कीर्तनाचे रंगी... ??

एका रविवारची दुपार... टी.व्ही. वर देव आनंदचा ‘तेरे घर के सामने’ पाहत बसले होते. पुढ्यात टी-पॉयवर टी. व्ही., डीश टी. व्ही., म्युझिक सिस्टीम आणि होम-थिएटरचा प्रत्येकी एक रीमोट, एक ए. सी. चा रीमोट आणि दोन सेल फोन असा सगळा संसार मांडलेला होता. इतक्यात दोनपैकी एका सेल फोनचा ‘दिल का भॅंवर’ पुकार करायला लागला. बघितलं तर बहिणीचा फोन होता. रविवारची दुपार आणि सख्ख्या बहिणीचा फोन म्हणजे किमान अर्धा तास तरी गप्पा ह्या ठरलेल्या! तोपर्यंत टी. व्ही. म्यूट केलेला बरा असा विचार करून पुढे झाले तर त्या ढीगभर रीमोटस मधून नक्की कुठला पटकन उचलायचा तेच क्षणभर कळेना. स्वतःवरच वैतागत एकदाचं त्या देव आनंदला गप्प केलं आणि फोन उचलला....
आजकाल हे असंच होतं... सी। डी. लावून गाणी ऐकत असताना ए. सी. कमी किंवा जास्त करावासा वाटतो, एखादं छान ठेक्याचं गाणं लागलं की म्युझिक सिस्टीमचा ‘बास बूस्टर’ चालू करावासा वाटतो... आता या सगळ्या गोष्टी बसल्या जागेवरूनच करता येत असतील तर जागचं उठतंय कोण आणि कश्याला! ते करत असतानाच सेलफोन वाजतो आणि मग पुढ्यातलं नक्की कुठलं चपटं यंत्र उचलून त्यावरची बटणं दाबायची ते त्याक्षणी ध्यानातच येत नाही पटकन. बरं यातलं एखादं यंत्र जरी हाताशी नसलं तरी लगेच आयुष्य व्यर्थ वगैरे वाटायला लागतं. म्हणजे घरात असताना सतत हा जामानिमा जवळ बाळगलाच पाहिजे... दुसरा इलाज नाही आणि आपल्याला दोनच हात असल्यामुळे एकाच वेळेला तीन किंवा चार यंत्रं वापरायची वेळ आली की गडबडायला होतं... निदान मला तरी होतंच होतं. मग टी. व्ही. चा आवाज कमी-जास्त करण्यासाठी सेलफोनची बटणं दाबली जातात, सी. डी. वरचं एखादं गाणं फॉरवर्ड करायचं असलं की ए. सी. चा रीमोट त्याच्यावर उगारला जातो...!
माझी तर एक फजिती कायम ठरलेली... माझा काँप्युटरचा माऊस आणि एक सेलफोन साधारण एकाच रंगाचे आणि मापाचे आहेत। शेजारी शेजारी ठेवलेले असतील तर स्क्रीनकडे बघता बघता माझा हात हमखास माऊसऐवजी सेलफोनवर जातो आणि मग मला एकदम दचकायला होतं. डोकं ठिकाणावर असेल तर स्वतःच्याच अश्या फजितीचं हसू येतं, नसेल तर चिडचीड होते!

