पुस्तक परिचय : 'कथा अग्निशिखांच्या'


लोकसत्ता-लोकरंग पुरवणीत प्रकाशित झालेला (रविवार, दि. ३० जानेवारी २०११) माझा पुस्तक-परिचयपर लेख.
मूळ लेख इथे किंवा इथे (स्क्रोल-डाऊन करून) वाचता येईल.
-----------------------------------------
सशक्त माहितीपट
स्वातंत्र्यसंग्रामाचे धगधगते कुंड. थोडीथोडकी नव्हे तर तब्बल दीडशे वर्षे त्यात लाखो-करोडो आयुष्यांची आहुती पडली. त्यातल्या स्त्रियांच्या बलिदानाला कायमच दुय्यम स्थान मिळाले. पण त्याकाळच्या स्त्री-स्वातंत्र्यसैनिकांनी कधीही याची तमा बाळगली नाही. कधी स्थानिक पातळीवर तर कधी राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवर त्यांनी निष्ठेने आपली कर्तव्ये पार पाडली. स्वातंत्र्यलढ्यात खारीचा वाटा उचलला.
महात्मा गांधी, आगरकर, कर्वे, आंबेडकर यांसारख्या नेत्यांनी जी शिकवण दिली ती अंगिकारून आपापल्या परीने महान देशकार्य आणि समाजकार्य करणार्‍या अश्याच एकवीस अग्निशिखांचा परिचय लेखिका वीणा गवाणकर यांनी आपल्या ‘कथा अग्निशिखांच्या’ या पुस्तकात करून दिला आहे.
हे पुस्तक छोटेखानी दिसत असले तरी त्यामागे बरेच संशोधन दडले आहे हे वाचताना पदोपदी जाणवते. पुस्तक वाचताना एखादा सशक्‍त माहितीपट पाहत असल्यासारखे वाटते. प्रस्तावनेत नमूद केल्याप्रमाणे यांपैकी बहुतेक स्त्रियांचे कार्य लेखिकेने जवळून पाहिले आहे. त्यांच्याशी संवाद साधला आहे. त्यामुळे, लेखिकेच्याच शब्दांत सांगायचे झाले तर या लेखांनी एक मौखिक इतिहासाचीही छटा धारण केलेली आहे.
या कथांमधल्या सर्व स्त्रिया १९व्या आणि २०व्या शतकातील आहेत. त्यांतील अनेकजणी अस्सल मराठी मातीतल्या आहेत, तर अ‍ॅलीस अल्वारीस, मिठूबेन पेटीट, पेरीनबेन कॅप्टन, सफिया खान यांसारख्या पारसी, मुसलमान समाजातील देखील आहेत.
निवडणूक प्रचार, सभाबैठकांची व्यवस्था, पत्रके वाटणे, चिठ्ठ्या आणि इतर सामान संकेतस्थळांवर पोहोचवणे, सत्याग्रहींना मदत करणे, रोगराईच्या साथींत काँग्रेसचे स्वयंसेवक म्हणून काम पाहणे यांसारखी कामे त्यांनी आनंदाने केली. त्याबदल्यात अनेकदा घरांवरील जप्ती, तुरुंगवास, सश्रम कारावास यांना तोंड दिले.
स्वतः अंतर्बाह्य गांधीवादी असूनही तुरूंगातील स्त्री-सहकार्‍यांना कम्युनिझमचे धडे देणार्‍या डॉ. कमला अष्टपुत्रे; ४२.३४ मीटर्सवरून काँग्रेस रेडियो चालवणार्‍या डॉ. उषा मेहता; देशकार्यासाठी रस्त्यावरच उतरायला हवे असे नाही असे मानून सेवाग्राममधील कार्याला आयुष्य वाहिलेल्या महात्मा गांधींच्या सर्वात धाकट्या स्नुषा निर्मलाबेन; चिमूर-अष्टी खटल्यामुळे प्रकाशझोतात आलेल्या अनसूयाबाई काळे... एकेकीच्या झळाळलेल्या कर्तृत्वाची प्रचिती पुस्तकांतील पानापानावर मिळते.
