Monday, June 13, 2011

गुपित


२६ मे १९८२. वेळ - संध्याकाळचे ७:००
"पण मी एकटी कशी जाणार??" शेफालीनं कितव्यांदा ही शंका उपस्थित केली कोण जाणे!
"एकटी कुठेऽऽ? मी आहे ना तुझ्याबरोबर." शशांकनं पुन्हा एकदा नव्यानं तिची समजूत काढायचा प्रयत्न केला.
"भाविताई नाही येणारे ना, त्या अर्थानं एकटी!"
"मग ती नसली तर काय झालं? उद्यापुरतं भाविताईऐवजी या दादाला चालवून घे."
"शी! दादा-बिदा नाही हं! तू भाविताईचा होणारा नवरा आहेस, मी त्याच दृष्टीनं बघते तुझ्याकडे."
"च्यायला! भाविका, खतरा आहे तुझी बहीण! माझ्याकडे ‘बघते’ म्हणतेय..."
"ए, थांब रे शशांक, विषय भरकटवू नकोस. शेफू, तुला काय प्रॉब्लेम आहे याच्याबरोबर जायला?" भाविका.
‘शेफू’ म्हटल्याबरोब्बर नेहमीप्रमाणे शशांकला हसू आलं.
"किती वेळा हसणारेस त्या एकाच नावाला?", शेफालीनं निषेध नोंदवला आणि ती भाविकाकडे वळून म्हणाली, "प्रॉब्लेम मला नाही पण मावशीला असू शकतो. तिला काय सांगणार मी कुठे गेलेय म्हणून? आणि आईला?"
"त्याची चिंता तू कश्याला करतेस? शशांकने त्यावरही विचार केलाय."
"येस्स! तो तर आपला बाए हाथ का खेल आहे! थापा मारमारूनच तुझ्या भाविताईलाही पटवलंय." शशांकनं कॉलर ताठ करण्याचा अभिनय केला.
"म्हणे ‘पटवलंय’! काहीतरी टपोरी शब्द वापरू नकोस." शेफाली.
"कश्यावरून हा टपोरी शब्द आहे?"
"शी! मी आता घरीच जाते. आणि मी उद्या याच्याबरोबर जाणार नाही एकटी. मावशीशी, आईशी खोटं बोलणार नाही. तू बरोबर नसताना तर नाहीच नाही." शेफालीनं भाविकाला निक्षून सांगितलं.
"यावर दुसरा काही इलाज आहे का, शेफू?" भाविका तिला समजावण्याच्या सुरात म्हणाली.
"पण आत्ताच इतकी घाई काय आहे भेटवस्तू घेण्याची? पुन्हा कधीतरी घेऊ ना..." शेफाली शशांककडे वळून म्हणाली.
"ती वेळ येईपर्यंत तुमचं घर जुनं झालं असेल. ते नवीन असेपर्यंतच मला भेटवस्तू द्यायची आहे." शशांक.
"...आणि इनडायरेक्टली आईवर आणि मावशीवर इंप मारायचंय, हो ना?"
"हो! काय म्हणणं आहे? भावी सासवा आहेत त्या माझ्या!"
"ए, तुम्ही प्लीज भांडू नका." भाविका आता वैतागली. "हे बघ, शेफू, मला उद्या कुठल्याही परिस्थितीत येणं शक्य नाहीये. माझं सबमिशन आलंय नेमकं उद्या."
"आणि शशांकचं?"
"ते रोलनंबरप्रमाणे असतं. त्याचं झालं आजच. त्यामुळे तो उद्या कॉलेज बंक करू शकतो. तसंही उद्या आमची दोनच लेक्चर्स आहेत. तू उद्या दादर किंवा त्याच्या आसपास राहणार्‍या कुठल्यातरी मैत्रिणीचं नाव सांग ना. तिच्याकडे जातेय असं सांग आईला आणि माझ्याबरोबरच बाहेर पड. हा स्टेशनवर भेटेल आपल्याला. तुम्ही गेलात की मग मी विद्याकडे जाईन."
"विद्याकडे का?"
"त्याच्याशी तुला काय करायचंयऽऽ?? सबमिशनचं काम आहे आमचं. उद्याच्या या प्लॅनबद्दल काय म्हणणं आहे ते बोल आधी."
"पण घरी खरं कारण सांगून जाता नाही का येणार?" शेफालीनं काहीश्या हैराण सुरात विचारलं.
"खरं सांगितलं की आईला मिनिटा-मिनिटाचा हिशोब देत बसावं लागतं... मला नाही आवडत ती उलट तपासणी!" बोलताना भाविकाच्या कपाळावर आठ्या पडल्या. शशांकनं तिला ‘हा विषय आत्ता नको.’ अशी खूण केली.
यावर काही सेकंद शांततेत गेले. भाविताई आणि शशांक दोघंही आपल्या उत्तराची वाट बघतायत हे शेफालीला जाणवलं. शेवटी अगदी नाईलाजानं तिनं तयारी दर्शवली.
"हुश्श! अ‍ॅट लास्ट, शेफूची भाजी तयार झाली एकदाची..." शशांक.
"केवळ तुमच्यासाठी तयार झालेय, कळलं ना? तुमच्यासारखी अशी खरीखुरी थापेबाजी करायची माझ्यावर जेव्हा वेळ येईल तेव्हा मदतीला नाही आलात ना, तर बघा..." शेफालीच्या तोंडून निघून गेलं आणि तिनं पटकन आपली जीभ चावली.
पण भाविका आणि शशांकनं ते ऐकल्याचं वाटत नव्हतं. ते नेहमीप्रमाणे एकमेकांचा हात धरून निरोप घेत होते. त्याचा डावा, तिचा उजवा हात किंवा त्याचा उजवा, तिचा डावा हात... खरंतर हातही नाहीच, हाताची चार बोटंच, काही सेकंद नुसती धरून ठेवलेली... ते सेकंदही दरवेळी अगदी तेवढेच, मोजून घेतल्यासारखे. तेवढा वेळ ते दोघं एकमेकांकडे बघायचेच असंही काही नाही. बोलायचे तर नाहीतच. पण नेहमीच्या तिरक्या शेकहँडऐवजीचा काही सेकंदांचा त्यांचा हा सरळ शेकहँड शेफालीला खूप गोड वगैरे वाटायचा.