परवा अशीच एक गंमत झाली। दूधवाला महिन्याचं बील न्यायला आला. मी दुधाचा सगळा हिशेब सेलफोनच्या ‘नोटस’मध्ये नोंदवून ठेवलेला होता. आता, एका लिटरला तेवीस रुपये पन्नास पैसे या हिशेबाने तेवीस लिटर गाईचं दूध अधिक एकोणतीस रुपयांच्या हिशेबाने साडे अकरा लिटर म्हशीचं दूध ही आकडेमोड तोंडी कोण करतंय... म्हणून मी कॅल्क्युलेटरपण काढला. मग एका हातात सेलफोन आणि दुसर्‍या हातात कॅल्क्युलेटर घेऊन, दूधवाल्याशी बोलता बोलता तो हिशेब करताना अर्ध्या-एक मिनिटांत इतका गोंधळ उडाला की काही विचारू नका! साडेतेवीस गुणीले तेवीस करून मेमरी प्लस करत असतानाच दूधवाल्यानं काहीतरी विचारलं. त्याला उत्तर देऊन माझा मोहरा पुन्हा कॅल्क्युलेटरऐवजी सेलफोनकडेच वळला... आपल्याला काय करायचं होतं आणि आता त्यासाठी सेलफोनवरचं नक्की कुठलं बटण दाबायचं हे आठवेना. डोक्यात प्रकाश पडून कॅल्क्युलेटर सरसावेपर्यंत एकोणतीस गुणीले म्हशीचं किती दूध ते विसरले... पुन्हा मोहरा सेलफोनकडे वळवावा लागला. तोपर्यंत त्याच्या स्क्रीनवर अंधार पडला होता. तिथं दिवा लावून म्हशीचं दूध मोजेपर्यंत पुन्हा दूधवाला काहीतरी म्हणाला... गोंधळ संपेच ना! एकदा कॅल्क्युलेटर धरलेला डावा हात वर, एकदा सेलफोन धरलेला उजवा हात वर असं हातांचं लेफ्ट-राईट करत मी आपली उभी...!
वास्तविक तो हिशेब मला ती दोन्ही यंत्रं न वापरता पण करता आला असता, जरा जास्त वेळ लागला असता इतकंच। पण एकदा सवय झाली की झाली. थोड्याथोड्या वेळानं असल्या कुठल्या ना कुठल्यातरी चपट्या यंत्रावरची बटणं दाबल्याशिवाय आजकाल कुणाला चैनच पडत नाही.
घरात टी। व्ही. चा रिमोट वापरायची चांगली सवय आहे म्हणावं तर बाहेर कुणाकडे गेलं की पंचाईत होते. प्रत्येक घरातल्या रिमोटसची रचना वेगवेगळी... कधी वेळ आलीच तर त्यांवरची आपल्याला हवी असलेली बटणं शोधे-शोधेपर्यंत टी. व्ही. पाहण्यातला उत्साहच संपून जातो. मला एक कळत नाही की जर आता तमाम टी. व्ही. पाहणारं जग रिमोटस वापरणार तर त्यांची रचना, त्यांवरच्या बटणांच्या जागा या एकसारख्या का नाही ठेवत? जसं कुठलीही कार चालवली तरी गिअर्स डाव्या हाताला, दिव्यांची बटणं उजव्या हाताला... सोपं जातं की नाही जरा? तशीच या रिमोटसची पद्धत असती तर लोकांनी दुवाच दिला असता ना ते बनवणार्‍या कंपन्यांना! पण नाही...
मागच्या वर्षी आमच्या घरी डीश टी। व्ही. आला. त्याच्या रिमोटवरची आणि आधीपासून सवयीच्या असलेल्या टी. व्ही. च्या रिमोटवरची आवाज आणि चॅनेलच्या बटणांची जागा बरोब्बर उलट-पालट होती. तो बदल अजूनही माझ्या अंगवळणी पडलेला नाही. आवाज कमी-जास्त करायचा असेल की सवयीमुळे चॅनेलचंच बटण दाबलं जातं... मग आमच्या चिरंजीवांची टी. व्ही. -समाधी भंग पावते, छोटासा वाद झडतो, ‘आईला जमतच नाही नीट’ यावर नव्यानं शिकामोर्तब होतं... काही काही रिमोटसवर तर इतकी भारंभार बटणं असतात की विचारायची सोय नाही. त्यांतली निम्मी तर कधी वापरलीही जात नसावीत.
कोणे एके काळी कॅल्क्युलेटर ही अशी एकच हाताच्या पंज्यावर मावणारी वस्तू होती की ज्याच्यावरची छोटी-छोटी काही बटणं दाबून हिशेब, आकडेमोड अशी थोडीफार कामं करता यायची। किंबहुना फक्त आकडेमोडीसाठीच कॅल्क्युलेटरची ती छोटी-छोटी बटणं वापरण्याची वेळ यायची. म्हणजेच दिवसभरातला अगदी थोडाच वेळ ते उपकरण आपल्या वापरात असायचं. आता मात्र या सगळ्या चपट्या यंत्रांविना आपला दिनक्रम जरा कल्पून बघा...