परदेशातून आयात केलेल्या काचेच्या बांगड्या घालणे सोडून देणार्‍या ‘शापित स्वातंत्र्यसैनिका’ येसूवहिनी सावरकर, आजन्म सोने न वापरण्याचा सर्वांसमक्ष निर्धार करणार्‍या आणि तो आयुष्यभर पाळणार्‍या पद्मावती हरोलीकर, स्वतःच्या घरच्या हळदीकुंकवाच्या समारंभाला गावातील हरिजन स्त्रियांनाही आमंत्रित करणार्‍या जानकीबाई आपटे, चळवळीसाठी गावभर हिंडणे नवर्‍याला नापसंत आहे हे समजताच त्याचे दुसर्‍या मुलीशी लग्न लावून देऊन पूर्णवेळ चळवळीत उतरणार्‍या दगडाबाई धोपटेश्वरकर... छोट्याछोट्या गोष्टींमधून दिसणारी या सर्वांची तत्त्वांवरची निष्ठा, मनाचा निर्धार, त्याकाळच्या रुढी-परंपरांशी त्यांना करावा लागलेला संघर्ष नकळत आपल्याला नतमस्तक व्हायला लावतो.
यांतील अनेकींच्या मनात स्वातंत्र्योत्तर राजकारणपध्दतीबद्दल आणि राजकारण्यांबद्दल कडवटपणा आहे असे दिसून येते. स्वातंत्र्यलढ्यातील भारलेले दिवस, पूजनीय नेते, ठाम विचारसरणी, आदरणीय मूल्ये यांची स्वातंत्र्योत्तर काळातील वानवा त्यांना दुखावून जाते.
पुस्तकाच्या मुखपृष्ठावर आणि मलपृष्ठावर मिळून एकूण आठजणींची रेखाचित्रे आहेत. प्रस्तावनेतील उल्लेखावरून लक्षात येते की या आठजणींचीच छायाचित्रे लेखिकेकडे उपलब्ध होती. आजच्या पिढीला या सर्वजणींची नावे आणि त्या नावांमागचे चेहरे माहीत असण्याची शक्यता अगदीच कमी. काही मोजके अपवाद वगळले तर आपापल्या प्रदेशाबाहेर सगळ्याच तश्या अज्ञात राहिलेल्या. त्यामुळे पुस्तक वाचून संपवल्यावर वाचक नकळत त्या अज्ञात, रेखांकित चेहर्‍यांमागची ओळख पटवू पाहतो.
‘स्त्री-अभ्यासकां’साठी हे पुस्तक, यातील संदर्भ महत्त्वाचे ठरू शकतात. मात्र या पुस्तकात अनेक गंभीर मुद्रणदोष राहून गेले आहेत. उदा. ‘गोव्याची माहेरवाशीण’ऐवजी ‘गोठ्याची माहेरवाशीण’; ‘करेंगे या मरेंगे’च्या जागी ‘करेंगे तो मरेंगे’. तसेच, बहुतेक ठिकाणी अवतरणचिन्हे पूर्ण केली गेलेलीच नाहीत. अश्या चुका टाळल्या गेल्या असत्या तर बरे झाले असते असे राहून राहून वाटते.
ते काहीही असले तरी ‘... देशभक्ती ही वृत्ती आहे. मानसिक शक्‍ती आहे. ती देऊन देता येत नाही किंवा घेऊन टिकवताही येत नाही...’ हा संदेश देणारे हे पुस्तक स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या प्रत्येकाने वाचायलाच हवे.
************
कथा अग्निशिखांच्या, रोहिणी गवाणकर.
श्रीविद्या प्रकाशन. पृष्ठे १८५. मूल्य २०० रुपये.

Comments

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)