भाविकाचा हात सोडून शशांकनं शेफालीकडे पाहूनही निरोपाचा हात हलवला. ‘बाय शेफा(र)ली! भेटूच उद्या सकाळी...’ असं म्हणून पळत रस्ता ओलांडून तो निघून गेला. त्याच्या ‘शेफारली’ या हाकेवर नेहमीप्रमाणे डोळे वटारण्याची संधीही शेफालीला मिळाली नाही.
तो गर्दीत दिसेनासा होताच शेफालीला अत्यंत महत्त्वाचं वगैरे काहीतरी जाणवलं. तिनं भाविकाकडे पाहिलं. ओढणी सारखी करत तीही उठून चालायला लागली होती. दोन-चार पावलं अर्धवट पळत शेफालीनं तिला गाठलं आणि तिच्या खांद्यावर हात ठेवत तिच्या कानात कुजबुजल्यागत म्हणाली, "ताईऽऽ, मी कशी जाऊ अगं उद्या शशांकबरोबर? माझी चालू आहे! आज दुसरा आहे!"
त्यावर भाविकाच्या कपाळावर पुन्हा किंचित आठ्या पडल्या. "शेफू, बावळट आहेस काऽऽ?? इतरवेळी चार-पाच दिवस घरात बसून राहतेस काऽऽ? बाहेर भटकतेसच ना?"
"पण तेव्हा कुणी ना कुणी मैत्रिणी असतात बरोबर! तुझं काय... बरं आहे! त्याच्याबरोबर एकटी बिन्धास्त..."
"माझं काय बरं आहे? आणि बिन्धास्त कायऽऽ??" आठ्या वाढल्या.
"बिन्धास्त...फिरू शकतेस तू. मी...कशी...?" शेफालीनं चाचरत आपलं वाक्य पूर्ण करायचा प्रयत्न केला.
"उगीच नाही ते विचार करू नकोस. काही प्रॉब्लेम येणार नाही. उद्याचा एकच दिवस मिळतोय. नंतर त्याच्या घरी पाहुणे, मग तुमच्याकडे पाहुणे. त्यानंतर तुझा बारावीचा रिझल्ट, अ‍ॅडमिशन. बघता बघता त्याचा जाण्याचा दिवसही येऊन ठेपेल समोर..."
शेफाली काहीशी खट्टू झाली. भाविताई आपलं काहीही ऐकणार नाही हे ती मनोमन ओळखून होती.
बोलत बोलत रस्ता ओलांडताना भाविकानं नकळत शेफालीचा हात धरला.
शेफालीच्या मनात आलं, ज्या सहजतेनं भाविताई आपला हात धरतेय, तसाच शशांकचाही धरत असेल का रोज? मनात थोडीशी धाकधूक, जीवाचं पाणी-बिणी होत नसेल? किंवा त्याला काय वाटत असेल हिचा हात धरताना?
मग तिच्या मनात पुढचा विचार आला... हिची सुरू असते तेव्हा शशांकबरोबर भटकायला हिला काहीच वाटत नसेल?
सुरूवातीला वाटलंच असेल असलं काहीकाही, आता सवयीचं झालं असेल सगळं...
विचारलं पाहिजे हिला...
ती काहीतरी बोलणार इतक्यात भाविकाच म्हणाली, "आणि हे बघ, आता घरात शिरताना चेहरा पाडू नकोस. आईच्या लगेच चौकश्या सुरू होतात. तिला काही संशय आला तर लगेच तिकडे मावशीला फोन जाईल. मावशीनं उद्या तुला परत बोलावलं तर पंचाईत!"
दोघी भाविकाच्या घराच्या गल्लीत वळल्या. गल्ली म्हटलं तरी तो रस्ता जवळ जवळ अर्ध्या किलोमीटरचा होता आणि रस्त्याच्या दुसर्‍या टोकाला भाविकाचं घर होतं.
दोन वर्षांपूर्वी याच गल्लीत भाविका आणि शशांकला शेफालीनं प्रथम एकत्र पाहीलं होतं.
शेफालीचा दहावीचा निकाल लागला होता. मनाप्रमाणे मार्क्स मिळाल्यामुळे ती खूष होती. घरी आईनं दिलेला छोटा पेढयांचा बॉक्स आणि मार्कलिस्ट घेऊन सवितामावशीला आणि तिच्या लाडक्या भाविताईला रिझल्ट दाखवायला ती त्यांच्या घरी निघाली होती. सकाळपासूनच पावसाची रिपरिप चालू होती. छत्री सावरत, मार्कलिस्ट-पेढे यांचा पावसापासून बचाव करत ती त्या गल्लीत वळली तर पुढे दहा पावलांवर तिला हेच दोघं दिसले; ते ही एकाच छत्रीत!! ती काहीशी भांबावून गेली. तिच्यासाठी हे काहीतरी नवीनच होतं. त्यांना कळू न देता मागच्यामागे निघून जावं हा पहिला विचार मनात आला. पण घरी आईला काय सांगणार? पेढ्यांचा बॉक्स परत का आणला? सवितामावशीला पेढे का नाही दिले? ‘रिझल्ट घेऊन शेफू घरी आली की पेढे द्यायला तिलाच पाठव.’ असं सकाळीच सवितामावशीनं आईला सांगून ठेवलं होतं. म्हणजे तीही तिच्या घरी आत्ता आपली वाट बघत असणार! म्हणजे...सविताताईला यांचं ‘हे’ माहीत आहे? त्याशिवाय हे दोघं इथे गल्लीत बिन्धास्त कसे फिरतील? आणि भाविताईनं आपल्यालाच अजून काही सांगितलेलं नाही?? या विचारानं शेफालीला एकदम विश्वासघात वगैरे झाल्यासारखं वाटायला लागलं. डोळ्यात पाणी येतंय की काय असंही वाटायला लागलं. स्वतःच्या मार्कांचा विसरच पडला. काय करावं ते न उमगल्याने त्या दोघांकडे एकटक बघत, मंदपणे एकएक पाऊल टाकत ती हळूहळू चालत राहिली.
