स्वप्न नावाचं आश्चर्य


लग्नाचा एक मोठा हॉल, पाहुण्यांनी खचाखच भरलेला... एक मध्यमवयीन महिला प्रफुल्लित चेहर्‍यानं हॉलमधे प्रवेश करते. तिची एक अतिशय लाडकी गर्भरेशमी साडी तिने नेसलेली आहे; साडीला साजेसे दागिने घातलेले आहेत... तिकडे लांबवर, हॉलच्या अंतर्भागात वधू-वर लग्नविधींत मग्न आहेत. त्यामुळे तिला त्यांचे चेहरे दिसत नाहीत... मात्र पाहुण्यांच्या गर्दीत बहुतेक सगळे चेहरे तिच्या परिचयाचे आहेत. त्यामुळे बरेचजण तिच्याकडे पाहून हसत आहेत, हात हलवत आहेत, ओळख देत आहेत, काही आपणहून येऊन तिच्याशी जुजबी गप्पा मारत आहेत, काही जणांशी ती जाऊन बोलत आहे... असं करत करत ती हळूहळू लग्नविधींच्या जागेकडे सरकते... आता गर्दीत तिला तिच्या स्वतःच्याच घरची, सासरची वरिष्ठ मंडळी दिसायला लागली आहेत. पण त्यांना तिथे पाहून तिला मुळीच आश्चर्य वाटलेलं नाही किंवा हे सगळे असताना त्यांच्याबरोबर न येता आपण अशा एकट्याच का आलो इथे हा प्रश्नही पडलेला नाही... ती वधू-वरांजवळ पोहोचेपर्यंत तिथलं दृष्य मात्र आता अचानक बदललं आहे. आता तिथे ग्रुप-फोटो-सेशन सुरू झालं आहे. वधू-वरांचे चेहरे अजूनही तिला दिसलेले नाहीत. ते पाहण्याच्या आटोकाट प्रयत्नात असतानाच फोटोग्राफर तिला मागच्या ओळीत जाऊन उभं रहायला सांगतो... तिच्या घरचे सगळे फोटोसाठी तिच्या आजूबाजूला येऊन उभे राहिले आहेत. त्यांच्या आपापसांतल्या गप्पा ऐकून तिला अचानक अस्वस्थ वाटायला लागतं. या गप्पा, हे संवाद आपण याआधीच कुठेतरी ऐकलेले आहेत अशी शंका येते. नक्की काहीतरी गडबड आहे हे लक्षात येतं, पण म्हणजे नेमकं काय ते कळत नसतं... वधू-वरांचे चेहरे पाहणं तिला आता अत्यंत निकडीचं वाटायला लागतं. काय करावं हे न सुचून तिची स्वतःशीच चुळबूळ सुरू होते... इतक्यात तिच्या घरच्यांशी काहीतरी बोलायला म्हणून तिच्या पुढ्यातल्या सजवलेल्या खुर्च्यांवर बसलेले वधू-वर मागे वळून पाहतात. त्यातल्या वधूचा चेहरा अनोळखी आहे, मात्र वराचा चेहरा पाहून तिला जबरदस्त धक्का बसतो.
कारण, तो तिचा स्वतःचाच नवरा असतो!
मगापासून आपल्याला अस्वस्थ का वाटत होतं ते तिच्या लक्षात येतं... आपल्या घरच्यांचीही अशीच प्रतिक्रिया झाली आहे का ते पहायला ती त्यांच्याकडे वळते, तर ते आपांपसांत चेष्टा-मस्करी, हास्यविनोद करण्यात गुंतलेले आहेत. वराचा चेहरा पाहून त्यांच्यात काहीही फरक पडलेला दिसत नाही... आपल्या घश्याला कोरड पडत आहे की काय असं तिला वाटायला लागतं. तिला कळत नाही की हे असं का होत आहे, कुणी हा लग्नसमारंभ थांबवत का नाही, माझ्या मदतीला का येत नाही... तिला आता खूप म्हणजे खूपच अस्वस्थ, उदास, एकाकी वाटायला लागतं. पुढे होऊन सर्वांना थांबवावंसं वाटतं, पण तिचे पाय जागीच खिळून राहिलेत, जणू साखळदंडात तिला कुणीतरी जखडून ठेवलं आहे... तिचा चेहरा घामानं डबडबतो. हातातल्या रुमालानं ती घाम टिपायचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करते, पण तिच्या कपाळावर घर्मबिंदू पुनःपुन्हा उमटतच राहतात.....
आता आठवलं की खूप गंमत वाटते पण काही वर्षांपूर्वी मला पडलेलं हे एक स्वप्न होतं.
