गोरखगड ट्रेक


दहा जानेवारीच्या रविवारी मुंबई, ठाणे, डोंबिवली परिसरातल्या काही जणांनी गोरखगडाचा ट्रेक करायचा ठरवला. त्याची कुणकुण लागताच गोरखगड खूष झाला.
गोरखगड - मुरबाडपासून अर्ध्या-पाऊण तासाच्या अंतरावर उभा. मुरबाडहून निघाल्यावर म्हसे गावाकडे जाताना एका वळणानंतर अचानक समोर दिसणारा

डावीकडच्या आपल्या छोट्या भावाला, मच्छिंद्रगडाला सतत साथसोबत करणारा. पण या दोघांच्या शेजारीच सिध्दगड आणि त्याच्या मागे दमदम्या असे दोघं मल्ल उभे... त्यामुळे हे दोघं भाऊ त्यांच्यासमोर लांबून तसे खुजेच वाटत होते.

ट्रेकर्सपैकी काही मंडळींना ते पाहून मनात वाटूनही गेलं असेल की हॅत्तिच्या! इतकसंच तर चढायचं आहे! पण पायथ्याच्या देहरी गावातल्या रस्त्यावर उभे राहून आरामात चहा पिणार्‍या त्या तेवीस जणांपैकी काहींची अवस्था आणखी तासाभराने काय होणारे ते ओळखून गोरखगड त्यांच्याकडे बघून मनातल्यामनात हसत होता.

सव्वानऊला मंडळींनी चढायला सुरूवात केली. चढण फार कठीण नव्हती. ज्यांना नेहमीचा सराव होता अशी मंडळी झपाझप पुढे निघाली. हपापत, दमत, हळूहळू चढणार्‍या काहीजणांना मात्र आसपासची सुंदर दृश्यं बघण्याचीही सवड नव्हती.

तासाभरानंतर सर्वजण एका ठिकाणी थोड्या विश्रांतीसाठी थांबले. तुफान वारा आणि समोरचा अप्रतिम देखावा यामुळे थकवा बघताबघता पळून गेला.


गोरखगडाच्या चेहर्‍यावरचं मंदस्मित मात्र अजून तसंच होतं.



ताजेतवाने होऊन सगळे पुन्हा निघाले. वाटेत हे पुरातन काळात वापरलं जाणारं होकायंत्र दिसलं.




आकार शंकराच्या पिंडीचाच. लांबट बाजू नेहमी उत्तर दिशा दाखवते. अनेकांच्या माहितीत मोलाची भर पडली.
थोड्याच वेळात रॉक-पॅच सुरू झाला.


गोरखगड सकाळपासून याच क्षणाची वाट पाहत होता!
फोटोत वर दिसणार्‍या, छोट्याश्या केशरी चौकटीच्या दरवाज्याजवळ मंडळी बघताबघता पोहोचली.

हळूहळू ट्रेकची नशा चढत होती. उजवीकडे मच्छिंद्रगडाचा सुळका दिसत होता.

पण त्याला न्याहाळण्याची सवड होती कुणाला!

कारण अजून बराच पल्ला गाठायचा होता.

तास दीड तासापासून आत्ता येतील, मग येतील असं वाटणार्‍या गोरखगडाच्या गुहा शेवटी एकदाच्या आल्या.

पण ट्रेक अजून संपलेला नव्हता. गुहेपाशी कुणाला फारसं विसावू न देता लीडर पुन्हा सर्वांना घेऊन निघाले.

मच्छिंद्रगडाचा सुळका आता बुटका वाटायला लागला होता.

... शेवटी चढायला सुरूवात केल्यानंतर तीन तासांनी सर्वजण गोरखगडाच्या माथ्यावर पोहोचले.

