गोळीबाराच्या खुणा... अश्या आणि तश्या.


आत्ता चाळीशीत प्रवेश करणारे माझ्यासारखे अनेकजण ऐंशीच्या दशकातील पंजाबमधील हिंसाचाराच्या बातम्या ऐकत, वाचत मोठे झालेले आहेत. एकमेव दूरदर्शनचं चॅनल असण्याच्या त्या काळात संध्याकाळच्या प्रादेशिक किंवा रात्रीच्या राष्ट्रीय बातम्यांमध्ये खलिस्तान, भिंद्रनवाले, शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी, लोंगोवाल, अकाली दल, सुवर्ण मंदीर, ऑपरेशन ब्लू-स्टार या संज्ञाच सतत कानावर पडायच्या. इंदिरा गांधींची हत्या, नंतर (चक्क पुण्यात) जनरल अरुणकुमार वैद्य यांची हत्या, त्याबद्दलच्या बातम्या, त्यामुळे काहीसे सटपटलेले घरातल्या मोठ्यांचे चेहरे हे सर्व अजूनही माझ्या चांगलं लक्षात आहे. तेव्हा शाळेत येता-जाता रस्त्यात एखाददुसरा फेटेवाला शीख दिसला तर त्याला बावरल्या नजरेनं निरखलं जायचं. इंदिरा गांधींच्या हत्येच्या दुसर्‍या दिवशी सकाळी त्याबद्दलच्या मोठ्यांच्या सर्व चर्चा ऐकल्यावर, ताजं वर्तमानपत्र घरच्या सर्वांचं वाचून झाल्यावर, मी पुन्हा गुपचूप हातात घेतलं होतं आणि त्यातलं सतवंतसिंग आणि बियांतसिंगचं वर्णन दोन-तीनदा वाचलं होतं. एका सुरक्षारक्षकानेच हत्या करण्यातला विरोधाभास आणि त्या सुरक्षारक्षकाचं शीखधर्मीय असणं मनावर नक्की काय परिणाम करून गेलं ते माहित नाही; पण कधीही विसरता येणार नाही असा परिणाम झाला एवढं नक्की.
पर्यटनासाठी म्हणून जेव्हा आम्ही अमृतसरला पोहोचलो तेव्हा किंवा दुसर्‍या दिवशी सुवर्णमंदीर संकुलात प्रवेश करताना माझ्या डोक्यात सगळे हेच विचार होते.
अमृतसर शहराचं अस्तित्त्व आणि महत्त्व आहे तेच मुळी सुवर्णमंदिरामुळे. ते एक सोडलं तर बाकीचं शहर लौकिकार्थाने शहर म्हणण्याच्याही लायकीचं नाही. पण एकदा मंदीर-संकुलात प्रवेश केला की सगळा नूरच पालटतो. संकुलात संगमरवराचा सढळ हाताने वापर झालेला आहे. तरीही बिर्ला मंदिरांप्रमाणे तिथे कोपर्‍या-कोपर्‍यात श्रीमंती ठिबकत नाही; तर नजरेत भरते ती कमालीची शिस्त, स्वच्छता आणि साधेपणा. सोन्याच्या पत्र्यांनी मढवलेली मंदिराची मुख्य वास्तू आणि साधेपणा ही द्वयी गमतीशीर वाटेल पण ते तसंच आहे खरं! मध्यभागी पवित्र तळं, पाण्यात उभी असलेली मुख्य वास्तू आणि तळ्याच्या सभोवताली पांढर्‍या संगमरवरात बांधलेल्या एक आणि दुमजली इमारती. इमारतींत असंख्य दालनं. दालनांमध्ये लोकांच्या वास्तव्याची सोय आहे, सामानसुमान ठेवण्याची व्यवस्था आहे, लंगरासाठी लागणारं धान्यधुन्य साठवलेलं आहे.
