हंड्रेड पर्सेंट डिव्हाईन !!


‘बालगंधर्व’ चित्रपटावर भरपूर चर्चा केली, वाचली, ऐकली. ती चर्चा कानावर पडली नसती तरी सिनेमा पहायचा तर ठरवलाच होता. तसा तो ही पाहीला. सिनेमा पहायला बरोबर चक्क आमचे चिरंजीव आले होते. (आमच्या अर्धांगाच्या मनोरंजनाच्या कल्पना निराळ्याच असल्यामुळे अश्या कामी बहुतेकवेळा मुलाचीच मला साथ-सोबत असते. तो एक स्वतंत्र चिंतनाचा विषय आहे. असो.) सिनेमा पाहून आल्यावर सुबोध भावे, त्याची वेषभूषा, सिनेमातले सेट्स आणि बालगंधर्वांच्या आयुष्यातल्या नव्याने कळलेल्या काही गोष्टी हेच सगळं मनात जास्त घोळत राहीलं.
काही दिवस गेले. अचानक पेपरमध्ये एक जाहीरात आली - ‘असा बालगंधर्व आता न होणे’ : बालगंधर्व चित्रपटावर आधारीत गाणी, गप्पा, किस्से यांचा कार्यक्रम. स्थळ - गडकरी रंगायतन, ठाणे. कार्यक्रमाचं आयोजन सिनेमाचा सहाय्यक संगीत दिग्दर्शक आदित्य ओक यानं केलं होतं.
ट्रान्सफॉर्मर-३ची रिलीज डेट पाहण्यासाठी पेपर उघडलेल्या माझ्या मुलाची नजर प्रथम त्या जाहीरातीवर गेली. तो ‘आई, आपण या कार्यक्रमाला जायचंच.’ असं म्हणत अक्षरशः उड्या मारत माझ्याजवळ आला. मी प.फ.ची आ. मानून दुसर्‍या दिवशी आधी कार्यक्रमाची तिकिटं काढून आणली. सहभागी कलाकारांच्या यादीत बरेच गायक, वादक होते. मुलाला म्हटलं - मुख्यत्त्वे बालगंधर्वांच्या गाण्याचा कार्यक्रम असणारसं दिसतंय. तिथे ऐनवेळेला ‘पकलो, बोअर झालो’ असली कटकट मला चालणार नाही. त्याला ही अट संपूर्णपणे मान्यच होती.
कार्यक्रम हाऊसफुल्ल होता. सुबोध भावे, नितीन चंद्रकांत देसाई, दिग्दर्शक रवी जाधव, सिनेमॅटोग्राफर महेश लिमये, संगीतकार कौशल इनामदार सर्वांनी छान, दिलखुलास गप्पा मारल्या. चित्रपट बनत असतानाचे अनेक किस्से त्यांच्या मुलाखतींच्या स्वरूपात ऐकायला मिळाले. (स्वानंद किरकिरे त्यादिवशी काही कारणांनी कार्यक्रमात सहभागी होऊ शकला नाही. ‘नंतर कधीतरी तो ही येईल’ असं सुबोध भावे म्हणाला. समोर इतकं सगळं छानछान चालू असूनही काहीवेळ या गोष्टीची रुखरुख लागून राहिली होती.) पण हे सगळं अधेमधे चालू होतं. प्रमुख आकर्षण होतं - आनंद भाटेची गाणी. साथीला वरदा गोडबोले आणि मधुरा कुंभार.
चित्रपट पाहण्यापूर्वी ‘आनंद भाटेची गाणी ऐकायला म्हणून जाणार असलीस तर विरस होईल. त्याचा आवाज सुबोध भावेला अजिबातच सूट होत नाही.’ असं एक मत ऐकायला मिळालं होतं. मनातून ते पटलं नव्हतं. त्याला कारण होतं लहानपणी दूरदर्शनवर ऐकलेली चिमुकल्या आनंद भाटेची गाणी. शाळकरी वयात दूरदर्शनवरच्या त्या कार्यक्रमामुळे आमच्या पिढीला बालगंधर्वांच्या गाण्यांबद्दल खरं म्हणजे प्रथमच ठोस काहीतरी समजलं होतं. (बाकी, आनंद भाटे तेव्हाही पुढ्यात कुठलाही कागद वगैरे न घेता गायचा आणि प्रस्तुत कार्यक्रमातही त्यानं गाण्यांचे बोल इ.साठी सोबत काहीही लिखित साहित्य बाळगलेलं नव्हतं!)
