...अनुभवू हा वैविध्यसोहळा

मायबोली डॉट कॉमतर्फे महिला दिनानिमित्त लिंगनिरपेक्ष मैत्री-ओळख परिसंवाद विशेषांक प्रकाशित करण्यात आला. त्या विशेषांकातला हा माझा लेख. मूळ लेख इथे वाचता येईल.

-------------------------


मी कॉलेजमधे असतानाची गोष्ट. ग्रूपमधली आमची एक मैत्रीण होती. हुशार, उत्साही, भरपूर बडबडी, जराशी टॉमबॉयिश. तिच्या बोलण्यात कायम एका मुलाचा उल्लेख यायचा. तो आमच्याच वयाचा, पण आमच्या कॉलेजमधला नव्हता. कौटुंबीक मैत्री किंवा दोघांचेही वडील बिझिनेस पार्टनर अशा कुठल्याशा कारणामुळे लहानपणापासून ते दोघं एकमेकांना चांगले ओळखत होते. आमची त्याच्याशी केवळ तोंडओळख होती, पण त्या दोघांची अगदी घट्ट मैत्री होती, हे आम्हांला पदोपदी जाणवत असे. परीक्षेचा अभ्यास असो, सुट्टीतले कार्यक्रम असोत, इतर काही मौजमजा अथवा अडीअडचणी असोत किंवा एखाद्या बाबतीतला महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असो, त्यांच्या एकमेकांशी सल्लामसलत-गप्पा-गुजगोष्टी या ठरलेल्या असायच्या. बरं, ती त्याला सोडून आमच्यात मिसळायची नाही म्हणावं, तर तेही नाही. ग्रूपच्या धमाल मस्तीत कायम हजर असायची, कॉलेजच्या सगळ्या उपक्रमांमध्येही पुढे असायची. हे कॉलेज सोडून त्या मुलाच्या कॉलेजला अ‍ॅडमिशन घ्यावी किंवा त्याच्या मागे लागून त्याला इकडे अ‍ॅडमिशन घ्यायला लावावी, असंही कधी तिच्या बोलण्यात आलं नाही. आम्हांला त्यांच्या या मैत्रीचं खूप अप्रूप वाटायचं आणि अभिमानही वाटायचा की, आपल्याला नाही तर नाही, किमान आपल्यातल्या एका मैत्रिणीला तरी असा एक सख्खा, निखळ नात्याचा ‘मित्र’ आहे.
कॉलेजवयीन मंडळींत जोड्या जुळवण्याचं अजून एक फॅड असतं. तर या दोघांबद्दल तसंही कधी आमच्या मनात आलं नाही, जाणवलं नाही. आणि थर्ड इयरला असताना अचानक एक दिवस कळलं की, त्या मुलानं तिला प्रपोझ केलं. ऐकून जरा आश्चर्यच वाटलं. आम्ही मुलीमुलींनी आपापसांत असंही म्हणून घेतलं की, सगळी मुलं शेवटी असलीच, मुलींकडे निखळ मैत्रीच्या नजरेनं यांना पाहायला जमतच नाही कधी, वगैरे वगैरे. तिनं त्या मुलाला काय आणि कसं उत्तर दिलं, हे मात्र अजून गुलदस्त्यात होतं. आम्हांला खात्री होती की, ती ‘नाही’ म्हणणार. पण विचार करायला तीनचार दिवस मागून घेऊन अखेर तिनंही त्याला होकार दिला की! हे ऐकून मात्र आम्ही तीनताड उडालोच. तिच्या घरी तडकाफडकी आमची एक बैठक झाली. तिनं अगदी दिलखुलासपणे आणि हर्षभरल्या चेहर्‍यानं प्रपोझलची, होकाराची कथा आम्हांला ऐकवली. तिनं त्या मुलाबद्दल ‘तसा’ विचार आधी कधीही केला नव्हता, पण त्यानं प्रपोझ केल्यावर केला म्हणे, आणि तिच्या मनानं तिला म्हणे होकाराचाच कौल दिला.