मंदीर चोवीस तास उघडं असल्यामुळे भक्‍तांची सततची रीघ लागलेली असते. माणसांची जितकी जास्त वर्दळ तितका गलिच्छपणा, अस्वच्छता वाढत जाणार हे उघड आहे. पण तिथे मंदिराचे सेवेकरी सतत साफसफाई करत होते. अगदी पादत्राणे ठेवण्याच्या ऐसपैस ‘जूता-घर’पासून ते पार अंतर्भागापर्यंत सतत झाडलोट, धू, पूस सुरू होतं. तळ्याच्या पाण्यात आंघोळ करणं हे तिथे येणार्‍या भक्‍तांचं एक मुख्य काम. ते त्यांचं काम मनोभावे करत होते, तर सेवेकरी पाण्यात उतरून ते तळं अगदी तळापासून स्वच्छ करण्याचं काम सतत करत होते.
DSC02212.JPG
मंदिरात प्रवेश करताना सर्वांना आपलं डोकं झाकून घ्यावं लागतं हे ठाऊक होतं आणि तसा इशारा आमच्या हॉटेलच्या स्वागतकक्षानंही आम्हाला दिलेला होता. त्यामुळे मी एक ओढणी जवळ ठेवलेली होतीच. पण का कुणास ठाऊक, जोपर्यंत कुणीतरी आपल्याला त्या कारणावरून हटकत नाही, तोपर्यंत ती डोक्यावर घ्यायची नाही असं मी ठरवलं. नियमांची लोकांना कश्या प्रकारे आठवण करून दिली जाते ते पहायची सुप्‍त इच्छा (किंवा खवटपणा म्हणा हवं तर) त्यामागे असावी.
‘जूता-घर’मध्ये चपला ठेवून आम्ही मुख्य प्रवेशद्वारापाशी गेलो. तिथे एका छोट्याश्या, उथळ, स्वच्छ हौदात तितक्याच स्वच्छ, थंडगार पाण्याचा प्रवाह होता. त्या पाण्यात पाय धुवूनच सर्वांनी पुढे जायचं होतं. त्या नितळ पाण्यानं अमृतसरमधला सकाळी साडेसहालाही जाणवणारा मे महिन्यातला उकाडा काही सेकंद विसरायला लावला. पाय धुण्यापुरतीच कश्याला, मी त्या पाण्यात चांगली पंधरा-वीस मिनिटं उभी रहायला तयार होते. तेवढ्यात माझ्या मागून एक भक्‍त आला. हौदापाशी खाली बसला. त्या पाण्यात आधी त्यानं स्वतःचं तोंड धुतलं, मग त्यातलं थोडंसं पाणी तो तीर्थासारखं प्यायला आणि मग स्वतःचे पाय धुवून पुढे सरकला. मला ते पाहून एकदम शिसारीच आली. देवावरची, धर्मावरची (आंधळी?) श्रध्दा मूलभूत स्वच्छतेसारख्या बाबींबद्दलच्या लोकांच्या जाणीवा इतक्या बोथट कश्या काय करून जाते त्याचं स्वतःशीच नवल करत मी पण पुढे सरकले. तर कुणीतरी हातवारे करून माझं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं मला जाणवलं. मी त्या दिशेला पाहिलं तर एक केश-कंघा-कच्छेरा-कडा-कृपाणवाला नखशिखांत शीख स्वयंसेवक आपल्या उजव्या हाताची तर्जनी सरसावून माझ्या उघड्या डोक्याकडे इशारा करताना दिसला. त्याच्या चेहर्‍यावर एक प्रामाणिक जरब होती. त्याला विरोध वगैरे करायचा माझा मानस नव्हताच. मी ओढणी डोक्यावर घेतली आणि आत शिरले.