स्वप्नातली मध्यमवयीन महिला म्हणजे मी स्वतःच होते. त्या स्वप्नातून (की झोपेतून?) मी जागी झाले तेव्हा रात्रीचा एक प्रहर उलटून गेला असावा. मला जाग आली होती ती त्या स्वप्नामुळे नाही, तर वीज गेल्यामुळे पंखा बंद पडून मला उकडायला लागल्याने. स्वप्नातले ते घर्मबिंदू खरोखरचेच माझ्या कपाळावर उमटले होते. मी गाढ झोपेत असल्याने त्यांची जाणीव मला आधी स्वप्नातच व्हावी हे सयुक्तिकच होतं. पण त्या घर्मबिंदूंच्या उगमाचं हे असं वेगळंच, विचित्र आणि 'मनी वसे ते...' या नियमाला धाब्यावर बसवणारं विनोदी कारण माझ्या स्वतःच्याच स्वप्नानं मला दाखवावं??
प्रत्यक्षात कधीही घडण्याची सुतराम शक्यता नसलेला असा हा सगळा प्लॉट उभा राहून, नेपथ्य-रंगभूषा-वेषभूषा सगळ्याची जय्यत तयारी करून, सर्व पात्रांकडून व्यवस्थित सराव करून घेऊन, वीज गेल्यानंतरच्या एक-दीड मिनिटांच्या अवधीत सगळा प्रवेश माझ्या डोक्यात सादर झाला. हे सगळं घडवून आणणार्‍या मानवी मेंदूला कुठल्या तोंडानं निद्रिस्त म्हणायचं, तुम्हीच सांगा! आपल्याला जेव्हा स्वप्नं पडतात तेव्हा शरीराने जरी आपण झोपलेलो असलो तरी आपला मेंदू आणि मन दोघंही टक्क जागे असतात आणि 'फुल्ल बिझी'ही असतात याचा हा एक सज्जड पुरावाच म्हटला पाहीजे.
उकाड्याशी, घामाशी संबंधित इतर अनेक गोष्टी होत्या, ज्या मला स्वप्नात दिसणं अगदी सहजशक्य होतं. जसं, भर उन्हात मी एखादा गड सर करते आहे किंवा एखादं वाळवंटातलं दृष्य. किंवा, अगदी कल्पनेच्या भरार्‍या मारायच्याच नसतील, तरी गेला बाजार स्वयंपाकघरात गॅसच्या शेगडीसमोर मी काम करत असतानाचं दृष्य.
बर्फाच्छादित शिखरांप्रमाणेच मला वालुकामय प्रदेशांचंही आकर्षण आहे. एखादं अस्सल, करकरीत, जिवंत वाळवंट प्रत्यक्ष पहायचा योग अजून आलेला नसला तरी भविष्यात कधी ना कधीतरी ते करायला मला नक्कीच आवडेल. मग असंच एखादं वाळवंट, 'मी' ऐवजी 'आम्ही!' म्हणणारं तिथलं ऊन आणि त्या वाळवंटातून वाट शोधत निघालेली एखादी मध्यमवयीन महिला, असं स्वप्न मला पडलं असतं तरी काही हरकत नव्हती.
तसंच, सूर्य डोक्यावर तळपत असतानाही बरोबरच्या इतर लोकांना मागे टाकून मी भराभर पावलं उचलत, होणार्‍या दमछाकीकडे दुर्लक्ष करत, एखादा अवघड गड चढत आहे हे दृष्य (किमान) स्वप्नात पहायला मला तरी खूपच आवडलं असतं.
तीच गत स्वयंपाकघरातल्या दृष्याची! आजवर मी तिथे जितका घाम गाळलाय तितका इतरत्र कुठेही गाळलेला नाही. पण कदाचित, जागेपणी जे करायचं तेच स्वप्नातही कशाला पहायचं, या विचाराने हे स्वयंपाकघरातल्या कामांचं आणि टळटळीत ऊन्हात वाळवंटात जाण्याची किंवा गड चढण्याची मी स्वप्नातसुध्दा कल्पना करू शकणार नाही, या समजुतीने बाकीची दोन्ही दृष्यं माझ्या स्वप्न-अजेंड्यातून बाद झाली आणि ध्यानीमनी नसणार्‍या अशा एका चौथ्याच गोष्टीचं मला स्वप्न पडलं. (बाकी, 'स्वप्नात' या शब्दाला विरुध्दार्थी शब्द म्हणून 'जागेपणी' हा शब्द त्यामानाने अगदीच गुळमुळीत वाटतो, पण तो वापरण्याशिवाय पर्याय नाही.)
तशी मला स्वप्नं पडतच नाहीत असं अजिबात नाही. पडतात, अगदी भरपूर पडतात! पण ती सगळी 'असा मी असामी'तल्या धोंडो भिकाजी जोशीप्रमाणे, गाडी चुकल्याची किंवा गणिताच्या पेपरला एकही गणित सुटत नसल्याची!