घराबाहेर पडल्यावर या विविध प्रकारच्या रीमोटसचा पसारा तरी सांभाळायचा नसतो। पण आता हातांवर आणि बोटांवर त्या टीचभर सेलफोनचं राज्य असतं.
काही वर्षांपूर्वी ‘पेजर’ नामक एक सेलफोनचं अल्पायुषी भावंड अनेकांकडे दिसायचं। विविध निरोपांची देवाणघेवाण (म्हणजे आताच्या भाषेत एस. एम. एस. ) करण्याची सवय लोकांना खरी त्या पेजरनं लावली. पेजरमुळेच कामानिमित्त बाहेरगावी गेलेल्या नवऱ्याला एकदम आयत्यावेळी बायकोचा वाढदिवस आठवला तर कपाळावर हात मारून घ्यायचं कारण आता उरलं नाही! नुसतं तिला ‘डियर’, ‘डार्लिंग’ इ. शब्द वापरून पेज करायचं की काम फत्ते! पेजरसारख्या अत्याधुनिक यंत्राचा वापर करून नवर्‍यानं पाठवलेल्या शुभेच्छांमुळे इकडे बायकोही खूष!तेव्हा त्या पेजरच्या आठ-दहा आकडी मोठ्या नंबरांची मौज वाटायची किंबहुना एवढ्या मोठ्या नंबरांमुळेच ते काहीतरी अद्भुत यंत्र वाटायचं. खरं तर चार-दोन शब्दांचे त्रोटक निरोप लिहायचे आणि त्याला धडधडीतपणे ‘पेज’ म्हणायचं हा म्हणजे मोठा विनोदच होता. त्यामुळे थोड्याच काळात लोकांना त्याचा कंटाळा आला असावा. परिणामी, सेलफोनसारखं त्या पेजरचं हरहुन्नरी, हिकमती भावंड जन्माला आलं. ‘आखूड शिंगी, बहुदुधी’ हा माणसाचा हव्यास इथेही कामी आला आणि मग या सेलफोननं तमाम लोकांना अक्षरशः नादी लावलं. पेजरप्रमाणे निरोपांची देवाणघेवाण हे तर त्या सेलफोनरूपी हिमनगाचं फक्त एक टोक आहे. त्या टीचभर चपट्या पेटीत ज्या काही करामती, गमती-जमती सामावलेल्या आहेत त्या पाहून मला तर अवाक व्हायला होतं कधी कधी.
आमचा जुना सेलफोन म्हणजे चांगला भारदस्त, वजनी ऐवज होता। गळ्यात लटकवला की मला एखादी धोंड अडकवल्यासारखं वाटायचं. त्याच्या तुलनेत आजचे सेलफोन्स म्हणजे एखादी झाड की पत्तीच म्हणायला पाहिजे! पूर्वी मला कित्येक दिवस ‘तुमच्याकडे कुठला फोन आहे?’ या प्रश्नाला नक्की काय उत्तर द्यायचं तेच कळायचं नाही... म्हणजे नोकिया सांगायचं की आयडीया, सोनी म्हणायचं की बीपीएल... माझा प्रचंड गोंधळ उडायचा! विविध नेटवर्क्सची नावं आणि हॅंडसेटसची नावं यांतला फरक कळायला अनेक दिवस जावे लागले...

भर गर्दीच्या रस्त्यात सेलफोनवर अगदी रमत गमत गप्पा मारत जाणारी माणसं बघितली की मला अतिशय नवल वाटतं। मी आजही सार्वजनिक ठिकाणी फोनवर कुणाशीही नीट गप्पा-बिप्पा मारूच शकत नाही. रस्त्यात असताना कुणाचा फोन आला किंवा कुणाला फोन करायची वेळ आलीच तर अर्ध्या अधिक वेळा त्या पलिकडच्या व्यक्तिचं बोलणं आसपासच्या कोलाहलामुळे मला नीट स्पष्टपणे ऐकूच येत नाही. काही वेळा माझ्या फोनचं नेटवर्क खराब असतं, काही वेळा पलिकडच्या फोनचं... अगदी एक दोन वाक्यांत संपणारे महत्त्वाचे निरोप जरी असले तरी ते सांगताना अथवा ऐकताना मला चार-चारदा "आंऽऽ? काऽऽय?" करावं लागतं. मग त्यापेक्षा एस. एम. एस. हे प्रकरण मला जास्त आवडतं. कधीतरी एखाद्या मैत्रिणीशी गप्पा मारायची हुक्की येते. पण तिला वेळ असेल, नसेल असा विचारही येतो. अश्या वेळी एखादा मेसेज पाठवला की काम भागतं. मग पलिकडची व्यक्ती कामात असेल, आपल्या मेसेजला थोड्या वेळानं उत्तर मिळालं तरी बिघडत नाही. अश्या मेसेजेस मार्फत गप्पा तर काय तास-दोन तासही चालू शकतात. त्यांना वेळेचं बंधन उरत नाही मग.
मेसेजेस् टाईप करत बसायचा ज्यांना कंटाळा येतो असे लोक मात्र रस्त्यात चालता चालता, बागेत, बसस्टॉपवर, लोकलट्रेनमध्ये अगदी मज्जेत तासनतास आपापल्या सेलफोनवर गप्पा मारताना दिसतात। त्या हॅंडस-फ्रीच्या वायर्स कानात खुपसलेल्या असतील तर काय विचारायलाच नको. मग संभाषणानुरूप हातवारे काय करतात, एकटेच हसत काय असतात! आमच्या लहानपणी शाळेत येता-जाता रस्त्यात एखादा माणूस स्वतःशीच बडबड करताना दिसला की आम्ही आपापसांत ‘वेडा वेडा’ म्हणून खुसफुसत हसायचो. आता कदाचित ज्याच्याकडे सेलफोनच नसेल किंवा जो सार्वजनिक ठिकाणी आपले हॅंडस फ्री ठेवत नसेल त्याला आजची पिढी वेडं ठरवेल!
माझा एक सेलफोन अगदी साधासुधा आहे बिचारा... म्हणजे कॅमेरा नाही, ब्लू-टूथ नाही, काही नाही; ज्याला आधुनिक भाषेत ‘व्हनिला मॉडेल’ म्हणतात असा आहे... तर त्याला माझा मुलगा ‘मागासलेला फोन’ असं म्हणतो! तो फोन उचलून हातात घेणंही त्याला ‘शान के खिलाफ’ वाटतं। सेलफोन म्हणजे कसा... ढीगभर रिंगटोन्स हवेत, पोतंभर डाऊनलोडस हवेत, जगभरातल्या गेम्स हव्यात, निरनिराळ्या थीम्स् हव्यात, दोन मेगापिक्सेल तर दोन पण कॅमेरा हवा. म्हणजे मग सतत काही ना काही कारण काढून त्याच्यावरची बटणं कचाकच दाबली गेली पाहिजेत. तल्लीन होऊन काही करण्याचा दुसरा मार्गच उरलेला नाहीये ना आजकाल!