आत शिरल्यावर पहिलं काय आठवलं तर ऑपरेशन ब्लू-स्टारच्यावेळी दूरदर्शनवर पाहिलेली काही कृष्णधवल पुसट चलचित्रं. डोळ्यांसमोरचा माणसांच्या गर्दीनं फुलून गेलेला मंदीर-संकुलाचा परिसर तेव्हा ओस पडलेला होता. उजव्या हाताच्या लांबवरच्या कोपर्‍यातल्या कुठल्याश्या खोलीतून पळत बाहेर आलेले एकदोन दहशतवादी मंदिरात ठिकठिकाणी लपून बसलेल्या भारतीय सैन्याच्या जवानांच्या गोळ्यांच्या टप्प्यातच होते. पुढच्या काही क्षणातच ते जमिनीवर निष्प्राण पडलेलेही दूरदर्शनच्या कॅमेर्‍यानं टिपले होते. ते काही सेकंदांचं अतिशय धूसर, आताच्या तुलनेत सदोष ध्वनिचित्रमुद्रण पुढे कित्येक दिवस बातम्यांमध्ये वगैरे दाखवलं गेलं होतं. सुट्टीच्या, पर्यटनाच्या मनःस्थितीत असूनही तेव्हाची ती दृष्यं माझ्या डोळ्यांसमोरून हलेनात.
आम्ही डाव्या हाताची दिशा पकडून तळ्याच्या भोवती चालायला सुरूवात केली. प्रदक्षिणा किंवा परिक्रमा करणे यापेक्षाही संपूर्ण परिसर नजरेखालून घालणे हे आमचं मुख्य उद्दीष्ट होतं. ठिकठिकाणी गुरूमुखी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत सूचनाफलक, माहितीफलक लावलेले होते. ते एकएक वाचत चाललो होतो. मुख्य वास्तूत दर्शनासाठी प्रचंड मोठी रांग लागलेली होती. तो मगाचचा हौदातलं पाणी पिणारा भक्‍त त्या गर्दीतच कुठेतरी स्वतःचं अस्तित्त्व हरवून, तिष्ठत उभा असावा...
DSC02214.JPG
आमची प्रदक्षिणा जवळजवळ पूर्ण होत आली. चालताचालता डावीकडे एक दुमजली इमारत इतर इमारतींपेक्षा वेगळी, जरा जास्त सुशोभित केलेली, घुमटाकार छप्पर असलेली अशी दिसली.
DSC02219.JPG
त्या इमारतीत भक्‍तगण प्रवेश करताना दिसत नव्हते. पण येताजाता इमारतीसमोर एका जागी थबकून, खाली वाकून ‘मत्था टेकके’ जात होते. इमारतीच्या तळमजल्याचा भाग असलेली कमी उंचीची खोलीवजा अशी ती जागा दर्शनी भागाकडून लोखंडी गजांनी बंद केलेली होती. म्हणजे त्या खोलीत आत काय आहे ते बघता येत होतं पण प्रवेश निषिध्द होता. मी जरासं खाली वाकून आत काय आहे ते पाहण्याचा प्रयत्न केला. आतल्या अंधारी जागेत मला आधी काहीच दिसलं नाही. तिथेच शेजारी असलेला मोठा माहितीफलक मग मी वाचायला सुरूवात केली. ऑपरेशन ब्लू-स्टारच्या वेळेस या इमारतीचं सर्वात जास्त नुकसान झालं होतं, नंतर भक्‍तांच्या अर्थसाहाय्यातून आणि स्वयंसेवकांच्या कष्टांतून ती इमारत पुन्हा बांधली गेली... इतपतच माहिती त्या फलकावर असती तर ठीक होतं. पण तिथे ‘जुलुमी भारत सरकारने केलेल्या कारवाईत...’ अश्या आशयाचा एक आख्खा परिच्छेद होता. ‘ते विरुध्द आपण’, ‘त्यांचं विरुध्द आपलं’ असा त्यातला सूर पाहून मी सर्दच झाले. मान वळवून मी आजूबाजूच्या गर्दीकडे पाहीलं. ती गर्दी आणि आम्ही एकाच देशाचे नागरिक नव्हतो? त्या गर्दीवर त्या क्षणी काही संकट ओढवलं असतं तर भारत सरकार त्यांच्या मदतीला धावून येणार नव्हतं? तरीही ‘त्यांच्यात’ या मुद्द्यावर इतकी एकजूट होती की फलकावरच्या मजकुराच्या आशयाबद्दल कुणालाच काहीच गैर वाटू नये??