तिथे गोरखनाथाचं छोटंसं देऊळ होतं. देवळाबाहेरच्या झाडांच्या सावलीत सर्वजण विसावले. तिथे सर्वांनी आरती केली, नारळ चढवला, तिळगुळाचे लाडू आणि झेब्रा गोळ्यांचा नैवेद्य वाटला.
नवख्यांनीही न घाबरता, न खचता, निष्णात मंडळींच्या मदतीनं सर्व अवघड चढ पार केल्यामुळे गोरखगड आता मात्र सर्वांवर खूष होता.
खाली उतरून गुहेत बसून सर्वांनी जेवण घेतलं. थोडावेळ आराम केला आणि दुपारी दोनच्या सुमाराला सर्वजण तिथून निघाले.


आता रॉक पॅचवरून एकएक पाऊल, एकएक पायरी खाली उतरणं जास्त आव्हानात्मक होतं



वाटेतल्या एका पायरीवर शीलालेख वाटावा असं काहीसं लिखाण दिसलं.



काही पुरातन अवशेषही दिसले.



खाली उतरताना एकएक टप्पा पार केल्यावर मान वळवून वर बघितलं जात होतं. आपण वरच्या बारीकश्या केशरी चौकोनाच्याही कितीतरी पुढे जाऊन आलो यावर विश्वासच बसत नव्हता.



संध्याकाळी पाच वाजता सर्वजण गडाच्या पायथ्याशी परतले. मावळतीच्या उन्हातला गोरखगड आता आपलासा वाटत होता.



हौशी, उत्साही ट्रेकर्सच्या अजून एका गटानं चढाई यशस्वीपणे पूर्ण केल्यामुळे तो आनंदला होता. त्याचाही अजून एक रविवार सत्कारणी लागला होता!

Comments

mannab said…
I am extremely thankful to you for your Gorakhgad trek report.This is rather difficult and somewhat adventurous trek in Sahyadri.But you made it successfully. Moreover,you have given it in minimal words and appropriate, ample photos. I am going to show your report as model report to many of my friends. I sincerley wish all of you the best and will look for your further posts. I am sorry that I can't register my rejoicing reaction in Marathi. but I will be in touch with you if you provide me your e-mail id. Regards.
Mangesh Nabar
HAREKRISHNAJI said…
मी खुप खुप वर्षापुर्वी येथे पावसाळ्यात गेलो होतो. आठवणी जाग्या झाल्या. सोबतचे मग दोघेजण पुढे अहुपे घाटात फिरायला गेले
हेरंब said…
दर १-२ ओळींआड एक फोटो ही कल्पना आवडली. अगदी वाहता झालाय लेख त्यामुळे. मला गोरख करून आता १०-१२ वर्षं होऊन गेली. तुझ्या लेखामुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आणि गोरख आहेच तसा. आला आला असं वाटतं पण माथ्यावर पोचेपर्यंत चांगलंच घामटं निघतं.
हर्षद, प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

मंगेश, प्रतिसादाबद्द धन्यवाद. तुम्हीही गोरखगडावर गेला होतात का? तुम्हालाही भटकंतीची आवड आहे असे दिसते. (पण तुमचा ’मुलुखगिरी’ हा ब्लॉग मला दिसत नाही.)

हरेकृष्णजी, प्रतिसादाबद्दल धन्यवाद. पावसाळ्यात गोरखगड करणं चांगलंच आव्हानात्मक असणार. गुहांनंतर लागणारा रॉक पॅच पावसाळ्यात करू नये
असं म्हणतात. तुमचा काय अनुभव होता?

हेरंब,
अरे वा! तू ही ’गोरखगडकरी’ आहेस वाटतं! खरंच तो अनुभव माझ्यासाठी अफलातून होता. तिथल्या रॉक पॅचेसवरून चढणं हे जे काही होतं ते केवळ... (माझ्याकडे त्यासाठी शब्द नाहीत.) मी तो प्रकार आयुष्यात प्रथम केला! (मात्र माझी दमछाक झाली.)

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)