दोन पुरातन पासवर्ड्स


एकदा पंधरा ऑगस्टच्या आसपास कधीतरी आमच्या केबलवाल्यानं एका दुपारी चक्क ‘२२ जून १८९७’ हा सिनेमा लावला होता. मी टी.व्ही. लावला तेव्हा सिनेमा अर्धाअधिक संपला होता पण तरीही मला तो पाहून एकदम नॉस्टॅल्जिक वगैरे व्हायला झालं. शाळेत असताना जुन्या कृष्ण-धवल दूरदर्शनवर जितक्या वेळा तो लागायचा तितक्या वेळा आईची बोलणी खात मी तो पाहीलेला होता.
मी ताबडतोब माझ्या मुलाला मस्का, गूळ इ.इ. लावून शेजारी बसवून घेतलं आणि तो उर्वरित सिनेमा पहायला लावला. ‘मुंग्यान्‌ मेरुपर्वत तर नाय ना गिळलनीत...’च्या आविर्भावात माझा मुलगा आश्चर्यानं माझ्याकडे बघायला लागला. आई आपणहून टी.व्ही.वरचा सिनेमा बघ म्हणतीए म्हणजे काय! पण पडत्या फळाची आज्ञा मानून तो लगेच माझ्या शेजारी येऊन बसला. (प.फ.ची आज्ञा मानली नाही तरी आई ब.भ. म्हणजे बर्‍यापैकी भडकते - हे त्याचंच वाक्य!)
पडद्यावर रॅन्डच्या खुनाचं दृश्य सुरू झालं.
"गोंद्या आला रे...", जोडीला घोड्याच्या टापांचा आवाज. "गोंद्या आला रे..."
आता, सिनेमातले संवाद लक्षपूर्वक ऐकायच्या फारशा फंदात न पडल्यामुळे माझ्या शेजारच्या त्या विसाव्या शतकात जन्मलेल्या आणि एकविसाव्या शतकात वाढणार्‍या अजाण बालकाला ‘गोंद्या आला रे’चा अर्थ कळेना.
"तो त्यांनी एक खुणेचा शब्द ठरवलेला असतो." मी.
"खुणेचा शब्द? म्हणजे काय?" तात्काळ एक अजाण प्रतिप्रश्न!
मला एकविसाव्या शतकाची काळजीच वाटायला लागली.
दरम्यान तिकडे चाफेकर बंधुत्रयीतल्या एकानं पिस्तुल सरसावलेलं होतं.
"अरे, म्हणजे ते शब्द ऐकू आले की मगच गोळी झाडायची, तोपर्यंत झाडीत चुपचाप बसून रहायचं असं त्यांनी ठरवलेलं असतं." अजाण प्रश्नाला माझं २ ते ३ वाक्यात सविस्तर उत्तर.
"अच्छा! म्हणजे तो त्यांचा पासवर्ड असतो! मग असं थोडक्यात सांग ना. उगीच किती तो रेफरन्स टू कॉन्टेक्स्ट..." गप्प बसेल तर तो एकविसाव्या शतकाचा प्रतिनिधी कसला!
तितक्यात पडद्यावर ठो! ठो! ठो! गोळ्या झाडल्याचा आवाज झाला. रॅन्डचा खेळ खल्लास झाला. पण माझ्या डोक्यात निराळाच सुरू झाला...
‘गोंद्या आला रे’ या शब्दांना पासवर्ड म्हणायचं? आधी मनाला पटेना. म्हणजे ते हाजमोलाच्या जाहिरातीत असतं ना - ‘ये बात हजम नहीं हुई’, तसलं काहीतरी मला वाटायला लागलं.
पासवर्डचा मराठीतला अर्थ... परवलीचा शब्द! बरोबर! चाफेकर बंधूंनी तो परवलीचा शब्द म्हणूनच तर वापरलेला होता! मग केवळ मायमराठीच्या जागी इंग्रजीमावशीकडच्या शब्दाला आणून बसवल्यावर ही बाब पचवायला कठीण जाण्याचं खरं म्हणजे काहीही कारण नव्हतं.
चाफेकर बंधूंपैकी ज्येष्ठ चाफेकरांच्या आत्मचरित्रात ‘गोंद्या आला रे’च्या ऐवजी नुसता ‘गोंद्या’ याच शब्दाचा उल्लेख आहे, चित्रपटात त्याच्यापुढे ‘आला रे’लावण्यात आलं आहे असं मी मागे कुठेतरी वाचलं होतं. (यालाच ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ म्हणतात असंही मी तेव्हा वाचलं होतं.)
‘गोंद्या आला रे’ या शब्दांची इतकी जादू तेव्हा मनावर झाली होती की रँड किंवा तो दुसरा चुकून मारला गेलेला इंग्रज अधिकारी यांच्यापैकी एकाच्याही नावाशी ‘गोंद्या’ या शब्दाचं साधर्म्य नसताना चाफेकर बंधूंनी तोच शब्द का बरं निवडला असेल, ‘पांडू आला रे’ किंवा गेला बाजार ‘हणम्या आला रे’ यांचा वापर का केला नसेल असले प्रश्न तो चित्रपट इतक्या वेळा पाहूनही कधी पडले नाहीत. पण पासवर्डचं हेच तर मुख्य काम असतं - हीच ती व्यक्ती जिच्याशी पुढे घडणार्‍या गोष्टींचा, घटनांचा संबंध आहे अशी ओळख पटवायची. बास! मग भले त्या गोष्टी-घटनांशी त्याचा अर्थार्थी संबंध नसेना का!
२०-२२ वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये कम्प्युटर सायन्सचं शिक्षण घेत असताना आमचा ‘पासवर्ड’ या शब्दाशी प्रथम संबंध आला होता. तेव्हाच खरं म्हणजे हे ध्यानात यायला हवं होतं की ही पासवर्डची संकल्पना जी आपल्याला आत्ता काहीतरी नवीन, अद्‍भूत, जगावेगळी वाटते आहे ती फार पूर्वीपासून, १८९७ सालापासूनच अस्तित्त्वात आहे.