काहीश्या सैरभैर अवस्थेतच मी पुन्हा त्या लोखंडी गजांपलिकडे वाकून पाहिलं. आता आतल्या अंधाराला नजर सरावली होती म्हणा किंवा त्या माहितीफलकानं सगळं स्वच्छ करून दाखवलं होतं म्हणा, पण आत मला एक जुनाट, गिलावा न केलेली, विटाविटांची भिंत दिसली आणि त्या भिंतीवर जुनाट, काळपट रक्‍ताचे मोठमोठे ओघळही दिसले!! अंगावर क्षणभर काटा आला, डोकं सुन्न झालं. आधुनिक भारताच्या इतिहासातील एका दुर्दैवी कालखंडाच्या तितक्याच दुर्दैवी आणि क्लेषकारक खुणा तिथे सन्मानाने जपण्यात आल्या होत्या. शीख समुदायातील लोक तिथे नतमस्तक होत होते, मनातल्या मनात श्रध्दांजली वाहत होते.
काही कळेनासंच झालं. मी तश्याच बधीर अवस्थेत चार पावलं पुढे असलेल्या अजून एका माहितीफलकाच्या दिशेनं सरकले. तो फलक केवळ गुरूमुखी भाषेत होता. काय लिहिलं असेल त्यात? इतरभाषिकांना सहजगत्या वाचता येऊ नये यासाठी ते जाणीवपूर्वक केलं गेलं होतं का? असा प्रश्न पडला. ती अनाकलनीय लिपी आपल्याला वाकुल्या दाखवतेय असा भास झाला.
आता तिथून मला लवकरात लवकर बाहेर पडायचं होतं...
----------
सुवर्णमंदिरापासून अक्षरशः हाकेच्या अंतरावर असलेल्या जालियनवाला बागेत मात्र तुलनेनं अगदीच कमी गर्दी होती. एक बर्‍यापैकी प्रवेशद्वार, एकदोन सुरक्षारक्षक इतपत काहीतरी दिसेल अशी अपेक्षा होती. पण एका अरुंद गल्लीवजा रस्त्यावरूनच आम्ही आत गेलो.
DSC02241.JPG
प्रवेशद्वार नसण्याचं कारण थोड्याच वेळात लक्षात आलं.
मुळात ही बाग ‘उद्यान’ या अर्थाने बाग नाही. ‘जलियाँवाला बाग’ या गुरुमुखी संज्ञेचा अर्थ आहे सभोवतालच्या अनेक घरांची कुंपणं न घातलेली परसदारं एकत्र होऊन बनलेला, काहीएक विशिष्ट आकार-उकार नसलेला, उंचसखल असा भाग. (तिथे असलेल्या छोटेखानी संग्रहालयात ही माहिती वाचायला मिळाली.) साहजिकच त्या भागात आवर्जून कुणी जाणार नाही. म्हणूनच तिथे पूर्वीही प्रवेशद्वार नव्हतं आणि आताही नाही.
आतला बागेचा परिसर बर्‍यापैकी प्रशस्त आहे. मध्यभागी एक स्मारक आहे. ज्या जागेवरून जनरल डायरच्या आदेशाने सैनिकांनी निरपराध लोकांवर गोळ्या झाडल्या ती जागा निर्देशित केलेली आहे.
DSC02223.JPG