सेलफोनवरच्या गेम्स् खेळतानाची माझ्या मुलाच्या चेहेर्‍यावरची ती तल्लीनता पाहिली की मला नेहेमी कसे कोण जाणे पण कीर्तनात तल्लीन झालेले श्रोते आठवतात। देवळात टाळ, मृदुंग, चिपळ्यांच्या साथीनं मधाळ आवाजात कीर्तन करणारे कथेकरी बुवा, त्यांच्या पुढ्यात रंगून गेलेला श्रोतृवर्ग... हे दृश्य मी स्वतःतरी आजपर्यंत फक्त जुन्या मराठी चित्रपटांतच पाहिलेलं आहे. तबल्यावर किंवा मृदुंगावर थाप पडते, तंबोर्‍याची तार झंकारते, घरी गणपतीच्या आरतीच्या वेळी टाळ ऊर्फ झांजा वाजवलेल्या असल्यामुळे त्याचाही आवाज कसा आहे ते माहीत आहे पण त्या चिपळ्यांच्या आवाजाचं शब्दांत वर्णन कसं करतात ते मात्र मला माहीत नाही. पण कीर्तन, टाळ, मृदुंग आणि तल्लीनता ही चौकट चिपळ्यांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही हे मात्र नक्की! पूर्वी खेड्यापाड्यात दिवसभर राबून, कष्ट करून थकली भागलेली मंडळी आपला शीण घालवायला रात्री कीर्तनात रमायची. आताच्या जगात तर काय रात्रीपर्यंत थांबायचीही गरज नाही. की-बोर्ड वरची बटणं दाबायचा कंटाळा आला की सेलफोन, सेलफोनचा कंटाळा आला की पुन्हा की-बोर्ड, संध्याकाळी घरी आलं की टी. व्ही., व्हिडीयो चे रिमोट हातात असतात. टी. व्ही. वरचे कार्यक्रम कंटाळवाणे असतील तर पुन्हा सेलफोन असतोच दिमतीला... थोडक्यात काय, तर आताची ही सगळी चपटी यंत्रं म्हणजे आधुनिक जगातल्या चिपळ्याच आहेत. त्यांत माणसं इतकी रंगून जातात की टाळ, मृदुंगासारख्या इतर कुठल्या गोष्टींची उणीवही त्यांना भासत नाही... किंबहुना गरजच पडत नाही!

तेव्हा बोला - पुंडलिऽक वरदे हऽऽरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाऽऽराम...

॥ मोबाईल बोले रिमोटला, नाच माझ्या संगं ॥
॥ टी.व्ही. कॉम्प्युटरच्या चरणीऽऽ माणूस झाला दंग ॥

-----------------------------

('स्त्री' मासिकाच्या एप्रिल-२०११च्या अंकात हा लेख प्रकाशित झाला.)

Comments

Popular posts from this blog

अस्तब्धतेचे स्तब्ध क्षण

पुस्तक परिचय : Prisoners of Geography (Tim Marshal)

पुस्तक परिचय : The Far Field (Madhuri Vijay)