंब करणं ही माझी दिनक्रमातली पहिली आणि मूलभूत गरज आहे. त्या गजरानं जर योग्य वेळी मला उठवलं नाही तर मग (उठण्याच्या बाबतीत) माझ्यावर पूर्णपणे अवलंबून असणार्या बाकीच्या दोघांचं काही खरं नसतं... मग आदल्या दिवशीच्या उरलेल्या ‘अन्ना’चा नाश्ता उरकावा लागतो, इस्त्री-बिस्त्रीच्या फारश्या फंदात न पडता शाळेची आणि ऑफिसची ‘वस्त्रं’ अंगावर चढवावी लागतात आणि धावतपळत ‘निवारा’ सोडावा लागतो. गजराच्या मदतीशिवाय स्वतःहूनच पहाटे उठणारे आणि उठल्या उठल्या टवटवीतपणे लगेच आपापल्या कामाला लागणारे तमाम ‘उषाचर’ प्राणी म्हण...