पण नाही!... काळाच्या डोहात अजून खोलवर डोकावलात तर माझ्याप्रमाणेच तुमच्याही असं लक्षात येईल की ‘गोंद्या आला रे’च्या आधीचाही असा अजून एक शब्दसमूह आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे आणि तो म्हणजे अलिबाबाच्या गोष्टीतला ‘तिळा तिळा दार उघड’ हा परवलीचा शब्द.
लहानपणी अलिबाबाची गोष्ट जेव्हा मी प्रथम ऐकली तेव्हापासून ‘तिळा तिळा दार उघड’मधल्या तिळाचा तिळगुळातल्या तिळाशी काही संबंध असेल अशी पुसटशी शंकाही माझ्या मनाला कधी चाटून, पुसून, स्पर्शून अथवा छेदून गेली नाही. ‘तिळा तिळा दार उघड’ असं म्हटल्यावर खजिन्याच्या गुहेच्या तोंडावरची मोठी शिळा बाजूला सरकायची. त्या ‘तिळा’ आणि ‘शिळा’ या यमकातच मी अनेक वर्षं अडकलेले होते. माझा मुलगा लहान असताना कुणीतरी त्याला भेट म्हणून दिलेल्या गोष्टींच्या इंग्रजी पुस्तकातली अलिबाबाची गोष्ट जेव्हा मी वाचली तेव्हा त्यातला ‘सेसमि’ हा शब्द पाहिल्यावर त्याचा तीळ-खोबरं मधल्या तिळाशी संबंध आहे याचा माझ्या डोक्यात प्रकाश पडला.
हा परवलीचा शब्द ठरवणार्‍यांनी तरी काय नामी शक्कल लढवली असेल! गुहेच्या तोंडावरची एक अजस्त्र शिळा आणि ती उघडून आत प्रवेश मिळवण्यासाठी शब्द कुठला वापरायचा... तर म्हणे तिळा! पण म्हणूनच तो खजिना त्या गुहेत सुरक्षित राहिला असेल. कारण तत्कालीन ‘हॅकर्स’नी जन्मभर डोकेफोड केली असती तरी तो तिळाचा पासवर्ड ओळखणं त्यांना जमलं नसतं.
गोष्टीतला अलिबाबाचा भाऊ कासिम गुहेतून ‘साईन आऊट’ करताना पासवर्ड विसरतो आणि आतच अडकतो. साधा एक परवलीचा शब्द तो लक्षात ठेवू शकत नाही आणि परिणामी स्वतःचे प्राण गमावून बसतो. चाफेकर बंधूंना तर हा परवलीचा शब्द विसरण्याचा पर्यायच उपलब्ध नव्हता. आणि जरी तो असता तरी देशभक्तीनं भारलेल्या आणि इंग्रजांच्या द्वेषानं भरलेल्या तेव्हाच्या वातावरणात त्यांच्या हातून तसं घडणंच शक्य नव्हतं.
मात्र आजच्या काळात असे कासीमपंथीय अनेक सापडतील. अशा पासवर्ड विसरणार्‍या मंडळींच्यात माझा नंबर बराच वरचा लागेल. मला आठवतंय इंटरनेट, ई-मेल इ.चा घरगुती वापर जेव्हा अगदी नवीन होता तेव्हा मी उत्साहाच्या भरात दोनतीन वेगवेगळी ई-मेल अकाऊंट्स उघडली होती. प्रत्येक अकाऊंटला वेगळा पासवर्ड ठेवायचा हा जणू अलिखित नियम असल्याप्रमाणे मी माझ्या कल्पकतेचा पुरेपूर वापर करून हॅकर्सना आव्हान देण्याच्या थाटात वेगवेगळे पासवर्ड्स पण तयार केले होते. सुरूवातीचा उत्साहाचा भर ओसरल्यावर ते तर्‍हेवाईक पासवर्ड्स लक्षात ठेवणं म्हणजे एक कटकट होऊन बसली होती. (फर्‌गॉट पासवर्ड? क्लिक हिअर...ची मदत तेव्हा उपलब्ध नव्हती किंवा असलीच तर ती वापरायची कशी याची मला माहिती नव्हती.) बरं, आपले पासवर्ड्स कुठेही लिहून ठेवायचे नसतात हा कॉलेजमध्ये असतानाच मिळालेला धडा. तेव्हा आमच्या शिक्षकांनी त्या गोष्टीची आम्हाला इतकी भीती घालून ठेवली होती की आजही पासवर्ड लिहून ठेवायचा असं नुसतं मनात जरी आणलं तरी मला त्यामुळे काही जगबुडी वगैरे येईल की काय असं वाटतं.
विविध ई-मेल्स, लॉग-इन अकाऊंट्स, नेट बॅन्कींग, ए.टी.एम.कार्ड्सचे पिन नंबर्स, टी.व्ही.चॅनल्सचं पेरेंटल लॉक... यादी बरीच मोठी आहे!
ही लांबलचक यादी पाहून खरंच हे पुरेपूर पटतं की आपण कम्प्युटर आणि तत्सम इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सच्या अधिकाधिक आहारी जात आहोत. त्यापायी आपल्याला खंडीभर पासवर्ड्सचीही गरज भासते. ते लक्षात ठेवण्यासाठी मग आपल्याला आपल्या मेंदूतच आधी ‘ऍडिशनल डिस्क स्पेस’ बनवावी लागते. तरीही काही विसराळू कीबोर्ड-बडवे मंडळींच्या मेंदूतली ही ऍडिशनल जागा सफिशियंट नसते. त्यामुळे ते पासवर्ड विसरतात. मग त्यांना खुणेच्या प्रश्नाचा आधार घ्यावा लागतो. तरी नशीब की आपण निवडलेला खुणेचा प्रश्न आपसूकच स्क्रीनवर दिसतो. नाहीतर मग परिस्थिती अजूनच गंभीर झाली असती...
असो.
‘गोंद्या आला रे’ या शब्दांना माझ्या मुलानं पासवर्ड ठरवल्यामुळे मी कंप्युटरपूर्व युगातले परवलीचे शब्द शोधत अशी सगळीकडे फिरून आले.
तुम्हाला आठवतायत का अजून असले काही जुन्या काळातले पासवर्ड्स?