स्वतःच्या सलवारीवर उडलेला चिखल पाहण्यासाठी अचानक भाविकानं मान मागे वळवली आणि तिला शेफाली दिसली. क्षणभर तिचाही चेहरा गोरामोरा झाला. मग मात्र जरा सावरून तिनं शेफालीला जवळ बोलावून शशांकची तिच्याशी ओळख करून दिली. भाविकाच्या कॉलेजच्या गप्पांमधून वगैरे शेफालीला शशांक ऐकून माहिती होताच. पण तो ‘असा’ समोर येईल हे तिला अपेक्षितच नव्हतं. कधी शंकाही आली नव्हती.
"हाऽय!" शशांकनं तिच्याकडे पाहून हात हलवला. नंतर कधीही ती समोर दिसल्यावर किंवा तिचा निरोप घेताना तो अगदी तस्साच हात हलवायचा.
"तूऽऽ...शेफाली ना?" त्यानं हसून विचारलं. शेफाली आळीपाळीनं दोघांकडे पाहत राहिली. भाविताईनं याला आपल्याबद्दल सांगितलेलं दिसतंय हे जाणवून आता तिच्या नजरेत जरासा आनंद होता.
"चल, रिझल्टचा पहिला पेढा मलाच देऊन टाक." शशांक तिच्या हातातल्या प्लॅस्टिकच्या पिशवीकडे बघत म्हणाला.
पिशवीत पेढे आहेत हे यानं कसं ओळखलं? आज आपला रिझल्ट होता हे पण याला माहीत आहे?? हे ही भाविताईनंच सांगितलं असणार हे लक्षात आल्यावर, आपण या जगात अगदीच काही एकट्या पडलेलो नाही असं काहीसं हायसं वगैरे वाटल्याचं आजही शेफालीला चांगलं आठवत होतं.
रस्त्यावरच्या ज्या खड्ड्यात पाय गेल्यामुळे भाविकानं तेव्हा अचानक मागे वळून बघितलं होतं तो खड्डा अजूनही तिथे होता. पावसाच्या एक-दोन सरी येऊन गेल्यावर आताही त्यात पाणी साठायचं. शेफालीच्या चांगलीच लक्षात होती ती जागा.
ती जागा, ती वेळ, तारीख, वार...नंतरही भाविका आणि शशांकच्या बाबतीतल्या तिच्या कानावर पडलेल्या, तिनं पाहिलेल्या एकूण एक गोष्टी तिच्या पक्क्या लक्षात होत्या. त्यांच्याबद्दल समजल्यापासून तिला सतत भाविताईबरोबर रहावंसं वाटायचं. शशांकबद्दल ती जे-जे काही सांगायची ते ऐकत रहावंसं वाटायचं. लायब्ररीतून आणलेली कादंबरी वाचताना किंवा मैत्रिणींबरोबर एखादा हिंदी सिनेमा बघताना नायक-नायिकेच्या जागी तिला हेच दोघं दिसायचे. मग त्यांच्याबद्दलचं सगळं-सगळं सोबतच्या मैत्रिणींनाही सांगावंसं वाटायचं. मात्र ते तिनं आतापर्यंत महत्प्रयासानं टाळलं होतं. घरातल्या इतर कुणालाही माहीत नव्हतं तेव्हा भाविताईनं ज्या विश्वासानं आपल्याला सगळं सांगितलं त्या विश्वासाला तडा जाईल की काय अशी तिला भीती वाटायची. ‘मी माझ्या मैत्रिणींना तुमच्याबद्दल सांगू का?’ असं भाविताईला विचारणंही तिला कमीपणाचं वाटायचं...
शशांकबरोबर, एकटीनं, दादरला जाऊन येण्याबद्दलही तिनं कुणालाही कधीच, काहीच सांगितलं नाही. घरी सांगण्याचा तर प्रश्नच नव्हता; मैत्रिणींनाही नाही!
तो दिवस म्हणजे ती, भाविताई आणि शशांकमधलं एक गुपित बनून राहिलं...
पण, भाविताई होती कुठे बरोबर त्यादिवशी? तिचं आणि शशांकचंच गुपित ते...
खरं म्हणजे, तिच्या एकटीचंच! कारण, शशांक तर तिच्या लाडक्या भाविताईचा होणारा नवरा होता...!!
३० मे २०११. वेळ - सकाळचे ०८:००
"Good Morning!"
आवाज ऐकून शेफाली दचकलीच. चिमट्यानं धरलेली चहाची गरम पातेली तिच्या हातातून निसटणारच होती.
"उठलास पण इतक्यात? झाली झोप?" ती मागे वळून शशांकला म्हणाली.
"जेटलॅगमुळे झोप कुठली लागायला? नुसताच डोळे मिटून पडलो होतो."
"चहा घेणार?" स्वतःसाठी केलेला चहा कपात गाळत शेफालीनं विचारलं.
"तू घे तुझा आधी. मला नितीन उठल्यावर त्याच्याबरोबरही चालेल."
"तो कुठला उठतोय आता इतक्यात? तुझ्या वाटची झोपही तोच काढेल बघ आता!"
चहाचा कप घेऊन शेफाली बाहेर सोफ्यावर जाऊन बसली. शशांकही तिच्या मागे हॉलमध्ये आला. समोरच्या खुर्चीवर बसला. चहाचे घुटके घेणार्‍या शेफालीकडे त्यानं एक नजर टाकली. चेहरा जरा ओढलेला वाटत होता तिचा. रात्री एअरपोर्टवरून घरी आल्याआल्या काही जाणवलं नव्हतं. आत्ता मात्र अगदी कळून येत होतं.
"तू कशी काय उठलीस? I didn't expect you to be up so early..."
"अरे, अनन्याचा क्लास होता सकाळी. तिला डबा द्यायचा होता. त्यामुळे उठावं लागलं. दुपारी दोन वाजता येईल आता ती."
"अनन्या गेली??"
"ह्म्म... तिचे बारावीचे क्लासेस सुरू झालेत ऑलरेडी."
"सन्डेला पण क्लास??"
"हो. पण जाण्यापूर्वी तुझ्या खोलीत हळूच डोकावून गेली."