आता, आम्हाला आनंद तर होताच. ग्रूपमधल्या एकीचं ‘ठरलंय’ याची एक्साईटमेण्टही होती. पण ती ‘निखळ मैत्री’ वगैरे? त्याचं काय? तिला आम्ही बोलूनही दाखवलं की, आता आदर्श मैत्रीचे दाखले कुणाचे देणार आम्ही?
यथावकाश त्यांचं लग्न झालं; ग्रूपमधल्या इतरांचीही लग्नं झाली. नोकर्‍या-व्यवसाय, संसार, मुलंबाळं आणि अधूनमधून मैत्री पुढे चालू राहिली. त्या आदर्श मैत्रीच्या मुद्द्यावरून तिला नंतर कुणीच, कधीच छेडलं नाही, कारण आमच्या दृष्टीनं ज्याक्षणी त्यानं तिला प्रपोझ केलं, त्याक्षणी त्यांच्यातली मैत्री संपुष्टात आली होती...
परवा नकळत आठवणींचं बोचकं उचकलं गेलं आणि त्यात हा किस्सा अगदी अवचित सापडला. त्यावर नव्यानं विचार करण्याची संधी मी कशी सोडणार?
त्यांच्या लग्नानंतर इतरांच्या लग्नकार्यांत, अजून काही प्रसंगांनिमित्त त्यांच्याशी भेटीगाठी झाल्या. मी एकदा तिच्या सासरी जाऊन आले. ती नोकरीनिमित्त एकटीच परदेशी गेली, तेव्हा तिच्या चौकशीसाठी एकदोनदा त्या मुलाला फोन केल्याचं मला आठवतंय. तेव्हा आम्ही भरपूर गप्पाही मारल्या होत्या फोनवर. या सर्व प्रसंगांदरम्यान तो माझ्या समोर होता तो तिचा नवरा याच रूपात. ‘तिचा कोणे एके काळचा मित्र’ हे बिरूद मी त्याला लावू शकले नाही. खरंतर ‘कोणे एके काळचा’ हे तरी कशाला? नुसता ‘जवळचा मित्र’ असं चित्रंही माझ्या डोळ्यासमोर आलं नाही. मला आठवतंय, कॉलेजला असताना मनातल्या मनात त्या दोघांचा इतका हेवा वाटायचा की काय सांगू. अनेकदा स्वतःशीच कल्पना केली जायची की आत्ता त्याच्यासारखा आपलाही एखादा मित्र असता, तर त्याच्याशी या या विषयावर बोलता आलं असतं, अशी अशी चर्चा करता आली असती. खरंतर एक शाळेतली आणि एक कॉलेजमधली अशा माझ्या दोन जीवलग मैत्रिणी होत्या, घरी सख्खी बहीण होती. ती जी काय चर्चा करण्याचं माझ्या मनात तेव्हा होतं, त्यासाठी इतकी मंडळी पुरेशी होती की! पण तरीही ते मित्राचं वाटायचं खरं. आता विचार करताना वाटतंय की ‘भिन्नलिंगी व्यक्‍तीशी नुसती मैत्री’ हाच एक मुद्दा त्यामागचा बोलविता धनी होता का?
‘नुसती मैत्री’ असं म्हणतानाच भिन्नलिंगी व्यक्‍तीसोबत घडू शकणार्‍या इतर अनेक गोष्टींची शक्यता आपणच अधोरेखित करतो. मुळात आपल्या मातृभाषेतच ‘मित्र’ आणि ‘मैत्रीण’ असा मूलभूत भेद आहे. इंग्रजीतल्या 'फ्रेण्ड'प्रमाणे हे दोन्ही व्यक्‍तीविशेष एकाच सामान्यनाम-छपराखाली नांदू शकत नाहीत. म्हणजे ते शब्द शिकताना, त्यांचे अर्थ आत्मसात करतानाच त्यांच्यातला फरक मनात ठसवला जातो. मग तो गृहित धरूनच या बाबीकडे का पाहू नये? वर दिलेल्या उदाहरणाप्रमाणे प्रत्येक स्त्री-पुरूष मैत्रीचं पर्यावसान प्रेमविवाहात होत नसेलही, पण कदाचित त्याचं प्रमाण बर्‍यापैकी असावं. म्हणूनच अशा मैत्रीकडे भुवया उंचावून पाहिलं जातं.
