काही ऑस्करविजेते चित्रपट

गेल्या ८-१५ दिवसांत काही ऑस्करविजेते चित्रपट पाहिले.


'द आर्टिस्ट' -
स्पेशल इफेक्टस् आणि कम्प्युटर ग्राफिक्सच्या युगात एखाद्याला मूकपट काढावासा का वाटतो - ही मुख्य उत्सुकता होती. पण सिनेमा पाहिल्यावर जाणवलं, की बोलपट काढला असता, तर तो अन्य सर्वसाधारण सिनेमांप्रमाणेच झाला असता.
नायक - ज्याँ दुयॉर्दिन (उच्चार अ ओ, आता काय करायचं) - त्याचा चेहरा किती एक्स्प्रेसिव्ह आहे!
आयुष्यातल्या भरभराटीच्या काळात, आनंदी, उल्हसित नायक हसतो, तेव्हा त्याचे डोळेही हसतात. कठीण काळात तो अधूनमधून केविलवाणा हसतो, तेव्हा मात्र डोळे हसत नाहीत. हे पडद्यावर दाखवणं किती कठीण आहे!
२०च्या दशकाचा उत्तरार्ध वेषभूषेतून आणि भवतालातून निव्वळ अफलातून उभा केलेला आहे. (कथानक हॉलिवूडमधे घडतं. पण हा सिनेमा एक फ्रेंच निर्मिती आहे - हे मला टायटल्स पाहताना कळलं.)
विकीपेडियावर दिलंय, की It was also the first film presented in the 4:3 aspect ratio to win since 1955's Marty,
मग या aspect ratioला गूगल केलं. ती एक तांत्रिक बाब आहे हे तर झालंच, पण सिनेमाच्या एकत्रित प्रभावी परिणामामागे हे एक महत्त्वाचं कारण असावं - असं जाणवलं.
घरच्या टी.व्ही.वर पाहतानाच इतकं परिणामकारक आहे, तर सिनेमा-हॉलमधे अधिकच परिणामकारक वाटेल यात शंका नाही. ('रीगल'ची फार आठवण झाली.)

'द डिसेण्डण्टस्'
गेल्या वर्षी सर्वोकृष्ट चित्रपटाचं ऑस्कर यालाच मिळायला हवं होतं, ते डावलून 'द आर्टिस्ट' ला दिलं गेलं - असं वाचनात आलं होतं.
कथानक बॉलिवूडला जवळचं आहे. विवाहबाह्य संबंधात अडकलेला पुरूष आणि त्याला अखेर माफ करणारी त्याची बायको - असं नॉर्मली सूत्र असतं. यात माफ करणारा नवरा आहे. पण त्या माफीला निराळी छटा आहे. खरंतर अख्खा सिनेमा त्या छटेभोवतीच आहे. हवाईतलं वातावरण, वेषभूषा, स्थानिक लोकांचा वावर - हे छान घेतलंय.
जॉर्ज क्लूनीचा अभिनय अप्रतिम. ('ओशन्स इलेव्हन'सारख्या सिनेमात तो का असतो - असा प्रश्न पडला हा सिनेमा पाहिल्यावर...) त्याच्या मोठ्या मुलीचं काम करणारी अभिनेत्री - Shailene Woodley - तिनंही छान काम केलं आहे.
तुलना करता मला 'द आर्टिस्ट' जास्त आवडला. 'द डिसेण्डण्टस्'ला डावललं गेलं असं वाटलं नाही. कदाचित फॅमिली-ड्रामा, कठीण काळात कुटुंबाचं एकत्र असणं, एकमेकांना आधार देणं - या गोष्टी हॉलिवूडला अधिक मौल्यवान वाटत असाव्यात. हे सगळं असूनही ऑस्कर मिळालं नाही याचं वैषम्य वाटलं असावं.

