‘ब्रेक्झिट’, ‘इटलीव्ह’च्या पाठोपाठ...

जर्मनीघ !!
फ्रान्सटक !!
हंगरीजा !!
हे काय आहे? कसल्या घोषणा? नाही. हे आहेत मराठी भाषेला बहाल होऊ शकणारे काही नवे शब्द.
काय आहे, की दरवर्षी ऑक्सफर्ड शब्दकोशातर्फे इंग्रजी भाषेत नव्याने दाखल झालेल्या शब्दांची यादी जाहीर केली जाते. त्या यादीतले शब्द वाचून कधीकधी अवाक व्हायला होतं. इंग्रजी भाषेचं कौतुक वाटतं. मराठीतही अशी फ्लेक्झिबिलिटी हवी असं वाटून जातं! वरचे तीन शब्द म्हणजे त्याच जाणीवेचा स्वतःपुरता एक छोटासा हुंकार म्हणता येईल. (शेवटी व्यापक बदलांची सुरूवात अशी वैयक्तिक पातळीवरूनच व्हायला हवी.) तर या शब्दांच्या मेकिंगबद्दल...

२०१६ मधला एक गाजलेला इंग्रजी शब्द म्हणजे ब्रेक्झिट’. गंमत बघा, ‘ब्रेक्झिटच्याच जोडीने मैदानात उतरलेल्या ब्रेमेनशब्दाला हे वलय लाभलं नाही. ग्रेट ब्रिटनच्या सार्वमतात ब्रेमेनवाल्यांना बहुमत मिळालं असतं तरीही ब्रेक्झिट हा शब्दच शर्यत जिंकला असता हे नक्की.

या ब्रेक्झिटबद्दल ऐकलं, थोडंफार वाचलं; आणि मग मी एका जबाबदार (परदेशी) नागरिकाच्या भूमिकेतून ब्रिटनमधल्या दोघा मित्रमंडळींशी त्यावर माफक चर्चा केली. त्यातला एक ब्रेक्झिटच्या बाजूचा आणि दुसरा ब्रेमेनच्या बाजूचा निघाला, हा निव्वळ योगायोग. पण त्यामुळे माझ्या आयुष्यातल्या फॉरेन अफेअर्समध्ये कसा परफेक्ट बॅलन्ससाधला गेला. पहिल्या मित्राने दुसर्‍याला, म्हणजे दुसर्‍याच्या गटाला शिव्या घातल्या; दुसर्‍याने पहिल्याला घातल्या. युरोपियन युनियन कशी सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनात ढवळाढवळ करते आहे हे पहिल्याने तावातावाने सांगितलं. दुसर्‍याने सुस्कारा टाकत ब्रेमेनच्या बाजूने दिलेलं आपलं मत कसं वाया गेलं हे सांगितलं. पहिल्याने या मतदानात भाग घेतला होता की नाही हे पहिल्याला विचारायचंच राहिलं.

याच ओळीतला एक नवा शब्द नुकताच ऐकला - इटलीव्ह’. यंदा इटलीत निवडणुका होतील आणि तिथला उजव्या विचारसरणीचा पक्ष जिंकला तर कदाचित इटलीही ब्रेक्झिट करेल; आय मीन, इटलीव्ह प्रत्यक्षात येईल. आणि ती ईयुच्या शेवटाची सुरूवात असेल.
हे वाचलं आणि डोक्यात शब्दांचेच वारेवाहायला लागले. ईयुमधून बाहेर पडणार्‍या प्रत्येक देशासाठी असे शब्द तयार करायचे झाले तर ते कसे असतील? २०१७ सालच्या अखेरीस त्यातलाच एखादा सर्वात गाजलेला ठरेल का? यावर इंग्रजीत विचार करता करता वाटलं, मराठीचं ग्लोबलपण वाढवण्याची यात केवढी मोठी संधी आहे! युरोपात कैक मराठी माणसं नोकरी-व्यवसायानिमित्त जाऊन राहिलेली आहेत. काही येऊन-जाऊन असतात. पर्यटनाला तर मराठी आणि गुजराथ्यांचीच युरोपात सर्वाधिक गर्दी असते. तिथल्या मातीला पाय लागणार्‍यांच्या ग्लोबल जाणीवा जागृत व्हायच्या तर त्यांच्या संभाषणात, मराठी वाचनात तिथल्या भवतालाशी रिलेट होऊ शकणारे शब्द असतील तर ते फायद्याचंच ठरेल. नजीकच्या भविष्यकाळात फ्रान्स, जर्मनी, इटली हे ईयुचे संस्थापक देश निवडणुकांना सामोरे जाणार आहेत. मग निवडणुकांपश्‍चात तिथे काही उलथापालथ झाली तर? या दोन्ही देशांतल्या जनतेने ईयुतून बाहेर पडण्याचं ठरवलं तर? तेव्हा वापरायला कामी येऊ शकतील असे शब्द आत्ताच पाडून घेतले तर बरं. (नवीन शब्द तयार करण्याला इंग्रजीत कॉईन करणेअसा वाक्प्रचार आहे. आपल्याकडे नाणी पाडतात. म्हणून हे शब्दही पाडलेत!)

तर असे ते शब्द. जर्मनी ईयुतून बाहेर पडलं तर जर्मनीघ! (जर्मनी-नीघ). फ्रान्सने बाहेर पडायचं ठरवलं तर फ्रान्सटक! (फ्रान्स-सटक). हंगरीने ईयुला टाटा-बायबाय केलं तर हंगरीजा! (हंगेरी-घरी जा). त्यांच्यामागोमाग पोलंडही ईयुची वेस पोलांडूनजाऊ शकतो. बल्गेरियाच्या एक्झिटवर ‘बल्गेलाबघ!’ अशी सार्वजनिक प्रतिक्रिया उमटू शकते.

हे लिहिता लिहिता ईयु म्हणजे एक व्हॉटसअ‍ॅप ग्रूप आहे आणि त्यातून एक-एक करून मेंब्रं बाहेर पडतायत असं दृश्य समोर आलं. क्रोएशिया हा ईयुमध्ये सामिल झालेला अखेरचा देश. लास्ट इन लास्ट आऊटनियमाने ग्रूपमधे क्रोएकटाच उरेल. मग बाहेर पडला काय किंवा नाही पडला काय काहीच फरक पडणार नाही. पण तोवर मराठीला तब्बल सहा ग्लोबल नवशब्द मिळालेले असतील.

Comments

Popular posts from this blog

इयत्ता दहावी पास

पुस्तक परिचय : सीझन्स ऑफ ट्रबल (श्रीलंकन यादवीच्या उपोद्घाताच्या यातना)

`इज पॅरीस बर्निंग?' ...जेव्हा एका पुस्तक परत भेटतं!