Comments

Naniwadekar said…
प्रीतिबाई : लेख अतिशय आवडला.

"तुम्हाला आठवतायत का अजून असले काही जुन्या काळातले पासवर्ड्स?" --- विष्णुसहस्रनाम वगैरे जप या सुखसमाधानाच्या गुरुकिल्ल्याच मानल्या ज़ात. आणि किल्ली म्हणजे locking-unlocking हे प्रकार आलेतच. रामाचे नाव घ्यायला टाळाटाळ करेल अशा तामसी माणसाला 'मरा' शब्द घोकायला सांगून त्याच्याकडून 'मरा-मराम-राम-राम-राम-रा' वदवून घेतल्याची हकीकत आहेच. हे झाले अध्यात्मिक double-encryption. (तुमच्या चिरंजीवांसाठी - ख्रिस्तपूर्व विसावे शतक ते ख्रिस्तोत्तर विसाव्या शतकांत 'म्हणवून' शब्दासाठी कधीकधी 'वदवून' हा शब्द वापरत.)

- नानिवडेकर
लेख छानच झाला आहे! अगदी पुरातन नाही, पण "बुद्ध हसला" हा १९७४ आण्विक प्रकल्पाचा पासवर्ड होता.
हेरंब said…
>>प.फ.ची आज्ञा मानली नाही तरी आई ब.भ. म्हणजे बर्‍यापैकी भडकते - हे त्याचंच वाक्य!

हा हा हा
निरंजन,
'आणि बुध्द हसला' हे शब्द कधीच वापरले गेले नव्हते असा उल्लेख मी आर्मीच्या वेबसाईटवर वाचला. (त्या अणुचाचणीच्या वेळी हजर असलेल्या अधिकार्‍यांनीच तसं सांगितलंय.)
त्यामुळे त्यावरचा परिच्छेद मी लेखातून काढून टाकला

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)