सुमंगलेऽऽ, माफी असावी...!

साधारण ३-४ वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. डिसेंबर महिना संपत आला होता. मी नेहमीचं किराणासामान वगैरे काहीतरी आणायला दुकानात गेले होते. दुकानदाराने सुटे पैसे परत करताना सोबत एक लंबुळकं कॅलेंडर ‘फ्री’ दिलं. ‘आणखी एक कॅलेंडर कशाला हवंय’ असं मनाशी म्हणत मी ते तिथेच ठेवून येणार होते. त्यापूर्वी मी ते तिथल्यातिथे सहज उघडून पाहिलं. जेमतेम वीतभर रुंदीचं आणि फूटभर उंचीचं ते कॅलेंडर; पुढल्या वर्षाच्या जानेवारी महिन्याच्या तारखा एकाखाली एक लिहिलेल्या, प्रत्येक तारखेसमोर दोन-एक इंचांची रिकामी जागा; पानाच्या तळाशी त्या दुकानाची जाहिरात; पुढे फेब्रुवारीचं पान, अशी बारा पानं. आपसूक माझी नजर जानेवारीच्या पानाच्या मागच्या बाजूकडे गेली. (इतक्या वर्षांची सवय!) तर प्रत्येक महिन्याची मागची बाजू पूर्णपणे कोरी होती. इतकं आटोपशीर कॅलेंडर मी प्रथमच पाहत होते. पटकन मनात विचार आला, की घरातल्या ‘नेहमीच्या यशस्वी कॅलेंडर’च्या प्रत्येक तारखेच्या आसपास इतर माहितीची इतकी भाऊगर्दी असते, की मला महत्त्वाच्या वाटणार्‍या दूध-पेपर-इस्त्रीच्या नोंदी, मोलकरणीने कधी दांड्या मारल्या त्याच्या नोंदी, गॅस सिलेंडरबद्दलच्या नोंदी, आणखी कसकसली रिमाईंडर्स, हे सगळं त्या-त्या तारखांना लिहायला जागाच नसते; तेव्हा हे त्यासाठी वापरायला चांगलं आहे. त्यामुळे मी ते कॅलेंडर दुकानदाराला परत न करता सामानाच्या पिशवीत टाकलं आणि घरी आले.
नवीन वर्षाच्या सुरूवातीपासून मी लगेच त्या कॅलेंडरचा संसारी वापर सुरू केला. बघताबघता मला त्याची सवय झाली. तेच कॅलेंडर सोयिस्कर वाटायला लागलं. थोड्याच दिवसांत मला जाणवलं, की दुसर्‍या मोठ्या कॅलेंडरकडे मी आता ढुंकूनही पाहत नाहीये. तसंही, सणवार, एकादशी-संकष्टी, पौर्णिमा कधी-अमावास्या कधी, सूर्याचा अमुकतमुक नक्षत्रात प्रवेश वाहन - घोडा, या गोष्टींशी माझा कधीच फारसा संबंध येत नाही. फक्त तारीख-वार पाहायला आणि वर म्हटलं त्या नोंदींपुरतंच मला कॅलेंडर लागतं. तर तसं ते ‘मिनीमल-कॅलेंडर’ मला हळुहळू फारच आवडायला लागलं.
ते वर्ष संपत आलं. डिसेंबरच्या दुसर्‍या पंधरवड्यात मी त्या दुकानात परत २-४ चकरा मारल्या; काहीबाही खरेदी केली; पण यावेळी तसं ‘फ्री’ कॅलेंडर मिळालंच नाही. एव्हाना मी तर ठरवून टाकलेलं होतं, की पुढल्या वर्षी मोठं कॅलेंडर घ्यायचंच नाही. मग आम्ही सरळ एक्सेलमधे मिनी-कॅलेंडरसारखी बारा पानं तयार केली आणि ती प्रिंट केली. त्याच्या बारा पट्ट्या कापून, स्टेपल करून घरच्याघरी तसंच एक कॅलेंडर तयार केलं आणि भिंतीवर टांगलं. तेव्हापासून गेली तीन वर्षं आम्ही असंच कॅलेंडर तयार करून वापरतो आहोत.
पहिल्या वर्षी जाणवलं, की एक्सेल-शीटमधून प्रिंट काढताना प्रत्येक महिन्याची मागची बाजू कोरी राहते आहे. मग पुढल्या वर्षी पर्यावरणवादी विचार करून पाठपोट प्रिंटस काढली. प्रिंट काढताना आणि ती कापून स्टेपल करताना इतका घोळ घातला, की जानेवारी पालटला की एप्रिल, सप्टेंबरच्या मागे मे असले प्रकार झाले. दर महिन्याला नवीन पान शोधताना जाम भंजाळायला व्हायचं. तो महिना सोडून इतर सगळे महिने लगेच सापडायचे. मग त्याच्या पुढच्या वर्षी पर्यावरणवादीपणा कायम ठेवून ही चूक सुधारली. पहिल्या वर्षी घरी येणार्‍या पाहुण्यांपैकी वगैरे काहीजणांनी ‘काय हे! कॅलेंडर नाही तुमच्याकडे...’ अशी वाक्यं ऐकवली. आमचं ‘मिनिमल-कॅलेंडर’ म्हणजे त्यांच्या दृष्टीने कॅलेंडर नव्हतंच! पण हळुहळू त्यांनाही त्याची सवय झाली.
२०१७ हे आमच्या अशा कॅलेंडरचं चौथं वर्ष आहे... and we are loving it!!

Comments

Popular posts from this blog

इयत्ता दहावी पास

पुस्तक परिचय : सीझन्स ऑफ ट्रबल (श्रीलंकन यादवीच्या उपोद्घाताच्या यातना)

`इज पॅरीस बर्निंग?' ...जेव्हा एका पुस्तक परत भेटतं!