"So sweet! मला कळलंच नाही."
"तिला ते जेटलॅग वगैरे भारी इंटरेस्टींग वाटतंय सगळं. गेल्यावेळी तू आला होतास तेव्हा लहान होती तशी. सातवीत तर होती. ‘मी परत येईन तेव्हा शशांककाका झोपलेला असेल का?’ असं विचारत होती. उठल्या-उठल्या चॉकलेट्ससाठी फ्रीजही धुंडाळून झाला."
"Great! ती आल्यावरच बॅग उघडेन आता."
बोलताना शेफाली मधूनच स्वतःचं डोकं बोटांनी दाबत होती. डोळे गच्च मिटून घेत होती.
"मी पुन्हा एक डुलकी काढून येऊ का? पित्त झाल्यासारखं वाटतंय." अखेर ती शशांकला म्हणाली. खरं कारण वेगळंच होतं. पण ती ते सांगू शकली नाही.
"Ofcourse! go ahead..."
"तू काय करशील तोपर्यंत एकटा?"
"Don't worry 'bout me... विमानात वाचायला घेतलेलं पुस्तक आहे. पेपर आलाच असेल ना? टी.व्ही. आहे. वाटलं तर मी पण झोपेन पुन्हा. तू आराम कर. मग दुपारी बोलू."
शेफालीनं चहाचा कप सिंकमध्ये ठेवला आणि ती आत निघून गेली.
शशांक उठून बाल्कनीत आला. पुढ्यातल्या इमारतींच्या जंगलाकडे त्यानं नजर टाकली. किती बदललं होतं दादर आणि मुंबईसुध्दा! दरवेळी आलं की पहिला हाच विचार यायचा मनात. एक-दोन दिवसांत तो मागेही पडायचा. मग ती बदललेली मुंबईही पूर्वीसारखीच आपली वाटायला लागायची.
बाल्कनीच्या ग्रिलवर रेलून, किंचित पुढे झुकून शशांकनं छाती भरून श्वास घेतला. मुंबईची दमट सकाळ! तो कुंद वास! विमानातून बाहेर पाय टाकल्याटाकल्याच जाणवायचा. अनेकजण त्या वासाला नाकं मुरडायचे. पण तो कुंद दमटपणा हीच तर मुंबईची ओळख होती. तो वास आला की त्याला घरी परतल्यासारखं वाटे.
तिथे उभ्याउभ्याच त्यानं पुढच्या आठवड्याभराच्या कार्यक्रमांची मनातल्या मनात उजळणी करायला सुरूवात केली. यावेळी त्याचा दौरा अगदी छोटासा होता. आजचा दिवस तर गेलाच. पुढच्या सहातले तीन ऑफिसच्या कामामध्येच जाणार होते ज्यासाठी मुख्यत्त्वे तो आला होता. जाण्यापूर्वी एक दिवस पुण्याला घरी धावती भेट द्यायची होती. पण सगळ्यात आधी कल्याणला एक चक्कर टाकणं गरजेचं होतं. भाविकाची आई खूप आजारी होती. तिला भेटायचं होतं. आदल्या रात्री एअरपोर्टवरून घरी येताना कारमध्ये हा विषय निघाला होता खरा, पण नितीनशी त्याबद्दल सविस्तर बोलणं काहीच झालं नव्हतं.
आता नितीन उठला की ते ठरवून टाकू असं स्वतःशी म्हणत शशांकनं विमानात अर्धवट वाचून झालेलं पुस्तक हातात घेतलं आणि बाल्कनीतल्या आरामखुर्चीत तो मांडी ठोकून बसला.
२७ मे १९८२. वेळ - सकाळचे १०:००
स्टेशनवर पोहोचून दोघींना पाच-सात मिनिटंच होत होती. तोपर्यंत शशांकही आलाच.
"एक फास्ट ट्रेन लावली आहे. तुम्ही पळा. मी पण निघते." तो जवळ येताच भाविका म्हणाली.
तिला अच्छा करून हे दोघंही वळले.
स्टेशनचा जिना चढता चढता शेफालीला जाणवलं की टाटा करताना त्या दोघांचा नेहमीचा सरळ शेकहँड झालाच नाही. तिला आधी जरासं आश्चर्यच वाटलं. पण थोड्याच वेळात लक्षात आलं की हा त्यांचा आजच्या दिवसभरातला शेवटचा टाटा नसणार; आपण दादरहून परतल्यावर पुन्हा हे दोघं नक्कीच भेटणार. काय भेटवस्तू आणली आहे ती शशांक आधी भाविताईला दाखवणारच. तिची मंजुरी इज अ मस्ट! पण ती वस्तू गिफ्ट-रॅप केलेली असेल तर भाविताई कशी बघणार? मंजुरीसाठी तिनं बरोबर यायला हवं. ते तर ती करत नाहीये. आपल्याला पाठवलंय. का? कारण आपल्या नव्या घरासाठी भेटवस्तू घ्यायचीये म्हणून. मग तिची मंजुरी हवी कश्याला, खरं म्हणजे?
मग हे कश्यासाठी भेटणार असतील पुन्हा? भाविताईला तिच्या सबमिशनबद्दल कदाचित काहीतरी सांगायचं असेल संध्याकाळी. पण...दोघंच भेटून कॉलेजच्या गप्पा कश्याला मारतील? कोण जाणे! पण तेच कारण वाटतंय. प्रेमात पडलेले सगळेच एकमेकांच्या बारीकसारीक गोष्टीही एकमेकांपासून लपवत नाहीत म्हणे; मग ते कॉलेज असो नाहीतर सबमिशन नाहीतर आणखीन काही...
विचारांच्या नादात प्लॅटफॉर्मवर उतरल्यावर शेफाली लेडीज डब्याच्या जागेपाशी आपसूकच थांबली. तिच्या जरासं पुढे चालत असलेल्या शशांकच्या ते आधी लक्षातच आलं नाही.
"जेन्ट्सलाच चढ ना माझ्याबरोबर... आता ऑफिसची गर्दी संपलेली आहे." तो मागे वळून शेफालीला म्हणाला.
