टुमॉरो वुई डिसअपिअर

दिल्लीत ‘कठपुतली कॉलनी’ नावाची एक वसाहत आहे... ५०-६० वर्षांपूर्वीची... तिथे जवळपास अडीच ते तीन हजार लोक राहतात... ही सारी कुटुंबं म्हणजे पारंपरिक कठपुतळ्यांचा खेळ करणारी; जादूचे-हातचलाखीचे प्रयोग करून दाखवणारी; नाहीतर डोंबार्‍यासारखे खेळ करणारी, कसरती करून दाखवणारी... अशा प्रकारची ही आशियातली बहुधा सर्वात मोठी वसाहत आहे...
यातलं मला काहीही माहिती नव्हतं, ‘टुमॉरो वुई डिसअपिअर’ हा माहितीपट बघेपर्यंत!

या वसाहतीत राहतो एक कठपुतली कलाकार - पुरन भट. त्याच्या पाठोपाठ कॅमेरा त्या वसाहतीतून फिरायला लागतो. अरुंद गल्लीबोळ, घरांची खुराडी, उघडी गटारं, अस्वच्छता... पुरनला हिंदी सिनेगीतांची आवड असावी. ती गाणी ऐकता ऐकता तो आपल्या कठपुतळ्यांची साफसफाई, रंगरंगोटी करताना दिसतो; नवीन काही कठपुतळ्या तयार करताना दिसतो. आपल्याला तो त्याच्या कठपुतळ्यांचं कलेक्शनच दाखवतो. एका कोंदट, अंधार्‍या खोलीत त्याने त्या सार्‍या बाहुल्या ठेवल्या आहेत. त्यांच्या गराड्यातच एका खुर्चीवर तो बसतो. पण त्याला तिथे खूप बरं वाटतं आहे.
पुरन परदेशांमधे अनेक ठिकाणी आपली कला सादर करून आलेला आहे. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रपती असताना त्यांच्या हस्ते त्याला पुरस्कारही मिळालेला आहे - नॅशनल अवॉर्ड फॉर ट्रॅडिशनल आर्ट्स. हे ऐकल्यावर इतकं चमकायला झालं! कारण, थेट राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळवणारा पारंपरिक कलाकार जिथे राहतो ती जागा, ते ठिकाण कसं असेल याचं आपण आपल्या डोळ्यांसमोर साधारण एक चित्र उभं करतो. उगीचच. मनाशी काही धारणा असतात आपल्या. आणि माहितीपटाच्या पहिल्या फ्रेमपासून जी वस्ती आपल्याला दिसते ती या चित्राच्या जवळपासही जाणारी नसते. इथे शहरी, सुखवस्तू प्रेक्षक म्हणून आपण एक पाऊल पुढे सरकलेले असतो. स्क्रीनवरच्या दृश्यांमधून आता काहीतरी नवीन, अनोळखी आपल्यासमोर येणार आहे याची बारीकशी जाणीव व्हायला लागते...

त्याच वसाहतीत राहणारा रहमान शाह. हा जादूगार आहे. रस्त्याच्या कडेला तो हातचलाखीच्या करामती दाखवतो. थोडेफार पैसे कमावतो. त्याबदल्यात पोलीस त्याच्याकडून लाच घेतात. तुटपुंज्या कमाईतून रहमानला पोलिसांची मागणी पूर्ण करणे शक्य नाही. मग पोलीस त्याला हुसकून लावतात. रहमानला दोन मुलगे आहेत. रहमानचं काम बघून बघून ते दोघंही घरात तसंच काहीबाही जादू-जादू खेळतात. रहमानला प्रश्न पडलाय की या मुलांना आपल्या कलेत पारंगत करावं की नाही?

माया पवार ही सर्कशीतल्याप्रमाणे शारिरीक कसरती करून दाखवणारी तरुण मुलगी. एक मुलगी म्हणून तिला अतिरिक्त आव्हानांना तोंड द्यावं लागतं आहे.

हे सारं आपल्याला का दाखवलं जातंय?