'द आयर्न लेडी' -
पहिली कमाल वाटते, ती म्हणजे, मेरिल स्ट्रीपला किती सहीसही लूक दिला गेलाय. तिनंही अस्सल ब्रिटिश उच्चारांनी, पुढच्या दातांना आतून जीभ लावत बोलण्याच्या लकबीनं त्याला चार चांद लावलेत.
८०च्या दशकात थॅचरबाई दूरदर्शनवरच्या बातम्यांमधे वगैरे बर्‍याच वेळा दिसायच्या. त्यामुळे स्क्रीनवरची ती व्यक्तीरेखा परिचित वाटत होती पाहताना.
त्यांचा राजकीय जीवनपट दाखवताना काही घटनांचं त्या-त्या वेळचं ओरिजिनल फूटेज दाखवलंय. ते छान वाटतं. १० डाऊनिंग स्ट्रीटवर त्या प्रथम सत्ता ग्रहण करण्यासाठी पोहोचतात तेव्हा तर खर्‍या पाठमोर्‍या थॅचरबाईही दिसतात एका दृष्यात. तेव्हाच्या त्यांच्या वेषभूषेप्रमाणेच मेरिलची त्या सीनमधे वेषभूषा असल्यामुळे ते कळायला काही सेकंद लागतात.
तरीही, त्यांचा राजकीय प्रवास अजून सखोल दाखवायला हवा होता असं सिनेमा संपल्यावर वाटतं.
त्यांनी जेव्हा प्रथम पंतप्रधानपदासाठी निवडणूक लढवायचं ठरवलं, तेव्हाचे संवाद विलक्षण आहेत - "मला कल्पना आहे, की ब्रिटनमधे एक स्त्री पंतप्रधान कधीही होऊ शकणार नाही, तरीही त्यांना भानावर आणायला, जागं करायला मी निवडणूक लढवणार आहे."
त्यावेळी भारतात इंदिरा गांधी, श्रीलंकेत बंदारनायके पंतप्रधान होत्या. तरी समस्त राजकीय धुरिणांना खात्री होती, की पश्चिमेत आणि खासकरून ब्रिटनमधे हे कदापि होणार नाही!
अत्यंत परिणामकारक वाटलेले ३ प्रसंग -
म्हातार्‍या थॅचरबाईंना आपल्या दिवंगत नवर्‍याचे भास होत असतात. सर्वांना वाटत असतं, की वयानुसार त्यांच्या विक्षिप्तपणात भर पडत चालली आहे. पण त्या स्वतःशी निर्धार करतात, की I won't go mad आणि घरातल्या नवर्‍याच्या वस्तूंची विल्हेवाट लावण्याचं ठरवतात. त्यादरम्यान फ्लॅशबॅकमधे सिनेमा उलगडतो.
तरूण मार्गारेटला डेनिस प्रपोज करतो तेव्हा ती त्याला निक्षून सांगते, की घरदार, स्वयंपाक-पाणी, नवरा-मुलं यांत रमणारी मी नाही. त्यावर तो म्हणतो, की म्हणूनच तू मला आवडलीस. आणि अखेरच्या प्रसंगात, जेव्हा त्या कातर मनानं नवर्‍याच्या सर्व वस्तू, एक बुटांचा जोड वगळून, बाहेर काढतात, म्हणजे एका अर्थानं नवर्‍यालाच आपल्या आयुष्यातून कायमच्या घालवतात, त्यानंतरच्या प्रसंगात त्यांना सिंकशी आपली कपबशी विसळताना दाखवलंय.
त्यांच्या कल्पनेतला डेनिस त्यांना म्हणतो, की अशी कातर होऊ नकोस, you've always been on your own.
त्यांचं ते being on her own सिनेमात खूप छान वठलंय.
तिसरा प्रसंग - मंत्रीमंडळाची बैठक सुरू असते. तोपर्यंत परिस्थिती अशी आलेली असते, की त्यांच्यात करारीपणा, कैफ, टोमणे मारणार्‍या पुरूष सदस्यांना गप्प करणे, आपलं म्हणणं त्यांना ऐकायला लावणे हे सर्व खूप एकवटून आलेलं असतं. बोलण्याच्या ओघात त्या जेफ्री होव यांचा सर्वांसमोर पाणउतारा करतात. मिटिंग संपते. खोलीतून सर्व पुरूष सदस्य निघून गेल्यावर एका क्षणी त्यांचं अवसान गळून पडतं. हात कापतात. हा बदल मेरिल स्ट्रीपनं अक्षरश: १-२ सेकंदांत फार सुंदर दाखवलाय.

Comments

Yashodhan said…
This comment has been removed by the author.
म्याडम,
ओर्गो, लाइफ ऑफ पाय आणी ग्राविटी हे ऑस्कर विजेते चित्रपट पण बघा, खूप मस्त आहे, आवडतील तुम्हाला.

अनिकेत
http://shabdjhep.blogspot.in/

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)