"नको, नको. मी लेडीजलाच चढते." शेफालीनं त्वरित त्याला झटकून टाकलं.
"चल गं, तेवढ्याच गप्पा मारता येतील ना आपल्याला..." त्यानं आग्रह केला.
शेफालीनं तो विचारही केलेला नव्हता. मुळातच, लोकलट्रेनने कॉलेजसाठी प्रवास सुरू केल्यावर ‘गाडी चुकली तरी चालेल, पण जेन्ट्सच्या डब्यात अजिबात चढायचं नाही.’ असं तिच्या आईनं तिला बजावलेलं होतं. ते तिनं आजवर पाळलं होतं. मग आजच का? त्यात आज आपला तिसरा!! तिला स्वतःशीही या कश्याचंच स्पष्टीकरण देता येईना. एकीकडे, आदल्यादिवशी भाविताईनं बावळट ठरवलेलं टोचत होतं. ‘शशांक आहे ना बरोबर आणि तो तर भाविताईचा होणारा नवराच आहे, मग झालं तर.’ असंही वाटत होतं. दुसरीकडे ‘आईला हे कळलं तर...?’ ही धाकधूकही होती. पण आईला कळलं तरीही खोटं सांगून दादरला का गेलीस?, शशांकबरोबर एकटी का गेलीस?, भाविका का नव्हती बरोबर?, भेटवस्तू इथे मिळणार नव्हत्या का? असे इतर अनेक महत्त्वाचे मुद्दे होते. त्यात हा जेन्ट्सच्या डब्याचा मुद्दा कुठल्याकुठे लपून जाईल याचीही जणू खात्री वाटत होती.
हो-नाही करता करता शेवटी तिनं जेन्ट्सच्या डब्यात चढण्याची तयारी दर्शवली.
"आता कसं, शहाण्या मुलीसारखं!" शशांक तिला म्हणाला. "...तुला अगदीच वाटत असेल, तर ही फास्ट-ट्रेन सोडून देऊ. आपल्याला काय घाई आहे? पुढची स्लो लावलीये. त्यानं जाऊ. तेवढीच गर्दी अजून कमी असेल. मग तर झालं?"
याला मात्र शेफालीनं तात्काळ संमति दिली.
फास्ट ट्रेन सोडून द्यायची ठरल्यावर दोघं जरासे मागे सरकून पंख्याखाली उभे राहिले. दोन-तीन दिवसांपासून आभाळ भरून येत होतं. ढगाळ हवेमुळे प्रचंड उकडत होतं. आता लवकरात लवकर पाऊस सुरू व्हावा असं वाटत होतं. मात्र तो ‘आज’ नको यायला अशी मनोमन प्रार्थना शेफाली सकाळपासूनच करत होती.
पंख्याचा फारसा वारा लागत नव्हताच. तिनं खांद्यावरच्या बॅगेतून छोटा नॅपकिन काढून वारा घ्यायला सुरूवात केली. बॅगेतून छत्रीही डोकावत होती.
"एवढी बॅग वगैरे कश्याला घेतलीयेस बरोबर?" शशांकनं आश्चर्यानं विचारलं.
"अरे, दादरच्या मैत्रिणीकडे चाललेय असं नको का वाटायला सवितामावशीला? मैत्रिणीचं पुस्तक परत करायचंय असं सांगितलं तिला. शिवाय छत्री कुठे ठेवायची हा प्रश्नही होताच."
"आणि त्यांनी ‘बघू कुठलं पुस्तक?’ असं विचारलं असतं तर...?"
"दाखवलं असतं काढून! माझ्याकडे खरंच त्या मैत्रिणीचं पुस्तक आहे सुट्टीत वाचायला आणलेलं. काल जाताना मी आणि भाविताई आधी आमच्या घरी गेलो, पुस्तक घेतलं आणि मग परत मावशीकडे गेलो. पुस्तक परत करण्याबद्दल माझ्या आईलाही कालच सांगून टाकलं."
"ही आयडिया भाविकाची वाटतं?"
"नाही, माझीच."
"अरे वा! एकदम जोरदार तयारी आहे थापा-बिपा मारण्याची...!!" शशांक डोळे मिचकावत म्हणाला.
"तुमचं पाहून पाहूनच शिकलेय." मानेला झटका देत शेफालीनं स्मार्ट वगैरे उत्तर दिलं.
"अच्छा! म्हणजे आता तुझ्यावर खरीखुरी थापेबाजी करण्याची जेव्हा वेळ येईल तेव्हा आमच्या मदतीची फारशी गरज भासणार नाही असं दिसतंय..."
ते ऐकताच शेफाली चमकली. कालचं आपलं वाक्य यानं ऐकलेलं दिसतंय हे लक्षात येताच तिनं पुन्हा आपली जीभ चावली.
"ते मी गमतीनं म्हणाले होते, रे!"
"मग मी कुठे म्हटलं तू जाणूनबुजून म्हणालीस म्हणून?"
".........."
"वरी नॉट! हम हैं तो क्या ग़म है! मात्र आम्हाला लगेच सांगितलंस तरच..."
शेफालीला त्या कल्पनेनंच मनात गुदगुल्या झाल्या. पण ते शशांकला कळू नये या उद्देशानं तिनं विषय बदलला. "तू नाही छत्री वगैरे आणलीस?"
"आज काही येत नाही पाऊस; आणि आलाच तर तुझी छत्री आहे की!"
".........."
"तुला चालेल ना?"
शेफाली त्याच्याकडे बघतच राहिली. इतका बिन्धास्त कसा काय बोलतो हा?
स्वतःपेक्षाही भाविताईला ते चालेल का असाच प्रश्न आधी तिला पडला. काहीसं बिचकायलाही झालं. आई-मावशी आपल्यावर चिडल्या, रागावल्या तरी भाविताई आपल्या पाठीशी आहे हा दिलासा कायम असतो, पण भाविताईपासूनच असं काहीतरी लपवून ठेवलं आणि त्यावरून तीच चिडली तर...? तसं होऊ देणं आपल्याला परवडणारं नाही हे शेफालीच्या लक्षात आलं.
आता तर पाऊस न येण्याबद्दल अधिकच प्रार्थना करणं गरजेचं होतं...!