कार्यक्रम सुरू झाला. इंग्रजी माध्यमात शिकणारा, लिंकिन पार्क-बिर्कची गाणी ऐकणारा आपला टीनएजर मुलगा आपल्या शेजारी बसून एक नाट्यगीतांचा कार्यक्रम आपणहून पाहतोय-ऐकतोय याचंच मला सुरूवातीला इतकं अप्रूप वाटत होतं की पुढ्यातल्या कार्यक्रमात शिरायला मला जरा वेळच लागला. आनंद भाटेच्या पहिल्या गाण्याबरोबर ते विचार मागे पडले आणि सुरांनी मना-मेंदूचा ताबा घेतला.
गप्पा मारताना कौशल इनामदारनं अगदी प्रांजळपणे कबूल केलं की कोणे एके काळी नाट्यसंगीत म्हणजे त्याला जुनी, मागे पडलेली कला वाटायची. ‘ध्वनीक्षेपक नसण्याच्या काळात प्रेक्षागृहातल्या अगदी मागच्या रांगेपर्यंत जे पोहोचवावं लागायचं ते नाट्यसंगीत.’ अशी त्यानं स्वतःशीच त्याची व्याख्या केलेली होती. पण ती त्याची केवढी मोठी घोडचूक ठरली असती ते त्याला हा चित्रपट केल्यावर लक्षात आलं. साधारण अशीच प्रचिती मला स्वतःलाही आली. अभिजात संगीताचा मी ‘प्रत्यक्ष’ ऐकलेला हा पहिलाच कार्यक्रम. तोपर्यंत नाट्यसंगीत मलाही कंटाळवाणं वाटायचं. त्यामुळे प्रत्यक्ष ऐकणं तर दूरच, आतापर्यंत मी सी.डी.ज वगैरेही गायनापेक्षाही वादनाच्याच जास्त विकत घेतलेल्या आहेत. त्याला छेद मिळाला त्या कार्यक्रमाच्या मध्यंतरात. प्रेक्षागृहाबाहेर बालगंधर्व सिनेमाच्या गाण्यांच्या सी.डी.ची विक्री चालू होती. मुलाच्या आग्रहाखातर तिथून मी ही एक संच विकत घेतला.
अनेक वन्स-मोअर्सना विनयशील नकार देऊन मध्यंतरानंतरही आनंद भाटे ‘चाबूक’ गायला. कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. घरी परतायला त्यादिवशी रात्रीचा एक वाजला. सुरांनी मंत्रमुग्ध होणे म्हणजे काय याची मला व्यक्‍तिशः प्रथमच प्रचिती आली.
या सगळ्याला आता दहा-बारा दिवस उलटून गेले. तेवढ्या काळात तो दोन सी.डीं.चा संच दोन-तीन वेळा ऐकून झाला. कार्यक्रमामुळे आलेलं भारावलेपण बघताबघता कमी होईल असं आधी वाटलं होतं. पण जितक्या वेळा मी ती सी.डी. ऐकते तितक्या वेळेला पुन्हा ते प्रेक्षागृह आठवतं, तन्मयतेनं गाणारा आनंद भाटे आठवतो आणि वाटतं - सीडी वगैरे सब झूठ है याऽऽर, प्रत्यक्ष गायकाच्या पुढ्यात बसूनच हे सगळं ऐकायला हवं!
बालगंधर्वांची गाणी आधीपासून माहीत असल्यामुळे हे वाटतं की इतर अनोळखी गाण्यांच्या बाबतीतही असंच होईल ते मी सांगू शकत नाही. पण इतकं मात्र खरं की सध्या माझा मुलगा घरात ‘भाग भाग डी. के. बोस’सोबत ‘कशी या त्यजू पदाला’ हेदेखील गुणगुणत असतो. इतकंही खरं की अजून सहा-एक महिन्यांनंतर डी.के.बोसचं गाणं तो कुठल्याकुठे विसरूनही जाईल पण ‘नाही मी बोलत नाथा’चे सूर डोक्यातून जाणं शक्यच नाही.
कारण ते संगीत (पेस्तनकाकांच्या भाषेत) आहेच तसं - स्सालं हंड्रेड पर्सेंट डिव्हाईन!

Comments

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)