आता, भुवया उंचावणारे ‘धूर आहे म्हणजे विस्तव असणारच’ हा दाखला देतील; तो ज्यांना पटणार नाही ते ‘ओल्याबरोबर सुकंही जळणार’ म्हणून गळे काढतील. हे न थांबणारं, न संपणारं आहे. मग ज्यानं त्यानं आपलं मन स्वच्छ ठेवावं, आपल्या मनाचा कौल मानावा, लोकांना त्यांची आयुष्य जगू द्यावीत, हे काय वाईट आहे? शेवटी स्त्रीला आणि पुरुषाला जन्म देताना निसर्गानंही काही एक भेदभाव ठेवलेलाच आहे. त्यामागे काहीतरी उद्दिष्ट आहेच. ते जे काही मूलभूत भेद आहेत ते कुठल्याही स्त्री-पुरूष नात्यात राहणारच, किंबहुना राहू द्यावेत. असा विचार करून बघा की त्या भेदांमुळेच ते नातं एक नवी उंची गाठू शकतं. पण तिथेही तो स्वच्छ मनाचा मुद्दा पुन्हा तडमडतोच आणि मामला कठीण होऊन बसतो. त्यापेक्षा मग भुवया उंचावणं, गॉसिपिंग करणं सोपं वाटतं, नाही?
मुळातच कुठल्याही दोन व्यक्‍तींच्या मर्यादा, बलस्थानं निराळी असतात; त्यांचे दृष्टीकोन, मतंही निरनिराळी असतात. त्याउपर लिंगभेदाचाही निकष लावला तर भावनांच्या प्रकटीकरणांमधे, आविष्कारपद्धतींमध्ये कल्पना करता येणार नाही इतकं वैविध्य दिसून येतं. मग हे सगळं जसंच्या तसं स्वीकारून त्या मैत्रीच्या नात्याला अधिक श्रीमंत करून सोडायचं की लिंगनिरपेक्षतेच्या नावाखाली एक सरधोपट सपाटीकरण करून टाकायचं हे ज्यानं-त्यानं ठरवावं.
हे मत स्त्रीवादाला पाठिंबा देणारं आहे, की त्यापासून फारकत घेणारं आहे या वादात मला पडायचं नाही. शेवटी स्त्रीवाद तरी का अवतरला या पृथ्वीतलावर? निसर्गनिर्मित स्त्री-पुरूष-विरोधाभासातला तोल बिघडला म्हणूनच ना? मग हा बिघडणार्‍या तोलाचा धोका या मैत्रीच्या नात्यातही आहेच. तो साधणंच महत्त्वाचं आहे, कळीचं आहे. पण त्यासाठी त्या मैत्रीकडे लिंगनिरपेक्षतेनं पाहण्याचा उपाय कुणी सुचवत असेल तर माझ्या मते तो सुचवणारा स्वतःचीच फसगत करतोय इतकं नक्की.
निसर्गाने मांडलेल्या सजीवसृष्टीच्या सोहळ्याचं मर्म कशात आहे? तर त्याच्या वैविध्यात. त्याला नजरेआड करणारे आपण कोण? ती आपली कुवत नाही, पात्रता तर त्याहून नाही. त्यापेक्षा त्या वैविध्याचे निरनिराळे पैलू लक्षात घ्यावेत, त्यांना अंगिकारावं आणि विविध नात्यांचा सोहळा मांडावा, त्याचा मनसोक्‍त आनंद घ्यावा, झालं. लिंगभिन्नतेसारख्या गोष्टी त्या नात्यांच्या आड येतायत असं वाटलं, तर नवीन नातं निर्माण करावं, जसं आमच्या मैत्रिणीनं आणि त्या मुलानं केलं, पण लिंगनिरपेक्षतेसारख्या मानवनिर्मित पैलूंचा शाप त्या निसर्गनिर्मित वैविध्याला द्यायला जाऊ नये हेच खरं.




Comments

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)