अपेक्षेप्रमाणे स्लो-ट्रेनला गर्दी जरा कमी होती. दोघांना बसायला तिसरी आणि चौथी सीट मिळाली. जरासं खेटून बसावं लागत होतं; पण शेफालीची भीड आता काहीशी चेपली होती.
ट्रेननं वेग घेतल्यावर वार्‍याची एक झुळूक आली आणि शशांकने लावलेल्या आफ्टर-शेव्ह लोशनचा सुगंध शेफालीला प्रथमच जाणवला. तिच्या चुलत भावाकडची, सचिनदादाकडची, तसलीच एक बाटली एकदोनदा गुपचूप उघडून तिनं त्याचा वास घेतलेला होता. ते तिला आठवलं. खूप आवडायचा तिला तो वास. इतर आवडणार्‍या, मोगर्‍याच्या फुलांच्या किंवा चंदनी उदबत्तीच्या वासांपेक्षा हा वास घेतल्यावर काहीतरी वेगळंच वाटायचं. त्याला ‘आफ्टर-शेव्ह लोशन’ म्हणतात हे ही तिला सचिनदादाकडूनच कळलं होतं. पण सचिनदादा तर आता नोकरी करायला लागला होता. शशांकसारखी कॉलेजला जाणारी मुलंसुध्दा आफ्टर-शेव्ह लोशन वापरतात हे तिला नवीनच होतं.
तिनं शशांकच्या नकळत त्याला वरपासून खालपर्यंत न्याहाळलं. तो नेहमीसारखाच टापटीप वेषात आला होता. शेफालीनं स्वतःची वेषभूषा मात्र जाणीवपूर्वक अगदी साधी, पटकन कुणाचंही लक्ष जाणार नाही अशी ठेवली होती. मुलांबरोबर फिरणार्‍या मुली उगीचच जरा जास्तच नट्टापट्टा करून फिरतात असं तिला नेहमी वाटायचं. ती स्वतःही इतर वेळेला कधीही ड्रेसला मॅचिंग असं कानात, हातात घातल्याशिवाय, कपाळावर मॅचिंग टिकली लावल्याशिवाय घरातून बाहेर पडायची नाही. आजही हातात, कानात घातलेलं होतं पण अगदी साधं, जुनं कुठलीतरी; टिकली होती पण ती ही साधीच, काळ्या रंगाची. सकाळी त्यावरून भाविकानं तिला टोकलंही होतं. पण काहीतरी सांगून तिनं वेळ मारून नेली होती.
आपण या मुलाबरोबर ‘फिरतोय’ असा कुणाला संशयही येता कामा नये यासाठी तिचा हा सारा आटापिटा होता!
"तुझं कॉलेज ठाण्याला आहे ना? काय टायमिंग असतं?" .
"अं?" शशांकनं अचानक विचारलेला प्रश्न आधी तिला नीट समजलाच नाही. "सकाळी आठ ते बारा लेक्चर्स, एक ते चार प्रॅक्टिकल्स."
"आणि नंतर?"
"नंतर काही नाही. घरी जायचं."
"चारलाच??"
"हो. मग दुसरं काय करणार? कधीकधी आम्ही मैत्रिणी गप्पाटप्पा करत बसतो थोडावेळ... पण तरी सहापर्यंत पोहोचतेच मी घरी नॉर्मली"
"अरे हो! बारावी नाही का! घर ते कॉलेज आणि कॉलेज ते घर!" तो तिला खिजवण्याच्या सुरात म्हणाला.
"तू तरी बारावीत होतास तेव्हा वेगळं काय करायचास?"
"सगळं वेगळंच करायचो..." तो जोरात, स्वतःचीच खिल्ली उडवल्याच्या थाटात म्हणाला. "मी तेव्हा घरी किती वाजता जायचो वगैरे मला आता आठवतही नाही, पण भाविका कॉलेजला कधी यायची, घरी कधी जायची त्या वेळा अजूनही आठवतात. मी तिच्याच मागावर असायचो सारखा!" एक डोळा मिचकावत त्यानं स्पष्टीकरण दिलं.
मनाशी हिशोब केल्यावर शेफालीला नवलच वाटलं. आपल्याला यांच्याबद्दल कळलं हे दोघं टी.वाय.ला असताना... पण त्याआधी तीन-चार वर्षं हे चाललं होतं?? कुणाला कळू न देता कसं काय जमवलं असेल? आपल्या रिझल्टच्या दिवशी अचानक समोरच दिसले म्हणून, नाहीतर कदाचित...
"मला वाटतं, आम्ही एफ.वाय.ला असताना एकदा तू ही भाविकाबरोबर कॉलेजमध्ये आली होतीस. आपण बोललोही होतो तेव्हा..."
"चल! काहीही काऽऽय!"
"खरंच! म्हणून तर तुझ्या रिझल्टच्या दिवशी मी ओळखलं ना तुला..."
तेवढ्या छोट्याश्या भेटीवर दोन वर्षांनी यानं लगेच ओळखलं आपल्याला आणि आपल्याला मात्र एफ.वाय.चा तो प्रसंग बिलकुल आठवत नाहीये...
बरोबर! हे दोघं एफ.वाय.ला म्हणजे आपण आठवीत... तेव्हा अक्कल कुठे होती आपल्याला असल्या काही गोष्टींची? मुलांचे चेहरे-बिहरे कुठले लक्षात रहायला... बावळटच होतो आपण तश्या! या विचारासरशी शेफाली स्वतःशीच चपापली. आदल्या दिवशीचे भाविकाचे ‘बावळटऽऽ’ हे शब्द पुन्हा एकदा तिला टोचले.
दर स्टेशनला ट्रेनमधली आधीची गर्दी उतरत होती आणि नवी चढत होती. गर्दीत आपल्या ओळखीचं कुणी भेटणार तर नाही ना ही शेफालीची धाकधूक आता जरा कमी झाली होती.
"ठाण्याच्या पुढे एकटी कधी गेली नसशील ना फारशी?"
"नाही. एकदा दादरच्या या मैत्रिणीकडे आणि एकदा विक्रोळीच्या एका मैत्रिणीकडे..."