त्याच्याच शेजारी एक अमर-ज्योत पण आहे. (जनरल डायर हा नुसता जनरल नव्हे, तर ब्रिगेडियर-जनरल होता ही माहितीही त्या संग्रहालयात मिळाली.) बागेच्या डावीकडच्या भागात एक जुनी विहीर आहे. त्या विहिरीला कठडे नव्हते. त्यामुळे हत्याकांडाच्या वेळी आपापले जीव वाचवून पळणारे अनेक लोक नकळत त्या विहिरीत पडले आणि बुडून मेले. त्या विहिरीला आता लोखंडी जाळ्यांनी बंदिस्त केलं गेलं आहे. त्या जाळीवर रेलून मी आत डोकावून पाहिलं. विहिरीतल्या पाण्याचा काही भाग दिसला. तेव्हा किती लोकांचे आकांत, किंकाळ्या, आक्रोश त्या पाण्यानं ऐकले असतील! विहिरीतून जेव्हा एकशेवीस मृतदेह बाहेर काढले गेले तेव्हा त्यांच्या नातेवाईकांच्या शोकाला पारावार राहिला नसेल! किती विदीर्ण करणारी दृष्यं असतील ती सगळी...!
बागेच्या प्रवेशमार्गाच्या विरुध्द बाजूच्या भिंती आतल्या बाजूनं गिलावा, सुशोभिकरण न करता तश्याच विटांच्या बांधकामाच्या स्वरूपात राखल्या आहेत. ते जुनं, त्याकाळचं बांधकाम म्हणून तसंच्यातसं जपलं गेलं असावं हे लक्षात आलं. भिंतींवर ठिकठिकाणी तेव्हा झाडल्या गेलेल्या गोळ्यांच्या फैरींच्या अनेक खुणा निर्देशित केल्या गेल्या आहेत. काहीकाही खुणा तर १५-२० फूट उंचीवरच्याही आहेत.
DSC02231.JPG
ज्या-ज्या भिंतींवर खुणा आहेत त्या भिंतींच्या अगदी जवळ पर्यटकांना जाता येत नाही. पण पहिल्या भिंतीला काटकोनात एक अगदी तशीच भिंत होती. मी त्या भिंतीच्या अगदी जवळ गेले. नकळत त्या जुन्या विटांवरून हात फिरवला. मान वर करून पाहिलं. जीव वाचवण्यासाठी म्हणूनही त्या भिंतीवर चढणं निव्वळ अशक्य कोटीतलं वाटत होतं. तरीही त्यावेळेस अनेकजणांनी तसा प्रयत्न केला असेल आणि त्यात ते असफल झाले असतील, हकनाक प्राणाला मुकले असतील या विचारानं डोळ्यांत टचकन्‌ पाणीच आलं...
एकाच शहरातली हाकेच्या अंतराच्या फरकानं गोळीबार झालेली दोन ठिकाणं... प्रसंग, काळ वेगवेगळा असला तरी गोळीबाराच्या वेळच्या घटना विस्मृतीत जाऊ नयेत म्हणून दोन्ही ठिकाणी त्याची साक्ष देणार्‍या उद्‍ध्वस्त बांधकामांची जपणूक झालेली... नतमस्तक व्हावंसं वाटणारी माणसंही दोन्ही ठिकाणी... पण एके ठिकाणचं नतमस्तक होणं देशभक्‍ती, राष्ट्रभक्‍तीची जाणीव करून देणारं, तर दुसर्‍या ठिकाणी फुटीरतावादाचं आता शमलंय असं वाटणारं वादळ अजूनही निमालं नसल्याच्या खाणाखुणा...
अश्यावेळी पर्यटक म्हणून आपण काय करायचं? केवळ फोटो काढून, असले चार शब्द खरडून सगळं विसरून जायचं?
काय करायचं?
जगातली सर्वात महान अशी आपली संसदीय लोकशाही या अश्याच असंख्य विरोधाभासांच्या आधाराने उभी आहे, तरीही तिचा पाया डळमळत नाही याचा अभिमान बाळगायचा...?
का कधीतरी असल्या विरोधाभासांपायी तिचा पाया डळमळूही शकतो याची चिंता बाळगायची?
काय करायचं?

