घरोघरी मातीच्या चुली - 3

घरोघरी मातीच्या चुली - 1

घरोघरी मातीच्या चुली - 2


----------


"ए, जरा मुलांकडे बघशील ना दुपारी? माझी ब्यूटिशियन येणारे घरी."
"पुन्हाऽऽ?"
"ओरडायला काय झालं इतकं?"
"अगं, पंधरा-वीस दिवसांपूर्वीच आली होती ना?"
"छे! महिना होत आला."
"अगं, पण मग इतक्यात पुन्हा?"
"हो, मग! असंच जाणार आहोत का आपण?? बरं दिसेल का ते?"
"कुठे जाणार आहोत? आणि आपणऽऽ?? म्हणजे मी पण??"
"(जरासा त्रासिक चेहरा करत) ओरडत जाऊ नकोस रे साध्या साध्या गोष्टींत..."
"पण जायचंय कुठे?"
"अरे, गेला आठवडाभर नाही का मी त्या डान्सच्या प्रॅक्टिसला जात होते..."
"(हायसं वाटून) अच्छा, तो कार्यक्रम आहे होय."
"शी! कार्यक्रम काय म्हणतोस त्यालाऽऽ!"
"तेच गं ते, अर्थ एकच... जा तू बिनधास्त! मी सांभाळीन मुलांना."
"मुलांना सांभाळायचं आहेच तुला, पुढचे ३-४ तास."
"कधी जायचंय?"
"आजच रात्रीऽऽऽ! आज ब्यूटिशियनला बोलावलंय, म्हणजे आजच असणार ना? की उद्या असणारे? इतक्या वर्षांत एवढंही कसं कळलेलं नाही तुला?"
"इथे आल्यापासून सारखंच चाललंय तुझं हे!"
"आता, सारखंच म्हणजे? लोकं बोलावतात मला आवर्जून, मग जायला नको? नाही गेलं तर बरं दिसतं का? आणि मलाच नाही, तुलाही बोलावतात. आजही बोलावलंय."
"माझं एक ऐकशील का? मला नको आग्रह करत जाऊस...मला तिथले फारसे कुणी माहितही नसतात. नुसतं सगळ्यांकडे बघून गोड गोड हसत रहायचं. मला कंटाळा येतो त्याचा."
"असं कसं? अरे, मला एकटीला पाहिलं की सगळे आधी तुझी चौकशी करतात, माहितीये?"
"म्हणून मी यायचं का? म्हणजे तुला त्या चौकशीला उत्तरं द्यावी लागू नयेत म्हणून?"
"(जराशा गर्वानं) तसं नाही! एकदा तू बरोबर आहेस हे दिसलं म्हणजे मग लोकं फक्‍त माझ्याशी बोलायला म्हणूनच येतात, तुझ्याबद्दल चौकशी करण्याची फॉर्‌मॅलिटी पाळायच्या फंदात पडत नाहीत!"
"नाही, पण मी नाही येणार. उगीच गाड्याबरोबर नळ्याची यात्रा."
"गाड्या?? मला गाड्या म्हणतोस? अरे, इंडस्ट्रीमधे माझ्या फ़िटनेसचं, फ़िगरचं अजूनही उदाहरण देतात लोक."
"म्हणी कळतात का म्हणी? म्हण आहे ती..."
"गंमत केली रे... माझं होत आलं की तुला सांगेन, तू ही आवर मग तुझं. रात्री मुलांजवळ थांबायला आई आहे."
"आता तू गंमत वगैरे म्हणणारच गं... च्यायला! तिकडे होतो तेच बरं होतं. हा वैताग तरी नव्हता."
"का? आता का? मी नाही माझं सगळं मागे टाकून इतकी वर्षं तिकडे राहिले? तेव्हा बायकोचा विचार करावासा वाटला का?"
"तेव्हाही तुझा विचार करायला तुझी ती इंडस्ट्री होतीच की! कशी गृहिणी झालीये, सासरी आनंदानं राहतीये, मुलांचं करतीये... असलं काही एवढंसं जरी छापून आलं तरी लगेच मला आणून दाखवायचीस, वाचायला लावायचीस!"
"हो, मग! म्हणूनच आता त्यांना नाही म्हणवत नाही मला."
"त्यात काय! तुला गंडवतात ते! उगीच कुठेतरी परिक्षक म्हणून, नाहीतर असल्या कार्यक्रमांना तेवढं बोलावतात तुला. पूर्वीसारखं काम देणारेत का तुला पुन्हा? आं?"
"देतील बघ, नक्की देतील, माझ्यासाठी निर्माण करतील काहीतरी नवीन काम..."
"भ्रम आहे तुझा हा, भ्रम! जाऊ दे, मला काय, तुला मी सांगितलेलं पटणार नाही. तू बस असल्या कार्यक्रमांना हजेरी लावत, डान्स करत, गोड गोड हसत..."
"कार्यक्रम म्हणू नकोस रे सारखंसारखं, अ‍ॅवॉर्डस्‌ नाईट म्हणतात त्याला..."
"तेच ते, खंडीभर अ‍ॅवॉर्डस्‌, त्याच्या खंडीभर नाईटस्‌, सगळीकडे तेच ते चेहरे, तेच ते नाचगाणं... मला अतिशय बोअर होतं ते. गेल्या महिन्यातल्या त्या कार्यक्रमात तर काय, तू पालखीत बसून स्टेजवर आली होतीस, आणि तो शाहरुख खान किती तुझ्या पुढेपुढे करत होता, फालतू बडबड करत होता, म्हणे डॉ. श्रीराम नेने मेरे अच्छे दोस्त हैं! च्यामारी त्या दोस्तच्या!"
"जाऊ दे रे, सिनेमात तो सारखे हेच संवाद म्हणतो ना... त्यामुळे त्याला तीच सवय आहे."
"आजही तेच असेल सगळं पुन्हा. मी नाही येणार."
"उद्या तू नवीन हॉस्पिटल काढलंस, आणि त्याच्या उद्‌घाटनाला मी येणार नाही म्हटलं तर आवडेल का तुला?"
"माझं हॉस्पिटल आणि तुझी अ‍ॅवॉर्ड्स् नाईट दोन्हीत काहीच फरक नाही का?"
"नाही! कारण तेव्हाही या सगळ्या चेहर्‍यांना बोलवायचं आहेच आपण, तरच हॉस्पिटलची जाहिरात होईल चांगली. नाहीतर कुणाला कळणारही नाही तू नवीन हॉस्पिटल काढलंयस ते! तेव्हा, गुडविलसाठी आज तुला यावंच लागेल."
".........."
"आणि हो, मी निळ्या काठांची साडी नेसणार आहे, तू ही त्याला शोभेल असाच सूट घाल, कळलं? नाहीतर हाताला येईल तो काढशील कपाटातून आणि चढवशील."
"नुसता मॅचिंग सूटच कशाला, असं करतो, माझ्यासाठीही एखाद्या ब्यूटिशियनला बोलावतो, तुझ्या मेक-अपला साजेसा मेक-अपही करून घेतो."
"ते आज नको, हॉस्पिटलच्या उद्‌घाटनाच्या दिवशी कर, आज नुसता मॅचिंग सूट पुरेसा आहे. फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड्स् नाईटमधे लोकं तुला नाही, मला बघायला येतात..."
"!!!!!!!!!"

Comments

Anonymous said…
ekdum correct Priti, Shreeram Nenenna pathav direct, he lekhan Madhurila dakhvun tyanna man mokala karta yeil, nahi ka!
regards,
Swapna

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)