"ग्रेट! मग आज जरा दादरमध्ये भटकवतो तुला. ढगाळ हवाही मस्त भटकंतीचीच आहे!"
पुन्हा एकदा शशांकच्या बिन्धास्त बोलण्याचा शेफालीला धक्का बसला. दिवसाअखेर घरी काय सांगायचं अन काय नाही यापेक्षा भाविताईला काय सांगायचं अन काय नाही हाच प्रश्न नको पडायला म्हणजे मिळवली असंच तिला वाटायला लागलं. आपण काही गोष्टी तिच्यापासून समजा लपवल्या आणि यानं त्या सांगून टाकल्या म्हणजे ती आपल्यावर भडकणार; उलट झालं तरी आपल्यालाच बोलणी बसणार...
तिला अचानक भाविताईची जराशी भीतीच वाटायला लागली. तिनं जरा इकडेतिकडे पाहून आपलं लक्ष अन्यत्र वळवण्याचा प्रयत्न केला.
शशांकच्या समोर बसलेला एक गृहस्थ कधीचा या दोघांना न्याहाळत होता. पलिकडच्या बाकावर बसलेलं एक मध्यमवयीन जोडपंही यांच्याकडे लक्ष ठेवून होतं. खासकरून त्या जोडप्यातली बाई. पण त्याहीपेक्षा शेफालीचं लक्ष वेधलं होतं दुसर्‍या टोकाच्या विंडोसीटला बसलेल्या एका कॉलेजवयीन मुलानं. त्या क्षणी तो खिडकीतून बाहेर बघत होता, पण आपल्या नकळत तो ही आपल्याकडे लक्ष ठेवून आहे हे शेफालीला जाणवलं होतं. त्याच्या नकळत मग तिनंही त्याचं थोडं निरीक्षण केलंच. शशांकसारखाच तो ही टापटीप वेषात होता. कॉलेजस्टुडंटच वाटतोय, आपल्यासारख्याच घरातला वाटतोय, कदाचित मराठीच असेल, तो ही आफ्टर-शेव्ह वापरत असेल का?...कसं कळणार ते?... तिचं लक्ष त्याच्या शेजारी बसलेल्या माणसाकडे गेलं. दाढीचे खुंट वाढलेला, कळकट्ट चेहर्‍याचा तो माणूस बसल्या बसल्या डुलक्या घेत होता. त्या माणसाला कुठला त्या मुलाच्या आफ्टर-शेव्हचा वास जाणवायला? आपण शशांकला इतकं खेटून बसलो तेव्हा कुठे आपल्याला जाणवला तो वास...! हा विचार येताच ती जागच्याजागी पुन्हा काहीशी सावरून बसली. तरीही खेटून तर बसावं लागतच होतं.
इकडे शशांक तिला त्यांच्या कॉलेजमधले एकएक किस्से, प्रोफेसर्सच्या नकला, पिकनिकची धमाल असं काहीबाही सतत सांगत होता. मध्येच एखादं धक्कादायक वाक्यंही टाकत होता. त्याच्या अखंड बडबडीमुळे ती ही आता जराशी सैलावली होती. शशांकच्या वर्गात तो आणि भाविका यांच्याप्रमाणेच अजून चार जोड्या जमल्या होत्या म्हणे! शेफालीला स्वतःच्या वर्गात मात्र असलं काहीही अजूनपर्यंत जाणवलेलं नव्हतं. कुठल्या शक्यताही ध्यानात आलेल्या नव्हत्या... ‘इन्क्लूडिंग मी!’, ती स्वतःशीच म्हणाली. भाविताईच्या जागी आपण स्वतःला ठेवलं, तर शशांकच्या जागी कोण असेल? असा विचार तिनं त्याआधीही अनेकदा केला होत. पण आजतागायत तिला त्याचं उत्तर मिळालेलं नव्हतं.
शशांकनं सांगितलेल्या एका भन्नाट किश्श्यावर शेफाली न राहवून त्याला टाळी देत जोरात हसली. त्या आवाजासरशी पुढ्यातला गृहस्थ, ते मध्यमवयीन जोडपं आणि लांबच्या कोपर्‍यातली ती विंडोसीट, सर्वांनी एकाचवेळी या दोघांकडे वळून बघितलं. चार-दोन सेकंद हसण्याचा भर ओसरेपर्यंत टाळी दिलेला शेफालीचा हात शशांकच्या हातात तसाच होता. तो काढून घेताना मात्र एक अनाहूत जाणीव तिला झाली. जे टाळण्यासाठी तिचा सकाळपासून आटापिटा चालला होता, तेच घडत होतं बहुतेक...
जगासमोर आत्ता एकत्र असलेले ते दोघं, चांगल्या घरातले, तरूण वयाचे, खेटून बसलेले, एकमेकांशी हसत-खेळत, मोकळेपणानं बोलणारे... त्यांच्यात नक्की काय नातं होतं याची कुणाला कल्पनाही नसेल; मात्र यांच्यात काहीतरी नक्कीच आहे असा अंदाज मात्र प्रत्येकानं बांधला असेल...
आपल्याला न्याहाळणारे आपल्या दोघांकडे ‘त्या’ नजरेनं पाहतायत हे जाणवताच शेफाली क्षणभर शहारली!
तिनं तरूण विंडोसीटकडे नजर टाकली. तो आता पुन्हा खिडकीबाहेर बघत होता. किंचित मान वळवून तिनं शशांकच्या दिशेला बघितलं. तर तो आदल्याच स्टेशनला त्याच्या पलिकडे येऊन बसलेल्या माणसाशी ‘फोर्थ सीट लडकी बैठी है, जरा जगह दे दो...’ असलं काहीतरी बोलत होता, त्याला सरकायला सांगत होता. आपण काहीश्या अवघडत बसलोय हे यानं ओळखलंय. पण असा इतका विचार यानं भाविताईच्या बाबतीत केला तर बरोबर आहे. आपल्या कम्फर्टचा विचार यानं कश्याला करावा? पण त्याच्या या बोलण्यानं आदल्याच स्टेशनला चढलेल्या त्या माणसाचाही असाच समज होईल की आपल्यात नक्कीच काहीतरी आहे!