मैत्रिणीच्या मुलाच्या मुंजीला नेसायच्या ठरवलेल्या साडीवरचं, आदल्या दिवशीच इस्त्री करून ठेवलेलं, मॅचिंग ब्लाऊज घरभर शोधूनही सापडत नाही; घरी आलेल्या पाहुण्यांची जेवायची वेळ झालेली आहे आणि ताटाळ्यात मला एकच ताट दिसत आहे; घरी जायची घाई असताना रेल्वे-स्टेशनवरच्या जिन्याच्या पायऱ्या मी कितीतरी वेळ उतरत आहे, उतरत आहे, पण जिना संपतच नाही; असली एकंदर 'मेस' किंवा सावळ्या गोंधळाची स्वप्नं मला हमखास पडतात. अशा प्रसंगांमुळे आयुष्यात भयंकर काहीतरी उलथापालथ घडणार असते अशातला भाग नाही. पण स्वप्नात त्या त्या वेळी मी खूप अस्वस्थ, हरवल्यासारखी असते एवढं मात्र नक्की. आणि दरवेळेला अशी स्वप्नं पडायला वीज गेल्याचं किंवा उकाड्याचंच कारण नसतं.
अशा स्वप्नांचे अर्थ आणि त्यावरून त्या त्या व्यक्तिच्या स्वभावाचे, जडणघडणीचे अंदाज बांधणारं, मानवी मनाची गूढ रहस्ये उकलण्याचा प्रयत्न करणारं विपुल लेखन सिग्मंड फ्रॉईडसारख्या अनेक तत्त्ववेत्त्यांनी केलेलं आहे. पण त्या तपशीलात मला शिरायचं नाही. ते काम आपुले नोहे! (असल्या विषयावरची पुस्तकं मी चाळत आहे आणि त्यांत फक्त मला पडणार्‍या स्वप्नांचेच उल्लेख दिसत नाहीत, असं स्वप्नंही मला कधीतरी पडेल; मग कदाचित ते मला करावंसं वाटेल!) पण तरीही कधीकधी विचार केल्याशिवाय राहवत नाही.
स्वप्नात दिसलेलं ते लग्नाचं दृष्य आणि त्यावेळची माझी प्रत्यक्षातली स्थिती यात ढोबळमानानं फक्त दोनच साम्यं होती. पहिलं म्हणजे अस्वस्थता आणि दुसरं कशाचीतरी बिघडलेली लय. डोक्यावर सतत भिरभिर फिरणारा पंखा आणि माझी अस्वस्थता यांचं आपांपसांत नेहमीच व्यस्त प्रमाण असतं. वीज गेल्याने पंखा बंद पडला, माझी अस्वस्थता वाढायला लागली, हळूहळू झोपेची लय बिघडली आणि एका क्षणी मला जाग आली, इतकं साधं सरळ असायला हवं होतं सगळं! पण ती झोपेची बिघडलेली लय संसाराच्या बिघडलेल्या लयीत परिवर्तित झाली, शारीरिक अस्वस्थतेची जागा मानसिक अस्वस्थतेने घेतली आणि अगदी 'आपुले मरण पाहिले म्या डोळा'च्या ऐटीत(?) मला ते स्वप्न दिसलं.
आपल्याला पडलेली स्वप्नं अनेकदा दुसर्‍या दिवशी आपल्याला आठवतही नाहीत. काही थोड्या वेळापुरती लक्षात राहतात आणि नंतर ती आपण विसरून जातो. हे विशिष्ट स्वप्न मात्र मी अजून विसरलेले नाही. अधूनमधून ते मला आठवत राहतं. सगळं दृष्य जसंच्या तसं डोळ्यांसमोर उभं राहतं. फार खोलात शिरून त्याची कारणमीमांसा करण्याच्या फंदात मी फारशी पडत नाही. त्याची मला गरजही वाटत नाही. पण असं स्वप्न मुळात आपल्याला दिसावंच का याचं स्वतःशीच नवल मात्र करत राहते!
--------------------------
बर्‍याच कालावधीनंतर नुकतंच हे स्वप्न मला परत आठवलं होतं. तो दिवस वटपौर्णिमेचा होता हे मला नंतर कळलं. कळल्यावर आधी हसूच आलं. त्या दिवसाशी निगडित असलेला धार्मिक अर्थ, सुवासिनींसाठी सांगितलं गेलेलं त्याचं महत्त्व, यातल्या कशावर माझा स्वतःचा फारसा विश्वास नसतानाही घडलेल्या या योगायोगाला तरी काय म्हणावं!
सिग्मंड फ्रॉईड प्रभृतिंसारख्यांकडे आहे याचं उत्तर??
--------------------------------------------------------------------------
(मनोगत डॉट कॉमच्या २०१०-दिवाळी अंकात प्रकाशित झालेला लेख.)

Comments

हं. विचित्र स्वप्न! योगायोगही विचित्रच!

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)