२००९ साली कठपुतली कॉलनीची जागा दिल्ली सरकारने रहेजा डेवलपर्सला विकली. दिल्ली शहर झोपडपट्टीमुक्त करण्याच्या मोहिमेचा हा एक भाग. वसाहतीच्या जागेवर त्या रहिवाश्यांना राहायला नवी घरं मिळतील. पण त्यासाठी आधी सध्याच्या वस्तीवर बुलडोझर चालवावा लागणार आहे. वस्तीतल्या रहिवाश्यांसाठी सरकारने रहेजा डेवलपर्सला तात्पुरती पर्यायी घरं बांधून द्यायला सांगितलं आहे. त्यातली काही नमुना घरं तयार आहेत. वस्तीतल्या रहिवाश्यांनी ती घरं पाहून स्वीकृतीच्या कागदपत्रांवर सही करायची आहे.
वस्तीत प्रतिनिधींच्या बैठका होतात, वादविवाद, मतभेद होतात. पुरनसारखे नेमस्त पुढाकार घेऊन काही शेजारपाजार्‍यांसोबत तो ट्रान्झिट कँप पाहायला जातात. वसाहतीपासून तो तसा लांबच आहे. म्हणजे गेली ३०-४० वर्षं बसलेली घडी पूर्णपणे मोडून तिथे जाऊन राहावं लागणार. ट्रान्झिट कँपमधली घरंही काही प्रतिनिधींना पसंत नाहीत. तिथे पुन्हा त्यांची चर्चा झडते, विरोध-मतभेद सगळं होतं. पण स्वीकृती अपरिहार्य आहे हे सर्वांनाच आत कुठेतरी माहिती आहे.
माया पवार या सगळ्याबद्दल खूप आशावादी आहे. तिच्यासारख्यांना बदल हवा आहे; यातून काहीतरी चांगलं निष्पन्न होईल असं तिला वाटतं आहे. वस्तीतला आपला बाडबिस्तरा आवरून ट्रान्झिट कँपमध्ये राहायला जाणार्‍या सुरूवातीच्या काहीजणांपैकी ती एक आहे. पुरन, रहमानचं मात्र अजून पक्कं ठरत नाहीये. जरा प्रतिकार, विरोध दर्शवावा का, अधिक चांगलं काही पदरात पाडून घ्यावं का... भविष्यात आपल्यापुढे काय वाढून ठेवलं असेल याची त्यांच्या अनुभवी, संसारी, खस्ता खाल्लेल्या मनांना शाश्वती नाहीये...

दिवस बुडायला आला आहे... पुरन आपली एक लहानशी बाहुली घेऊन तिला आपल्या बोटांच्या इशार्‍यांवर नाचवताना दिसतो... जन्मभर तो हेच करत आलेला आहे... आता त्याचं नशीब त्याला आपल्या बोटांच्या इशार्‍यांवर नाचवणार आहे... विकासाच्या, शहरीकरणाच्या तडाख्यात त्याची पारंपरिक कला तगणार की उद्‌ध्वस्त होणार हे कुणालाच माहिती नाही... रहमानची मुलं त्याच्याकडून जादूचे प्रयोग शिकून त्यावर उदरनिर्वाह करू शकतील का याची रहमानला खात्री नाही... काळोख होत चालला आहे... आला दिवस ढकलणारी ही माणसं आता आला क्षण ढकलणार आहेत...!

२०१४ साली बनलेला हा माहितीपट. सहज उत्सुकता म्हणून मी नेटवर या वसाहतीचं पुढे काय झालं याची शोधाशोध केली. बरीच उलट-सुलट वृत्तं वाचायला मिळाली. आजही ही वसाहत पूर्णपणे रिकामी झालेली नाही. रहिवाश्यांना हुसकून लावण्यासाठी पोलीसांनी बलाचा, अश्रूधुराचा वापर केला, लोकांना मारहाण केली, वगैरे. त्यात जखमी झालेल्यांचे फोटो आहेत... दुसरीकडे डी.डी.ए.ची (दिल्ली डेवलपमेंट अथॉरिटी) वृत्तं खूपच आशादायक... साफसुथर्‍या, नीटनेटक्या ट्रान्झिट-कँप्सचे फोटो, विडिओ...

माहितीपटाचे निर्माते-दिग्दर्शक जिमी गोल्डब्लम, अडम वेबर यांचा इतकाच उद्देश आहे, की कठपुतली कॉलनीचं पुनर्वसन व्यवस्थित पूर्णत्त्वाला जावं. कॉलनीच्या रहिवाश्यांना अगदी सुरूवातीला दाखवल्या गेलेल्या स्वीकृतीच्या कागदपत्रांमध्ये त्यांना दोन वर्षं ट्रान्झिट-कँपमध्ये राहावं लागेल असं लिहिलेलं होतं. ती दोन वर्षं कधीच उलटून गेली आहेत...
हे चित्र नेहमीचंच, आपल्या सर्वच महानगरांमध्ये दिसणारं... माहितीपटात सुरूवातीला मला जे वाटलं होतं, की काहीतरी नवीन, अनोळखी समोर येणार आहे, ते फसवंच होतं तर!

Comments

Popular posts from this blog

इयत्ता दहावी पास

पुस्तक परिचय : सीझन्स ऑफ ट्रबल (श्रीलंकन यादवीच्या उपोद्घाताच्या यातना)

`इज पॅरीस बर्निंग?' ...जेव्हा एका पुस्तक परत भेटतं!