--------------------

(या लेखाची सुधारित आवृत्ती ’अनुभव’ मासिकाच्या जुलै-२०१४ अंकात प्रकाशित झाली.)

Comments

Naniwadekar said…
लेख आवडला; खूपच आवडला.

त्याला योग्य शीर्षक न दिल्याचे मात्र खटकले.
khupach chan lihila ahe, me pan amritsar la gelo hoto mala pan same tumchya sarkha anubhaw ala
Anonymous said…
अहो प्रीतिबाई,

१. >‘जुलुमी भारत सरकारने केलेल्या कारवाईत...’ अश्या आशयाचा एक आख्खा परिच्छेद होता.....

ती कारवाई जुलूमीच होती. आपल्याला सांगण्यात आलं की ब्ल्यू स्टार ६ जून १९८४ ला संपलं. पण बातम्या मात्र बाहेर आल्या त्या १४ जूननंतर. मध्यंतरात काय झालं असेल कोणास काय ठाऊक? शिवाय सरकारने कारवाई मुद्दामहून सणासुदीच्या दिवशी गर्दी टिपेला असतांना का केली? इंदिरा गांधीचा सल्लागार कोण होता तेव्हा? अरुण वैद्यांनी नकार का दिला नाही? अकाली दलाला संपवायची सुपारी भिंद्रनवाल्याला कोणी दिली होती? तो सुवर्णमंदिरात घुसला कोणाच्या पाठिंब्यावर? हे सगळे जुलूमच आहेत!

२. >ती गर्दी आणि आम्ही एकाच देशाचे नागरिक नव्हतो?.....त्या गर्दीवर त्या क्षणी काही संकट ओढवलं असतं तर >भारत सरकार त्यांच्या मदतीला धावून येणार नव्हतं?

पहिल्या प्रश्नाचं उत्तर होय असलं तरी दुर्दैवाने दुसर्‍या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी आहे. भेकड कसाबच्या औलादीने हल्ला केला होता तेव्हा भारत सरकार काय करीत होतं? जरी आपण एकाच देशाचे नागरिक असलो तरी सरकार नागरिकांच्या विरोधात आहे हे तुमच्या लक्षात येत नाही?

३. >जगातली सर्वात महान अशी आपली संसदीय लोकशाही.....

कुणी सांगितलं हे तुम्हाला? नक्की काय महान आहे? लोकशाही? संसद? आपण? की सारे जग?

४. आता जलियाँवाला बागेचा सूड उगवणार्‍या उधमसिंगाची कथा बघूया. जेव्हा रायफल किंवा पिस्तूल मिळवणे हेही एक दिव्य होतं तेव्हा उधमसिंगाने भारतातून इंग्लंडमध्ये जाऊन कुठूनतरी पिस्तूल मिळवलं. मायकेल ओ'ड्वायर हा जलियाँवाला बागेचा प्रमुख अपराधी होता. उधमसिंगाने त्याच्याशी सख्यही केलं. पण त्याला शक्य असतांनाही ठार मारलं नाही. योग्य प्रसिद्धी मिळेल असे वाटले तेव्हाच त्याला गोळ्या घातल्या. ही हत्या घडली लंडनच्या कॅक्स्टन हॉलमध्ये. तोवर जलियाँवाला बागेला २१ वर्षं उलटून गेली होती. त्यामानाने बियांत आणि सतवंत सिंगद्वयीने अवघ्या ५ महिन्यांतच कार्यभाग साधला. याला म्हणतात कार्यक्षमता! शीखांशी पंगा घ्यायचं काय कारण पडलं होतं मैमुना बेगमला? काही लोक हिला इंदिरा गांधी म्हणतात.

आपल्या लेखांचा चाहता,
बाळा नाडकर्णी
Anonymous said…
नुकताच एक लेख येऊन गेला लोकसत्तेत!

शीख दहशतवादामागे इंदिरा व संजय गांधींचे नियोजन?

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=155235:2011-05-08-19-04-38&catid=26:2009-07-09-02-01-20&Itemid=3

आपल्या लेखांचा चाहता,
बाळा नाडकर्णी
हेरंब said…
उत्तम लेख.. आवडला आणि मनात अनेक प्रश्नही उभे करून गेला..
Anonymous said…
प्रीतिबाई,

लेख चांगला होता हे सांगायचं विसरूनच गेलो. काय करणार आमच्या बाबतीत शेवटी आढ्याचं पाणी वळचणीला गेलंच.

काय बघितलं आणि काय वाटलं या दोन्ही गोष्टीतली सीमारेषा सुस्पष्ट आहे.

आपल्या लेखांचा चाहता,
बाळा नाडकर्णी

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)