तो सार्वत्रिक समज आता टाळणं अशक्य आहे हे हळूहळू तिच्या लक्षात आलं. आपल्यालाही कधी अशी कुठली जोडी दिसली तर आपणही आधी असाच विचार नाही करत?? कधीकधी तर आपण मैत्रिणी मिळून, तो किंवा ती एकमेकांना कसे ‘सूट’ नाहीयेत, लोकं कुणाच्याही प्रेमात कसे काय पडतात याचीही चर्चा करतो, हसतो...
पण आज आपल्या बाबतीत कुणाच्या मनात तसा विचार येणारच नाही. कारण भाविताई आणि शशांक एकमेकांसाठी अगदी ‘परफेक्ट मॅच’ आहेत आणि आपल्यात आणि भाविताईत मावसबहिणी असूनही सख्ख्या बहिणींप्रमाणे साम्य आहे असं सगळेच म्हणतात. म्हणजे, भाविताईच्या जागी आपल्याला ठेवलं, तर शशांकच्या जागी त्याच्यासारखाच कुणीतरी असेल... किंवा तोच असेल... जसं आत्ता या सगळ्या लोकांना वाटतंय...
शेफालीला स्वतःच्याही नकळत ती कल्पना आवडायला लागली. एका मुलाबरोबर ‘फिरताना’ कसं वाटतं ते अनुभवायची ही संधी का सोडायची? हरकत काय आहे एक दिवस असा विचार करायला? तो फक्‍त विचारच असेल आणि केवळ आजच्याच दिवसापुरता तर असेल!
३० मे २०११. वेळ - दुपारचे ०१:४५.
"मला प्लीज आग्रह नको रे करूस... मला सवितामावशीला भेटावंसं वाटत नसेल का? पण आज बरंच नाहीये मला. काही करू नये, कुठे जाऊ नये असंच वाटतंय." शेफाली अजिजीनं शशांकला म्हणाली.
दुपारी जेवणाची तयारी करून तिघं अनन्याची वाट बघत गप्पा मारत बसले होते. शशांक तिला ‘माझ्याबरोबर कल्याणला मावशीला भेटायला चल.’ असा आग्रह करत होता. खरं म्हणजे त्याला एकट्याला त्या घरी जायचं जिवावर आलं होतं. शेफाली बरोबर असेल तर बरं पडेल असं वाटत होतं.
नितीननं शेफालीच्या म्हणण्याला असंमति दर्शवली. "आजच नाही, हे हिचं अनेक दिवस चाललंय. खूप उदास, मरगळलेली असते आजकाल." तो शशांकला म्हणाला. पाठोपाठ त्यानं शेफालीचीही समजूत काढली. "मला कळतंय, की चाळीशीनंतर हे असं होतं. माझी त्याबद्दल काहीच तक्रार नाहीये. पण जरा दिवसभर शशांकबरोबर जाऊन आलीस तर तुलाही बदल बरा वाटेल. हवंतर मी फोन करून ए.सी.कॅब बुक करतो. मस्त ए.सी.त बसून जाऊन ये. मावशीलाही बरं वाटेल. मला उद्या रजा काढणं शक्य नाहीये. नाहीतर आपण तिघंही गेलो असतो."
"आयडिया!", टेबलवर हलकेच हाताची बोटं आपटत शशांक म्हणाला, "ए.सी.कॅब वगैरे काही नको... बेस्ट म्हणजे आपण ट्रेनने जाऊ या! कल्याण स्लो!"
ते ऐकून शेफालीनं कपाळाला हात लावला. "आताची मुंबईतली गर्दी माहीत आहे का? ट्रेनने जाऊया म्हणे."
"डाऊन जायचंय ना... मग काय प्रॉब्लेम आहे? हवंतर फर्स्ट क्लासचं तिकीट काढू. मजा येईल. What say?"
"Say Yes..." नितीननंही आग्रह सुरू केला. तितक्यात डोअर-बेल वाजली. पण त्याचं लक्ष अजून शेफालीकडेच होतं. दोघंही आपल्या उत्तराची वाट पाहतायत हे शेफालीलाही जाणवलं. नाही म्हणायला तिच्याकडे फारसं सबळ कारण नव्हतंच.
"बरं ठीक आहे... जाऊ या उद्या आपण ट्रेननं. पण गर्दी-चेंगराचेंगरीत मी अजिबात घुसणार नाही हं, आधीच सांगून ठेवते." ती शशांकला बजावण्याच्या सुरात म्हणाली.
"That's like a good gal!" नितीन म्हणाला आणि दार उघडायला उठला.
"हुश्श! अ‍ॅट लास्ट, शेफूची भाजी तयार झाली एकदाची..." शशांक तिच्या दिशेला झुकत हळूच पुटपुटला.
तिच्या चेहर्‍यावर उमटलेले आश्चर्याचे भाव त्यावेळी अगदी बघण्यासारखे होते!
साधारण तसेच भाव सकाळी शशांकच्या चेहर्‍यावर उमटलेले मात्र कुणीच पाहिलेले नव्हते जेव्हा पुस्तक वाचता वाचता डोकं जड झाल्यामुळे तो झोपायला म्हणून आत जाताना चुकून शेफाली-नितीनच्या बेडरूमकडे वळला आणि आपली चूक लक्षात येताक्षणी त्या पावली गुपचूप मागे वळताना भिंतीवर, कोपर्‍यातल्या एक सुंदर सूर्योदयाचा देखावा असणार्‍या पण काहीश्या जुनाट अश्या काचेच्या फ्रेमकडे त्याचं लक्ष गेलं तेव्हा...
पंचवीस-तीस वर्षांपूर्वी दादरमध्ये शेफालीसोबत त्यासाठी दोन-तीन तास केलेली पायपीट आठवली तेव्हा...
तिला काहीच पसंत पडत नव्हतं तरीही न कंटाळता तिच्याबरोबर फिरल्याचं आठवलं तेव्हा...
‘पुन्हा एकदा तसंच जायला हवं, याऽऽर’ हा विचार अनपेक्षितपणे त्याच्या मनात चमकला तेव्हा..

1 comments:

Mugdha said...

mhanje??? mala kahich kalale nahi...may relations are complictaed !!!